जैन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष ललित गांधी यांना पितृशोक

Spread the news

जैन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष ललित गांधी यांना पितृशोक
कोल्हापूर : जैन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्र सरकारच्या जैन अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष (राज्यमंत्री) ललित गांधी यांचे वडील साकलचंदजी गोमराजजी गांधी यांचे २५ मार्च रोजी पहाटे वयाच्या ८९ व्या वर्षी दीर्घ आजाराने निधन झाले. गेल्या काही महिन्यांपासून त्यांना श्वसनाचा त्रास होत होता. त्यांच्या निधनाने जैन समाजात तसेच सामाजिक आणि व्यावसायिक क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे.
साकलचंदजी गांधी हे महावीर एज्युकेशन सोसायटीचे विश्वस्त म्हणून कार्यरत होते. तसेच गुजरी येथील श्री संभवनाथ जैन श्वेतांबर मंदिर संघाचे ते माजी विश्वस्त होते. धार्मिक, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात त्यांचा मोठा सहभाग होता. देशभरातील विविध जैन तीर्थक्षेत्रामध्ये  आयोजित धार्मिक उपक्रमात त्यांनी सक्रिय सहभाग नोंदविला होता.
त्यांच्या आयुष्यभरातील धार्मिक व सामाजिक योगदानाबद्दल
गुजरी येथील श्री संभवनाथ जैन श्वेतांबर मंदिर संघ आणि भक्तीपूजानगर येथील श्री आशापूरण पार्श्वनाथ जैन श्वेतांबर मंदिर संघ यांच्या संयुक्त मान्यतेने गांधी परिवार तर्फे नुकतेच जाजरमान जीवित महोत्सव आणि देव गुरूभक्ती अष्टान्हिका महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.
या सोहळ्याला जैन समुदायाचे वरिष्ठ आचार्य श्रीमद् विजय कीर्तियश सूरीश्वरजी महाराजा यांची उपस्थिती लाभली होती.
व्यवसाय क्षेत्रातही त्यांनी उल्लेखनीय कार्य केले. छोट्या कापड विक्री व्यवसायातून त्यांनी सुरुवात करून त्याचे मोठ्या उद्योग समूहात रूपांतर केले. कोल्हापूर शहरातील टीव्ही विक्रीचे पहिले भव्य शोरूम सुरू करण्याचा मान त्यांनी मिळविला. त्यांच्या कष्टाळूपणामुळे आणि दूरदृष्टीमुळे व्यवसायाला मोठी उंची मिळाली.
त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली, जावई, सुना आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे.
उद्योजक भरत गांधी यांचे ते वडील तर सर्किट बेंचचे वकील मेघ गांधी, दर्शन गांधी यांचे ते आजोबा होत. त्यांच्या निधनाने कुटुंबियांसह समाजात शोककळा पसरली आहे.

Spread the news

You may also like

error: Content is protected !!