‘साहस’ च्या स्वप्नपूर्तीसाठी हवेत आता दानशुरांच्या मदतीचे हात8
कोल्हापूर
दिव्यांगांच्या बाबतीत आपल्याकडे प्रचंड अनास्था आहे. अनेक ठिकाणी त्यांना आवश्यक सोयी सुविधाही दिल्या जात नाहीत.अशांना त्यांच्या पुनर्वसानासाठी साहस च्या माध्यमातून दिव्यांग पुनर्वसन केंद्र उभारण्यात येत आहे, यासाठी समाजातील दानशूर व्यक्तींच्या मदतीची गरज आहे, त्यामुळे अशांनी मदतीचा हात पुढे करावा आणि साहसच्या स्वप्नपूर्तीत मोलाचा वाटा उचलावा असे आवाहन साहस डिसअॅबिलिटी रिसर्च अँड केअर फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ.नसीमा हूरजूक यांनी केले.
करनूर (ता.कागल) येथे साहस या संस्थेच्यावतीने दिव्यांगांसाठी उभारण्यात येत असलेल्या पुनर्वसन केंद्राच्या भूमिपूजन सोहळ्यावेळी त्या बोलत होत्या. त्यांच्यासह सरपंच संगीता जगदाळे, उद्योजक तेज घाटगे, उपाध्यक्ष अभिषेक मोहिते, अश्कीन आजरेकर व इतर मान्यवरांच्या हस्ते या केंद्राचे भूमिपूजन झाले.
हुरजूक म्हणाल्या, दवाखान्यातून डिस्चार्ज दिल्यानंतर दिव्यांग जिवंत आहे की नाही हेही पाहत नाहीत. अशा रुग्णांकडे बघायला कुणाला वेळ नाही.साहसच्या माध्यमातून आता हे काम करण्यात येणार आहे. स्वप्ननगरीनंतर साहस संस्थेच्या माध्यमातून माझ्या ७५व्या वाढदिवसाचे औचित्य साधून सर्वांच्या सहकार्याने दिव्यांग पुनर्वसन केंद्र उभारत आहोत.साडे सात कोटी रुपये खर्चाच्या या केंद्रासाठीचा प्रति चौरस फुट येणारा दोन हजार रुपये इतका खर्च समाजातील प्रत्येकाने उचलून यासाठी हातभार लावून वाढदिवसाच्या शुभेच्छा द्याव्यात.
हुरजूक पुढे म्हणाल्या, दिव्यांगांच्या पुनर्वसनासाठी हेल्पर्स सोडल्यानंतर माझी भावना झाली की आपल्या हातून जे दिव्यांगांसाठी कर्तव्य राहिले ते आपण आता साहसच्या माध्यमातून पूर्ण करूया. जन्मतः माकड हाडाजवळ असणाऱ्या दोषामुळे शस्त्रक्रिया केल्यानंतरही मुले दिव्यांग होतात किंवा ही शस्त्रक्रिया केली नाही तर ती जगतच नाहीत. अशा मुलांच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष होते. शाळेत गेलीच तर त्यांची हेटाळणी केली जाते. त्या सगळ्यांच्या चांगल्यासाठी आता मला काम करायचे आहे.
यावेळी उद्योजक रमेश लालवाणी यांनी या केंद्रासाठी पिण्याचे पाणी मोफत पुरवठा करण्याचे तर बांधकाम व्यवसायिक प्रमोद बेरी यांनी अल्प दरात बांधकाम सुविधा पुरविण्याची ग्वाही दिली.
यावेळी विश्वस्त नकुल पार्सेकर, नेत्ररोग तज्ञ डॉ. पी.जी कुलकर्णी मनोगत व्यक्त केले.सचिव तेज घाटगे यांनी स्वागत केले. साताराम पाटील यांनी आभार मानले.