*दि.०८ ऑक्टोबर रोजी शिवसेनेचा पदाधिकारी शिवसैनिक मेळावा; उपमुख्यमंत्री ना.मा.एकनाथ शिंदे यांची प्रमुख उपस्थिती*
*शिवसेनेचा भगवा झंझावात कोल्हापुरात येणार : आमदार राजेश क्षीरसागर यांची माहिती*
कोल्हापूर दि.२२ : आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांचे बिगुल वाजले असून, उपमुख्यमंत्री ना.मा.श्री.एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली याही निवडणुकांसाठी शिवसेना सज्ज आहे. या निवडणुकांच्या नियोजनात्मक तयारीसाठी दि.०८ ऑक्टोबर २०२५ रोजी कोल्हापुरात शिवसेनेचा भव्य पदाधिकारी व शिवसैनिकांचा मेळावा पार पडणार आहे. या मेळाव्यास शिवसेना मुख्यनेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री ना.मा.श्री.एकनाथ शिंदे साहेब यांची प्रमुख उपस्थिती असणार असून, ते पदाधिकारी आणि शिवसैनिकांना संबोधित करणार आहेत. त्यामुळे शिवसेनेचा भगवा झंझावात कोल्हापुरात येणार असल्याची माहिती राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
या पत्रकात पुढे म्हंटले आहे कि, शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे कोल्हापूरवर विशेष प्रेम होते. शिवसेना आणि कोल्हापूर हे समीकरण तयार झाले असून उपमुख्यमंत्री ना.मा.श्री.एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली राज्यात शिवसेनेची घोडदौड सुरु आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला कोल्हापूर जिल्ह्यात भरघोस यश मिळाले आहे. त्यामुळे ना.मा.श्री.एकनाथ शिंदे साहेब यांचेही कोल्हापूर जिल्ह्यावर विशेष लक्ष आहे. “आता तुमच्या निवडणुका पूर्ण झाल्या असून, तुमच्यासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांच्या निवडणुका आल्या आहेत. त्यामुळे खासदार, आमदार यांच्या विजयात मोलाचा वाटा उचलणाऱ्या कार्यकर्त्यांना न्याय देण्यासाठी तयारी करण्याचे आदेश यापूर्वीच ना.मा.श्री.एकनाथ शिंदे साहेबांनी आम्हाला दिले आहेत.” आगामी निवडणुकांच्या दृष्टीने कार्यकर्त्याला संधी देवून त्यांच्या कामाला न्याय देण्यासाठी सर्वच लोकप्रतिनिधी सज्ज आहेत. येत्या दि.०८ ऑक्टोबर २०२५ रोजी कोल्हापुरात शिवसेनेचा पदाधिकारी व शिवसैनिकांचा भव्य मेळावा पार पडणार आहे. यामध्ये सकाळच्या टप्प्यात उपमुख्यमंत्री ना.मा.श्री.एकनाथ शिंदे साहेब हे सर्व लोकप्रतिनिधी व शासकीय अधिकारी यांची बैठक घेणार आहेत. त्यानंतर लोकप्रतिनिधी व पदाधिकारी यांच्याशी स्वतंत्र संवाद साधतील. यानंतर कोल्हापूर व इचलकरंजी लोकसभा मतदारसंघातील पदाधिकारी व शिवसैनिकांना भव्य मेळाव्याद्वारे संबोधित करणार असल्याची माहिती आमदार राजेश क्षीरसागर यांनी दिली.