शालार्थ वेतन प्रणाली व संच मान्यता इंटिग्रेशन प्रक्रियेस डिसेंबर महिन्या पर्यंत मुदत वाढ द्या : महासंघाची मागणी
कोल्हापूर दि.१३ : दिवाळीमुळे ऑक्टोबर महिन्याचे वेतन प्रचलित पद्धतीने स्विकारून शालार्थ वेतन प्रणाली व संच मान्यता इंटिग्रेशन प्रक्रियेस डिसेंबर महिन्या पर्यंत मुदत वाढ द्यावी अशी मागणी राज्याचे शिक्षण संचालक (प्राथमिक ) यांच्याकडे महाराष्ट्र राज्य मान्य खाजगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर महासंघाच्या वतीने लेखी निवेदनाद्वारे करण्यात आली. शिक्षण निरीक्षक समर्जीत पाटील यांनी निवेदन स्विकारले.
राज्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वेतन प्रणालीमध्ये बदल करून या महिन्यापासून ही प्रक्रिया शालार्थ वेतन प्रणाली व संच मान्यता इंटिग्रेशन पद्धतीने करणेबाबत आदेश देण्यात आले आहेत.
सन 2024 25 च्या संचमान्यतेचा विचार करता अनेक शाळांमधून शिक्षक अतिरिक्त ठरले आहेत. त्यामुळे या वेतन प्रणालीमध्ये या महिन्याचे वेतन बिल जनरेट केले असता त्यामध्ये एरर इशू दाखवत आहे. यामुळे ऑक्टोबर महिन्याचे वेतन होण्यास विलंब लागण्याची शक्यता आहे.तसेच याच महिन्यामध्ये दिवाळी हा मोठा सण आहे.
वरील बाबीचा विचार खालील मागण्यांचा विचार करून सदर नवीन प्रणालीस मुदतवाढ द्यावी. निवेदनात खालील मागण्या करण्यात आले आहे.
1. काही जिल्ह्यांमध्ये संच मान्यता 2024- 25 मध्ये अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांची समायोजन प्रक्रिया पूर्ण झालेली नाही.
2. प्रभारी मुख्याध्यापकांची शालार्थ वेतन प्रणाली मध्ये माहिती भरत असताना काही ठिकाणी सहाय्यक शिक्षका ऐवजी असिस्टंट मुख्याध्यापक किंवा अन्य प्रकारे नोंदी झाल्यामुळे ती ही पदे अतिरिक्त दिसत आहेत.
3. काही शहर व जिल्ह्यांमध्ये सन 2024 – 25 ची संचमान्यता शाळांना देण्यात आलेल्या नाहीत. उदा. कोल्हापूर शहर
4. ऑक्टोबर महिन्यामध्ये दिवाळी हा मोठा सण असल्यामुळे या महिन्याचे वेतन प्रचलित वेतन पद्धतीने काढण्यास मंजुरी देण्यात यावी.
5. नोव्हेंबर महिन्यामध्ये समायोजन प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी वेळ देऊन डिसेंबर पासून शालार्थ वेतन प्रणाली व संच मान्यता इंटिग्रेशन प्रणाली राबविण्यासाठी मुदत वाढ देण्यात यावी.
तरी दिवाळी सणामुळे ऑक्टोबर महिन्याचे वेतन प्रचलित पद्धतीने स्वीकारून शालार्थ वेतन प्रणाली व संच मान्यता इंटिग्रेशन प्रक्रियेस डिसेंबर महिन्या पर्यंत मुदत वाढ द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे.
यावेळी महासंघाचे राज्य सचिव राजेंद्र कोरे , जिल्हाध्यक्ष टी.आर.पाटील,जिल्हा शिक्षकेत्व प्रमुख सागर जाधव,जिल्हा महिला कार्याध्यक्ष मिनाज मुल्ला, विद्या बारामते, जिल्हा प्रवक्ता सुरेंद्र तिके, जिल्हा उपाध्यक्ष विलास बोरचाटे , शहराध्यक्ष संतोष पाटील, सचिव गणेश घनवट, शहर शिक्षकेतर प्रमुख अर्जुन चाफोडीकर इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.