देशात उच्चांकी १३६ कोटी रुपये अंतिम दूध दरफरक देणारा ‘गोकुळ’दूध संघ
– डॉ. योगेश गोडबोले,
कार्यकारी संचालक, गोकुळ दूध संघ
कोल्हापूर, ता. ६ : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्या. (गोकुळ) हा दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या आर्थिक हिताचा विचार करून पारदर्शक पद्धतीने काम करणारा राज्यातील अग्रगण्य सहकारी दूध संघ आहे. सन २०२४–२५ या आर्थिक वर्षात व्यापारी नफा २१५ कोटी ८७ लाख इतका झाला असल्याने गोकुळने देशातील सर्वाधिक म्हणजेच तब्बल १३६ कोटी रुपये अंतिम दूध दरफरक म्हणून वितरित करून देशातील क्रमांक एकचा दूध संघ म्हणून ओळख मिळवली आहे, अशी माहिती गोकुळचे कार्यकारी संचालक डॉ.योगेश गोडबोले यांनी दिली.
गोकुळची डिबेंचर योजना ही कोणतीही नवीन योजना नसून, सन १९९३ पासून म्हणजेच मागील ३२ वर्षांपासून सतत राबविली जात आहे. या योजनेची अंमलबजावणी करताना संघाने सल्लागारांचे मार्गदर्शन घेऊन सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्या आहे. दरवर्षी ३१ मार्च रोजी ताळेबंद नफा तोटा पत्रक तयार करून तो वार्षिक सर्वसाधारण सभेसमोर मंजुरीसाठी ठेवला जातो. सन २०२४–२५ चा ताळेबंद वार्षिक सर्वसाधारण सभेत एकमताने मंजूर झाला असून, त्याची अंमलबजावणी करणे हे बंधनकारक आहे.
डिबेंचर योजनेची पार्श्वभूमी आणि उद्देश
गोकुळने आजपर्यंत कोणत्याही दूध संस्थेची ४० टक्के डिबेंचर कपात केलेली नाही. संघाकडून १९९३ पासूनच संस्थांना डिबेंचर्स दिले जात असून, संस्था सक्षमीकरण आणि आर्थिक स्थैर्यासाठी ही योजना राबविली जाते. आर्थिक वर्ष २०२४–२५ मध्ये संस्थांना प्रति लिटर सरासरी रु. १.२५ प्रमाणे डिबेंचर्स दिले आहेत. डिबेंचर्स व दर फरकाची सर्व माहिती ७ ऑगस्ट २०२५ रोजीच्या खातेउताऱ्यातून संस्थांना देण्यात आली आहे. डिबेंचर्स स्वरूपात निधी उभारण्यासाठी संघाने वार्षिक सर्वसाधारण सभेची तसेच शासनाची मंजुरी घेतली आहे. ३१ मार्च २०२५ अखेर गोकुळने रु. १४४ कोटी १६ लाख २६ हजार ५०० इतकी रक्कम डिबेंचर्स स्वरूपात उभारली असून, त्यापैकी रु. ७२ कोटी ७८ लाख ४ हजार ३८८ इतकी रक्कम २०२४–२५ च्या अंतिम दरफरकातून संस्थांना देण्यात आली आहे. ही रक्कम भविष्यात संस्थांच्या वसूल भागभांडवलामध्ये रूपांतरित होणार आहे.
डिबेंचर योजनेची वैशिष्टे व फायदा
दरवर्षी ऑक्टोबर ते मार्च या कालावधीत दुधाचे उत्पादन वाढते. या काळात विक्रीपेक्षा जास्त दूध आल्यामुळे दुग्धभुकटी आणि लोणी स्वरूपात साठा ठेवावा लागतो, त्यासाठी मोठ्या प्रमाणात चालू भांडवलाची गरज असते. डिबेंचर योजनेमुळे गोकुळला बँकांकडून कर्ज घेण्याची आवश्यकता राहत नाही, त्यामुळे अतिरिक्त व्याजाचा भार दूध उत्पादकांवर पडत नाही. उलट, संघाकडून डिबेंचर्सवर संस्थांना व्याज देण्यात येते, म्हणजेच अप्रत्यक्षपणे हा आर्थिक फायदा दूध उत्पादकांनाच मिळतो. या निधीच्या बचतीमुळे गोकुळला दूध उत्पादकांना देशातील सर्वाधिक दूध दर देणे शक्य झाले आहे.
उच्चांकी दूध दरफरक — देशात अव्वल कामगिरी
आर्थिक वर्ष २०२४–२५ साठी गोकुळने म्हैस दूध उत्पादकांना ४.३६४६% (सरासरी रु. २.४५ प्रति लिटर) आणि गाय दूध उत्पादकांना ४.३२९८% (सरासरी रु. १.४५ प्रति लिटर) असा अंतिम दरफरक १३६ कोटी रुपये आदा केला आहे. वरील दरात डिबेंचर कपात केलेली नाही. हा दर राज्यातीलच नव्हे, तर देशातील सर्वाधिक दरांपैकी एक आहे.
विकासकामे आणि गुंतवणूक
डिबेंचर निधीच्या सहाय्याने गोकुळने अनेक महत्त्वपूर्ण विकासकामे केली आहेत मुख्य दुग्धशाळेचे विस्तारीकरण, वाशी दूध पॅकिंग स्टेशनचे आधुनिकीकरण, सौर ऊर्जा प्रकल्प उभारणी, पशुखाद्य प्रकल्प विस्तारीकरण, पुढील काळात गोकुळकडून पुणे येथे स्वमालकीची दुग्धशाळा, वाशी येथे ५ लाख लिटर क्षमतेची नवीन दुग्धशाळा, ४ मेगावॅट सौरऊर्जा प्रकल्प, लोणी व दूधभुकटी साठवणुकीसाठी शीतगृह व गोडाऊन उभारणी असे प्रकल्प राबविण्याचे नियोजन आहे.
चौकट :
“दूध उत्पादकांना उच्चांकी १३६ कोटी रुपये अंतिम दूध दरफरक देणारा ‘गोकुळ’ हा देशातील एकमेव दूध संघ आहे.” हा विक्रम गोकुळच्या पारदर्शक व्यवस्थापनाचा आणि सहकार तत्त्वावरती आधारित कार्यपद्धतीचा परिणाम आहे.
मागील दहा वर्षाची दूध फरकाची माहिती :-
(रक्कम रुपयांमध्ये)
अ.क्र.
सन
म्हैस दूध दरफरक (दूध उत्पादकांसाठी) सरासरी प्रति लिटर
गाय दूध दरफरक (दूध उत्पादकांसाठी) सरासरी प्रति लिटर
डिबेंचर्स (संस्थेसाठी सरासरी प्रति लिटर)
१
२०१५-१६
२.०५
१.०५
०.२०
२
२०१६-१७
२.०५
१.०५
०.५५
३
२०१७-१८
२.०५
१.०५
०.००
४
२०१८-१९
२.०५
१.०५
०.००
५
२०१९-२०
२.०५
१.०५
०.००
६
२०२०-२१
२.०५
१.०५
०.५५
७
२०२१-२२
२.२५
१.२५
०.५५
८
२०२२-२३
२.२५
१.२५
०.५५
९
२०२३-२४
२.२५
१.२५
०.२५
१०
२०२४-२५
२.४५
१.४५
१.२५
आजपर्यंत संघाने दूध दरफरक रक्कम देणे व डिबेंचर्स देणे ही पध्दत अवलंबली असुन सन २०१७-१८, सन २०१८-१९, सन २०१९-२०२० या वर्षामध्ये नैसर्गिक आपत्ती, महापूर, कोरोना महामारी या संकटामुळे दूध उत्पादकास दूधाचा जास्तीत जास्त दर देऊन व डिबेंचर देण्यात आलेले नाहीत.
– डॉ. योगेश गोडबोले
कार्यकारी संचालक
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्या. (गोकुळ), कोल्हापूर
—————————————————————————————————-