देशाचा एक नंबर ब्रँड होण्याची क्षमता गोकुळ दूध संघात…
– नामदार हसन मुश्रीफसो
वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री
कागल तालुका दूध संस्था प्रतिनिधींची संपर्क सभा उत्साहात…
कोल्हापूर, ता.२२: कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्या.,कोल्हापूर (गोकुळ) संघाशी संलग्न कागल तालुक्यातील प्राथमिक दूध संस्था संपर्क सभा आज शुक्रवार दि.२२/०८/२०२५ इ.रोजी आर.के.मंगल कार्यालक बामणी, ता.कागल येथे महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या प्रमुख उपस्थितीत व संघाचे चेअरमन नविद मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली व माजी चेअरमन व ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील, अरुण डोंगळे तसेच संचालक मंडळ व मान्यवरांच्या उपस्थित संपन्न झाली.
यावेळी मार्गदर्शन करताना नामदार हसन मुश्रीफ म्हणाले की, गोकुळ दूध संघ हा पहाटे उठून शेणा- मुतात हात घालून काबाडकष्ट करणाऱ्या माता- भगिनींनी व दूध उत्पादक शेतकऱ्यांनी वाढविलेला संघ आहे. संपूर्ण देशाचा एक नंबर ब्रँड होण्याची क्षमता गोकुळ दूध संघामध्ये आहे, असा विश्वास व्यक्त केला. हा ब्रँड टिकवायचा व वाढवायचा असेल तर दूध उत्पादकांचा सहभाग मोलाचा आहे. विशेषता; संचालक मंडळाची जबाबदारी मोठी आहे, असेही ते म्हणाले. श्री मुश्रीफ भाषणात पुढे म्हणाले, गोकुळ दुधाला मुंबई आणि पुण्यातही मोठ्या प्रमाणात मागणी आहे. कारण; कोल्हापूर जिल्ह्याच्या माती आणि पाण्यामुळेच या दुधाची चव मोठी आहे. दूध संघ संचालकांच्या गुजरात दौऱ्याच्या अभ्यासामधून एक गोष्ट स्पष्ट झाली आहे. जनावरांमधील आय. व्ही. एफ. तंत्र सिद्ध झाले आहे. म्हैस व्यायल्यानंतर जन्माला येणारे रेडकू ही रेडीच असेल, याचीही खात्री झालेली आहे. या तंत्रज्ञानाचा प्रचार आणि प्रसार दूध उत्पादकांमध्ये करण्याची गरज आहे. श्री. मुश्रीफ पुढे म्हणाले, वासाचे दूध आणि पशुखाद्याबद्दलच्या दूध उत्पादकांच्या शंकाचे निरसन संघाने करावे. गोकुळ दूध संघाचे महालक्ष्मी पशुखाद्य आणि बाजारातील इतर पशुखाद्ये यांचा तुलनात्मक अभ्यास करा. प्रयोगशाळेत तुलनात्मक परीक्षण करून तसेच गोठ्यातही म्हैशीला खाद्य देऊन गोकुळच्या पशुखाद्याचा गुणात्मक दर्जा सिद्ध करा.
गोकुळ दूध संघाकडून दुधाळ म्हैशीसाठी या आधीच ५० हजार रुपये अनुदान सुरू आहे. दूध संघाने केडीसीसी बँकेबरोबर जर सर्व व्यवहार केले तर म्हैशीला बँकेकडून ज्यादा १० हजार रुपये अनुदान देण्याची घोषणाही मंत्री मुश्रीफ यांनी केली. तसेच श्री. मुश्रीफ पुढे म्हणाले, संघाचे संचालक मंडळ गोव्याला का गेले होते, याचे कोडे मलाही उलगडले नव्हते. माहिती घेतली असता ते स्वतःच्या खर्चाने गेले होते असे आढळून आले. त्यामुळे तो मुद्दा मी आता काढत नाही. दरम्यान; गोव्यामध्येही गोकुळ दुधाची विक्री होते. अधिकची बाजारपेठ आणि मार्केटिंगसाठी त्या सरकारचेही सहकार्य मिळण्यासाठी संचालक मंडळ तिथले मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनाही भेटले आहे. संचालिका सौ. शौमिका महाडिक या गेली चार वर्षे विरोध करीत होत्या. आता महायुतीचाच अध्यक्ष असल्यामुळे येणाऱ्या वार्षिक सर्वसाधारण सभेत त्या फलक घेऊन येणार नाहीत, घोषणा देणार नाहीत. सभा शांततेत होईल अशी अपेक्षाही श्री. मुश्रीफ यांनी व्यक्त केली. तसेच; त्यांचे माहेर कागल असल्याचेही त्यांनी सांगितले.
चौकट…….
लाडका सुपरवायझर स्पर्धा……!
मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले की, गोकुळ दूध संघाचे सुपरवायझर यांनी अजून दूध संकलन वाढीसाठी मेहनत करावी. व संघाने प्रत्येक कार्यक्षेत्रात स्पर्धा आयोजित करून जास्तीत जास्त दूध उत्पादकांना जातिवंत म्हैस खरेदीस प्रोत्साहित करावे, तसेच उत्कृष्ट काम करणाऱ्यांना लाडका सुपरवायझर म्हणून प्रोत्साहन पर रोख १ लाख रुपयाचे बक्षिस संघामार्फत देणेत यावे.
यावेळी बोलताना संघाचे चेअरमन नविद मुश्रीफ म्हणाले की,“गोकुळ दूध संघाच्या योजनांमुळे शेतकऱ्यांचे उत्पन्नात वाढ झाली आहे. संघाचे उद्दिष्ट २५ लाख लिटर संकलन साध्य करणे असून, सर्व उत्पादकांनी संघाच्या सर्व योजनांचा लाभ घेऊन दूध वाढीसाठी पुढाकार घ्यावा,” असे त्यांनी आवाहन केले.
यावेळी उत्पादकांच्या हिताचे निर्णय घेतल्याबद्दल चेअरमन नविद मुश्रीफ व संचालक मंडळाचे अभिनंदन ठरावाने करण्यात आले. तसेच किसान विमा पॉलिसीअंतर्गत अपघाती मृत पावलेल्या सभासदांच्या वारसांना व मृत जनावरांच्या मालकांना विमा धनादेशांचे वाटपही करण्यात आले. यावेळी प्रविणसिंह पाटील (मुरगूड), बाबासाहेब तुरंबे (साके), टी.एम.पवार (व्हनाळी), मानसिंग पाटील (सांगाव), रविंद्र पाटील (बाणगे), बिद्री साखर कारखान्याचे व्हा.चेअरमन मनोज फराकटे, जयदीप पोवार (बिद्री),डी.एम.चौगले (सोनाळी), आदि संस्था प्रतिनिधींनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवरती सविस्तर चर्चा होवून अडचणी समजावून घेवून त्या प्रश्नांचे निरसन करण्यात आले तसेच विविध सूचनाची नोंद घेण्यात आली.
यावेळी संघाचे माजी चेअरमन ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील,अरुण डोंगळे, संचालक युवराज पाटील यांनी सभेस मार्गदर्शन केले. स्वागत व प्रस्ताविक संचालक अंबरिषसिंह घाटगे तर आभार संचालक शशिकांत पाटील चुयेकर यांनी मानले.
याप्रसंगी महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, संघाचे चेअरमन नविद मुश्रीफ, माजी चेअरमन व ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील, अरुण डोंगळे, संचालक बाबासाहेब चौगले, अभिजित तायशेटे, अजित नरके, शशिकांत पाटील–चुयेकर, रणजितसिंह पाटील, कर्णसिंह गायकवाड, प्रकाश पाटील, सुजित मिणचेकर, अमरसिंह पाटील, बयाजी शेळके, अंबरिषसिंह घाटगे, बाळासो खाडे, चेतन नरके, युवराज पाटील, राजेंद्र मोरे, मुरलीधर जाधव, संचालिका श्रीमती अंजना रेडेकर, सौ. शौमिका महाडिक, कार्यकारी संचालक डॉ.योगेश गोडबोले व संघाचे अधिकारी तसेच कागल तालुक्यातील दूध संस्थाचे चेअरमन, संचालक, प्रतिनिधी, दूध उत्पादक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
——————————————————————————————————–
फोटो ओळ – याप्रसंगी मार्गदर्शन करताना वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, संघाचे चेअरमन नविद मुश्रीफ, माजी चेअरमन व ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील, अरुण डोंगळे, संचालक बाबासाहेब चौगले, अभिजित तायशेटे, अजित नरके, शशिकांत पाटील–चुयेकर आदी दिसत आहेत.
——————————————————————————————————-