देशातील ‘टॉप-५०’ राज्य विद्यापीठांत शिवाजी विद्यापीठाचा समावेश
‘एन.आय.आर.एफ.’ रँकिंगमध्ये उंचावले स्थान
कोल्हापूर, दि. ४ सप्टेंबर: केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या वतीने आज जाहीर करण्यात आलेल्या राष्ट्रीय संस्थात्मक रँकिंग फ्रेमवर्क (एनआयआरएफ-२०२५) मध्ये शिवाजी विद्यापीठाने देशातील आघाडीच्या २०० विद्यापीठांमध्ये आपले स्थान कायम राखत असताना राज्य सार्वजनिक विद्यापीठांच्या यादीत आगेकूच करीत देशातील आघाडीच्या ५० विद्यापीठांमध्ये स्थान प्राप्त केले आहे. विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांनी ही माहिती दिली.
प्र-कुलगुरू डॉ. पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने आज सन २०२५ साठीची राष्ट्रीय संस्थात्मक रँकिंग फ्रेमवर्कची क्रमवारी जाहीर केली. सन २०१६ पासून ही क्रमवारी जाहीर करण्यात येत आहे. पहिल्या वर्षीपासून शिवाजी विद्यापीठ या क्रमवारीत देशातील आघाडीच्या २०० विद्यापीठांमध्ये आपले स्थान कायम राखत आले आहे. रँकिंगमध्ये सहभागी होणाऱ्या शैक्षणिक संस्थांची संख्या वर्षागणिक वाढत जात असतानाही शिवाजी विद्यापीठाने आपले स्थान कायम राखले, हे महत्त्वाचे आहे. या वर्षीही १५१-२०० या रँकबँडमध्ये शिवाजी विद्यापीठाचे स्थान कायम आहे. गतवर्षीपासून ‘एनआयआरएफ’ने राज्य सार्वजनिक विद्यापीठांची क्रमवारी स्वतंत्रपणे जाहीर करण्यास सुरवात केली. त्यानुसार गेल्या वर्षी शिवाजी विद्यापीठाचा या यादीमध्ये ५१-१०० या रँकबँडमध्ये समावेश झालेला होता. यंदा शिवाजी विद्यापीठाने क्रमवारीत आणखी आगेकूच करीत १-५० या रँकबँडमध्ये स्थान प्राप्त केले आहे. देशातील आघाडीच्या ५० विद्यापीठांत शिवाजी विद्यापीठ आता ५१.८० गुणांकनासह ४५ व्या स्थानी पोहोचले आहे. या यादीत महाराष्ट्रातील आणखी ३ विद्यापीठे आहेत. त्यात ११ व्या स्थानी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, १२ व्या स्थानी मुंबई विद्यापीठ आणि ४३ व्या स्थानी पुण्याचे सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठ आहे.
राष्ट्रीय संस्थात्मक रँकिंग फ्रेमवर्कची क्रमवारी अध्यापन-अध्ययन प्रक्रिया, संशोधनपर व व्यावसायिक कृतीशीलता, विद्यार्थ्यांचे उत्तीर्णतेचे प्रमाण, महिलांसह विविध वंचित समाजघटकांपर्यंत शिक्षण पोहोचविण्यासाठी करण्यात आलेले प्रयत्न आणि विद्यापीठाशी संबंधित विविध घटकांशी संवाद व समन्वय या निकषांवर क्रमवारी आधारित आहे. विद्यापीठे, व महाविद्यालये यांच्याबरोबरच संशोधन संस्था, अभियांत्रिकी, व्यवस्थापन, फार्मसी, आर्किटेक्चर व नियोजन, वैद्यकीय, दंतवैद्यकीय, कायदा, कृषी व कृषीपूरक क्षेत्रे, नाविन्यता, मुक्त, कौशल्य, राज्य सार्वजनिक आणि शाश्वत विकास या क्षेत्रांतील शैक्षणिक संस्थांचाही या क्रमवारीमध्ये समावेश आहे.
या क्रमवारीच्या अनुषंगाने प्रतिक्रिया व्यक्त करताना कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के म्हणाले, राष्ट्रीय पातळीवरील या क्रमवारीमध्ये राज्य सार्वजनिक विद्यापीठांत शिवाजी विद्यापीठाने मोठी झेप घेऊन राष्ट्रीय स्तरावर अभिमानास्पद कामगिरी नोंदविलेली आहे. सहभागी होणाऱ्या समग्र शैक्षणिक संस्थांची संख्या वाढती असतानाही शिवाजी विद्यापीठाचे या क्रमवारीतील स्थान उंचावले आहे. गेल्या काही वर्षांत एनआयआरएफच्या निकषांनुसार विद्यापीठातील शिक्षक, संशोधकांसह सर्वच घटकांनी आपली कामगिरी उंचावण्यासाठी परिश्रम घेतले, त्याचे हे फलित आहे. या सर्वच घटकांचे मी अभिनंदन करतो. भविष्यातही त्यांनी शिवाजी विद्यापीठाचे स्थान आणि यशाची कमान अधिकाधिक उंचावत नेण्यासाठी प्रयत्नशील राहावे, असे आवाहन त्यांनी केले.