पतसंस्थांमधील ठेवींना ५ लाख रूपयांचे विमा संरक्षण मिळावे, युपीआय प्रणालीचा वापर करण्यास परवानगी मिळावी, सेवा सोसायट्यांना दिली जाणारी ४० प्रकारची कामे पतसंस्थांना मिळावीत, यासाठी पाठपुरावा करू, खासदार धनंजय महाडिक यांची ग्वाही
राज्य पतसंस्था फेडरेशनच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी सौ. अरूंधती महाडिक यांची निवड, तर सहकाररत्न पुरस्काराने खासदार धनंजय महाडिक यांचा गौरव
सहकारातून समृध्दीकडे देशाची वाटचाल सुरू आहे. अशा वेळेस पतसंस्थांची चळवळ अधिक सक्षम करण्यासाठी पतसंस्थांमधील ठेवींना ५ लाख रूपयांचं विमा संरक्षण मिळावे, युपीआय प्रणालीचा वापर करायला परवानगी मिळावी आणि गावातील सेवा सोसायट्यांना दिली जाणारी ४० प्रकारची कामे पतसंस्थांना दिली जावीत, या मागण्यांचा संसदेत पाठपुरावा करू, अशी ग्वाही खासदार धनंजय महाडिक यांनी दिली. महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनच्यावतीने कोल्हापुरात झालेल्या सहकारी पतसंस्थांच्या महिला मेळाव्यात ते बोलत होते. या मेळाव्यात खासदार महाडिक यांचा सहकाररत्न पुरस्काराने गौरव करण्यात आला. तर फेडरेशनच्या राज्य महिला अध्यक्षपदी सौ. अरूंधती महाडिक यांची निवड करण्यात आली.
महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनच्यावतीने, आज कोल्हापुरातील आनंद भवन इथे सहकारी पतसंस्थांचा महिला मेळावा पार पडला. खासदार धनंजय महाडिक, भागीरथी पतसंस्थेच्या अध्यक्षा सौ. अरूंधती महाडिक, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तानाजी पाटील, उपमहापौर अक्षय जरग, स्थायी समिती सभापती विशाल शिराळे, पतसंस्था फेडरेशनचे राज्य अध्यक्ष काकाजी कोयटे, शांतीलाल शिंगे, शशिकांत राजोबा, राजश्री पाटील, सुरेखा लवांडे, डॉ. अंजली शहा, भारती मुथा, अनिल पाटील, सहकार नियामक मंडळाचे सदस्य सदाशिव भुसारे, चॅनेल बी चे व्यवस्थापकीय संचालक पृथ्वीराज महाडिक, भाजप युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांच्या उपस्थितीत मेळाव्याला सुरवात झाली. फेडरेशनचे अध्यक्ष काकाजी कोयटे यांनी, राज्यातील पतसंस्थांची सद्यस्थिती, त्यांच्यापुढील आव्हाने आणि मागण्या मांडल्या. त्यानंतर सहकार क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल, खासदार धनंजय महाडिक यांना सहकाररत्न पुरस्कार देवून गौरवण्यात आले. तसेच पतसंस्था फेडरेशनच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी सौ. अरूंधती महाडिक यांची निवड झाल्याची घोषणा कोयटे यांनी केली. त्यानंतर सौ. महाडिक यांना सन्मानित करण्यात आले. महिला सक्षमीकरणासाठी १६ वर्षापासून काम करत असून, महिलांचे प्रश्न आपण जवळून पाहीले आहेत. भागीरथी पतसंस्थेच्या माध्यमातून, गरजू महिलांना आर्थिक पाठबळ देता आलं, त्याचे समाधान आहे असे सांगून, सर्वांच्या सहकार्याने फेडरेशनच्या राज्यअध्यक्ष पदाची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडू, अशी ग्वाही सौ. महाडिक यांनी दिली. यावेळी भाजप युवा मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल, कृष्णराज महाडिक यांचा सत्कार करण्यात आला. प्रत्येकाने बचत करण्याची सवय अंगीकारली पाहिजे. लहान वयातच बचत करण्याची सवय आणि काटकसर यांचे महत्व कळालं, त्याचा फायदा आता नक्कीच होतोय, असे कृष्णराज महाडिक यांनी सांगितले. सर्वात कमी वयाचा युवा मोर्चाचा प्रदेशाध्यक्ष म्हणून आपली निवड झाल्याचा एक विक्रम नोंदवला गेलाय, असेही ते म्हणाले. यावेळी चॅनेल बी चे व्यवस्थापकीय संचालक पृथ्वीराज महाडिक यांचाही सत्कार करण्यात आला. दरम्यान १६ एप्रिलला दिल्लीतील संसदेच्या अधिवेशनात ३३ टक्के महिला आरक्षणाचं विधेयक मांडून, १८ एप्रिलला ते मंजुर होणार आहे. या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात होणारी ही परिषद म्हणजे दुग्धशर्करा योग असल्याचे खासदार धनंजय महाडिक यांनी सांगितले. महाडिक परिवाराची तिसरी पिढी सध्या सहकार क्षेत्रात आहे. केंद्रामध्ये सहकार मंत्रालय स्थापन झाल्यानंतर नामदार अमित शहा यांनी, देशातील १० खासदारांची समिती बनवली. त्यामध्ये आपली निवड झाल्याचे खासदार महाडिक यांनी सांगितले. देशभरातील पंतसंस्थांची चळवळ समृध्द आणि सक्षम बनवण्यासाठी नामदार अमित शहा यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यामध्ये एक पाऊल पुढे टाकत, पतसंस्थांच्या ठेवींना ५ लाख रूपयांचा विमा आणि युपीआय प्रणालीच्या वापराला परवानगी मिळावी, यासाठी आपण प्रयत्न करू. तसेच गावागावातील सोसायट्यांना शासनाकडून दिली जाणारी ४० प्रकारची कामं या पतसंस्थांना मिळावीत, यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे खासदार महाडिक यांनी सांगितले. पश्चिम महाराष्ट्रातही सहकारातील तज्ञ आणि कुशल मनुष्यबळ घडवण्यासाठी कोल्हापुरात प्रशिक्षण केंद्र सुरू करावे, त्याला सर्वतोपरी सहकार्य करू, असेही खासदार महाडिक यांनी सांगितले. यावेळी फेडरेशनचे १७ जिल्हयातील संचालक आणि पतसंस्थांच्या महिला पदाधिकारी, कर्मचारी उपस्थित होत्या.





