जिल्ह्यात महायुतीचीच सत्ता
मंत्री हसन मुश्रीफ; शहर राष्ट्रवादी कार्यकर्ता मेळावा
कोल्हापूर : प्रतिनिधी
कोल्हापूर महानगरपालिकेसह जिल्हापरिषद तसेच नगरपालिकांच्या निवडणूक महायुती म्हणून एकत्र लढविणार असून या सर्वच ठिकाणी महायुतीचीच सत्ता येणार असल्याचा विश्वास वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला. महापालिका निवडणूकीच्या पाश्वभूमीवर शहर राष्ट्रवादीच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या काार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आदिल फरास होते.
मंत्री मुश्रीफ म्हणाले की चार महिन्यामध्ये निवडणूक होणार आहेत. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका महायुती म्हणून एकत्रीत लढण्याचा निर्णय घेतला आहे. अपवादात्मक ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती होती. कोल्हापूर महानगरपालिकेत महापौर तसेच जिल्हापरिषदेचा अध्यक्ष आणि जिल्ह्यातील नगरपालिकांचे नगराध्यक्ष हे महायुतीचेच असतील. त्यासाठी कार्यकर्त्यांनी आतापासूनच पूर्ण ताकतीने कामाला लागावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
सर्वसामान्यांची कामे केली तरच लोक आपल्याला मते देतात हे मला सहावेळा निवडणूकीत मिळालेल्या यशावरून सिध्द होते. त्यामुळे पदाधिकारी किंवा कार्यकर्ते यांनी सतत कार्यरत राहिले पाहिजे. चार प्रभागाची रचना होण्याची शक्यता असल्याने लोकांची पसंती असलेल्या उमेदवारालाच पक्षाकडून संधी दिली जाणार आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका महायुती म्हणून लढवत असताना राष्ट्रवादी पक्ष नंबर एकवर राहण्यासाठी कार्यकर्त्यांनी आतापासूनच ताकतीने कामाला लागावे. राज्यात महायुतीची सत्ता आल्यापासून अनेक योजना सुरू केल्या. त्यामुळे जनतेचे पाठबळ आपल्यालाच मिळणार आहे. अंबाबाई मंदिर तिर्थक्षेत्र विकास आराखडा तसेच जोतिबा मंदिर परिसर विकास आराखड्यासाठी शेकडो कोटींचा निधी मंजूर केला आहे.
शहराध्यक्ष आदिल फरास म्हणाले की कार्यकर्त्यांचा सन्मान करण्याचे काम सातत्याने आमच्या नेत्यांनी केले आहे. शाहू महाराजांच्या विचाराला साजेसं काम त्यांनी केले आहे. मुश्रीफ यांच्यासारखे नेतृत्व असेल तर गुलाल आपलाच आहे. त्यांनी एकदा ठरवलं की त्यामध्ये बदल होत नाही असा माझा अनुभव आहे. राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविण्यासाठी अनेक इच्छुक आहेत, परंतू काम पाहून उमेदवारी दिलाी जाणार आहे.
या मेळाव्यास राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील, माजी महापौर हसिना फरास, सुनिता राऊत, माधवी गवंडी, कादंबरी कवाळे, माजी नगरसेवक उत्तम कोराणे, सदीप कवाळे, प्रकाश गवंडी, महेश सावंत, प्रकाश कुंभार यांच्यासह महेंद्र चव्हाण, रामेश्वर पत्की, जहिदा मुजावर, रेखा आवळे आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार युवराज साळोखे यांनी मानले.
——————–
—————–
मुंबईला उपचारासाठी जावे लागणार नाही…..
मंत्री मुश्रीफ म्हणाले की मला मिळालेल्या प्रत्येक खात्यामध्ये मी चांगले काम केले आहे. वैद्यकीय शिक्षण मंत्रीपद मिळाल्यापासून या क्षेत्रामध्येही चांगले काम करायला मिळाले. सीपीआर रूग्णालयाचे नुतणीकरण सुरू असून त्यामुळे रूग्णालयाचे रूपडे पालटणार आहे. त्याचबरोबर शेंडापार्क येथे ११०० बेडचे रूग्णालय बांधण्याचे काम सुरू झाले आहे. तेही दोन वर्षात पूर्ण होणार असून त्यानंतर कोल्हापूरातील एकाही रूग्णाला उपचारासाठी मुंबईला जावे लागणार नाही.