ऊत्तूर जाहीर प्रचार सभा……
*कै. अजितदादा पवार यांच्या ऋणातून उतराई होण्यासाठी उत्तुर मतदार संघातील शिरीष देसाई, विकास चोथे व सौ. जयश्री गाडे यांना विजयी करा*
*मंत्री हसन मुश्रीफ यांचे जाहीर सभेत आवाहन*
*उत्तूर जिल्हा परिषद मतदार संघाच्या जाहीर सभेस जोरदार प्रतिसाद*
*सगळ्यांना फसवत सुटलेल्या विरोधकांचा करेक्ट कार्यक्रम करा*
उत्तूर, दि. ३:
दिवंगत उपमुख्यमंत्री स्वर्गीय कै. अजितदादा पवार यांनी आंबेओहोळ प्रकल्पाचा निधी, शासकीय निसर्गोपचार व योगा महाविद्यालयाचा निधी, बस स्थानकाचा निधी यासह विविध विकास निधी देण्याचे काम केले आहे. त्यांच्या या ऋणातून उतराई होण्यासाठी उत्तुर जिल्हा परिषद मतदार संघातील शिरीष देसाई, उत्तुर पंचायत समितीचे विकास चोथे व भादवन पंचायत समितीच्या सौ. जयश्री गाडे यांना प्रचंड मतांनी विजयी करा, असे भावनिक आवाहन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. कै. अजितदादा पवार यांनी उत्तूर विभागासाठी नेहमीच भरभरून दिले आहे, असेही ते म्हणाले.
उत्तुर ता. आजरा येथे उत्तुर जिल्हा परिषद मतदार संघातील उमेदवारांच्या प्रचारार्थ झालेल्या जाहीर सभेत मंत्री श्री. मुश्रीफ बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी जिल्हा परिषद सदस्य वसंतराव धुरे होते. या सभेला मतदारांचा जोरदार प्रतिसाद मिळाला.
भाषणात मंत्री श्री. मुश्रीफ पुढे म्हणाले, या विभागाचे अनेक वर्षांचे आंबेओहोळ प्रकल्पाचे अपुरे स्वप्न पूर्ण झाले आहे. त्यासाठी कै. अजितदादांनी कोट्यावधींचा निधी दिला. परिणामी; शेतीच्या व पिण्याच्या पाण्याची कायमस्वरूपी व्यवस्था झाली. तसेच, येथे होत असलेल्या निसर्गोपचार व योग महाविद्यालय, होवू घातलेल्या ट्रेनिंग सेंटर व फिजिओथेरपी सेंटरमुळे या पंचक्रोशीत मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होईल. ते पुढे म्हणाले, लाडकी बहीण योजना आणताना उपमुख्यमंत्री कै. अजितदादा पवार यांच्याकडे अर्थमंत्री म्हणून तिजोरीच्या किल्ल्या होत्या. महिला व बालकल्याण मंत्रीपद आदिती तटकरे यांच्याकडे होते. त्यामुळे या योजनेवर आमचाच हक्क राहतो. येत्या काळात लवकरच लाडक्या बहिणींना दरमहा २१०० रुपये देणार, असेही ते म्हणाले.
चौकट……
*त्यांचा करेक्ट कार्यक्रम करा….!*
श्री मुश्रीफ म्हणाले, सगळ्यांना फसवणारा एक चॅप्टर माणूस विरोधात उभा आहे. आत्ता या निवडणुकीत ते खर्च करीत असलेला जो “निधी” आहे तो माझ्याकडून आणि समरजीतसिंह घाटगे यांच्याकडून विधानसभेवेळी घेतलेला आहे. सतेज उर्फ बंटी पाटील, मला, समरजितसिंह घाटगे यांना फसवून त्यांनी फसवण्यासाठी आता महादेवराव महाडिक यांचा नंबर लावला आहे. ते कुणाकुणाला फसवणार आहेत. सगळ्यांना फसवून आपणच शहाणे आहोत असे वाटते काय? आम्हीसुध्दा या मातीत ४०-४० वर्षे सामाजिक क्षेत्रात काम केलेले आहे. आम्हालाही माणसं ओळखता येतात. अशा फसव्या माणसाच्या नादी लागून बळी पडू नका. त्यांचा करेक्ट कार्यक्रम करा ही माझी तुम्हाला शपथ आहे, असेही ते म्हणाले.
शिरिष देसाई म्हणाले, स्व. बाबासाहेब कुपेकर आणि त्यानंतर वैद्यकिय शिक्षणमंत्री हसनसो मुश्रीफ यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादीने विकासाचा पाया घालून वाटचाल सुरू केली. मंत्री मुश्रीफ साहेबांनी उत्तूर व भागात मंदिरे उभारली, गावांना जोडणारे रस्ते केले, आंबेओहोळ प्रकल्प, पुनर्वसन, गरीब लोकांना वैद्यकिय सेवा, उत्तूर उत्तूर तळे, ओपन जीम व सध्या चालू असलेल्या वैद्यकिय महाविद्यालयाचे काम. विरोधकांनी वीस वर्षात केलेले काम दाखवा. भावनिक आवाहनाला बळी पडू नका.
व्यासपीठावर माजी जिल्हा परिषद सदस्य वसंतराव धुरे, माजी जिल्हा परिषद सदस्य काशिनाथ तेली, मारूतराव घोरपडे, दीपकराव देसाई, गडहिंग्लजचे नगराध्यक्ष महेश तुरबतमठ, एम. के. देसाई, राजेंद्र मुरुकटे, बी. टी. जाधव, शिवलिंग सन्ने, रेहमान नायकवडी, विश्वासराव देसाई, राजाराम पाटील, विष्णू मुळीक -गुरुजी, गंगाधर हराळे, विजय वांगणेकर, विजय सावेकर, संभाजीराव तांबेकर, गणपतराव सांगले, सुधीर सावंत, धनाजी कांबळे, विजय काळे, सौरभ वांजोळे, संजय येजरे आदी प्रमुख उपस्थित होते.
……….
*उत्तुर येथे उत्तुर जिल्हा परिषद मतदार संघाचे उमेदवार शिरीष देसाई, उत्तुर पंचायत समिती मतदार संघाचे उमेदवार विकास चोथे आणि भादवण पंचायत समिती मतदार संघाच्या उमेदवार सौ. जयश्री गाडे यांच्या प्रचारार्थ जाहीर सभेत बोलताना वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, शिरीष देसाई व समोर उपस्थित जनसमुदाय.*
==========



