गुरु तेग बहादूर साहिबजींच्या ३५० व्या शहिदी समागमानिमित्त
कोरगावकर हायस्कूलमध्ये शैक्षणिक साहित्य वाटप
कोल्हापूर, दि. २३ (जिमाका): ‘हिंद-दी-चादर’ श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहिदी समागमाचे औचित्य साधून, शिख समाज कोल्हापूर जिल्ह्याच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपणारा एक कौतुकास्पद उपक्रम राबवण्यात आला. सदर बाजार, कदमवाडी येथील कोरगावकर हायस्कूल मधील विद्यार्थ्यांना यावेळी वह्या आणि पेन या शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. गरजू आणि गुणवंत विद्यार्थ्यांना शिक्षणात प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.
शिख समाजाच्या वतीने आयोजित या ‘हिंद दी चादर’ शहिदी प्रचार प्रसार कार्यक्रमाचा मुख्य उद्देश शहिदी परंपरेचा महान वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचवणे आणि गरजू व गुणवंत विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी सहकार्य करणे हा होता. याप्रसंगी विद्यार्थ्यांना श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या जीवनाबद्दल सविस्तर माहिती देण्यात आली. या कार्यक्रमाला शिख समाजाचे प्रतिनिधी, शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



