“ किल्ले पन्हाळा येथे छत्रपती महाराणी ताराराणी बाईसाहेब यांचा अश्वारुढ पुतळा आणि स्मारक उभारणार “ शिवंशभु प्रतिष्ठाण आणि सरहद संस्थेचा निर्धार
पुणे: मराठे शाहीचे ज्येष्ठ इतिहासकार व ज्यांनी तथ्यांवर आधारित इतिहास लेखन करून महाराष्ट्रातील मराठ्यांच्या इतिहासाला एक वेगळी दिशा दिली असे थोर इतिहासकार डॉ. जयसिंगराव पवार यांचे नुकतेच कोल्हापूर येथे निधन झाले. त्यांच्या निधनापूर्वी पुण्यात गुजर-निंबाळकरवाडी कात्रज येथील रस्त्याला महाराणी ताराराणी पथ असे नामकरण त्यांच्या हस्ते करण्याच्या समारंभात तसेच नंतर झालेल्या भेटीत त्यांनी माझ्या हयातीत किल्ले पन्हाळा येथे महाराणी ताराराणी यांचा त्यांच्या 351व्या जयंती वर्षात अश्वारूढ पुतळा आणि यथोचित स्मारक व्हावे ही इच्छा व्यक्त केली होती. त्यांनी त्यासाठी महाराष्ट्र शासनाकडे सातत्याने पाठपूरावाही केला होता. सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी याबाबत त्यांना आश्वासनही दिले होते.
औरंगजेबाने जेव्हा मराठा स्वराज्य नष्ट करण्यासाठी प्रयत्न चालू केले, तेव्हा ताराराणींनी किल्ले पन्हाळ्याला आपली राजधानी बनवून लढा दिला होता. सन १७०० ते १७०१ या काळात औरंगजेबाने पन्हाळ्याला वेढा दिला होता. महाराणी ताराराणींच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी तो किल्ला ९ वर्षे (१६९२-१७०१) झुंजवला. ताराराणींनी अतिशय कौशल्याने आणि धैर्याने मोगलांना टक्कर दिली, ज्यामुळे किल्ले पन्हाळा हा त्या काळातील मराठा सत्तेचा बळकट आधारस्तंभ बनला. किल्ले पन्हाळ्यावर आजही महाराणी ताराराणींचा वाडा, सुसज्ज तटबंदी आणि ऐतिहासिक स्थळे त्यांच्या पराक्रमाची साक्ष देतात म्हणूनच पन्हाळा किल्ल्यावर छत्रपती महाराणी ताराराणी बाईसाहेब यांचे जागतिक दर्जाचे स्मारक व्हावे असे डॉ. जयसिंगराव पवार यांचे स्वप्न होते. दुर्दैवाने त्यांच्या हयातीत हे स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही.
आता त्यांच्या निधनानंतर त्यांचे हे अपूर्ण स्वप्न पूर्ण करण्याचा निर्धार पुण्यातील शिव शंभू प्रतिष्ठानचे अध्यक्ष महेश कदम आणि सरहद परिवाराचे मयुर मसूरकर यांनी आज एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे व्यक्त केला. या स्मारकात छत्रपती महाराणी ताराराणी यांचा अश्वारूढ पुतळा आणि स्मारक उभारण्यात येणार असून यासाठी छत्रपती शाहू महाराज आणि याविषयातील तज्ञांचे मार्गदर्शन घेण्यात येईल. या स्मारक उभारणीस शासनाने विलंब न लावता परवानगी द्यावी असे आवाहन महेश कदम आणि मयुर मसूरकर यांनी केले आहे.





