*अतिवृष्टीने नुकसान झालेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या*
*आमदार सतेज पाटील यांची मागणी*
*कोल्हापूर :* जिल्ह्यातील अतिवृष्टी व पूरपरिस्थितीमुळे तब्बल ३५२ हेक्टर क्षेत्रातील ऊस, भात, भाजीपाला व इतर पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून शेतकऱ्यांपुढे उपजीविकेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या अशी मागणी काँग्रेसचे विधानपरिषदेचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्याकडे सोमवारी केली आहे.
पिकांच्या झालेल्या नुकसानीचा तातडीने पंचनामा करा, पंचनाम्यानंतरचा अहवाल त्वरीत शासनाकडे पाठवून शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्ती मदत निधीतून आर्थिक मदत द्यावी, नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नव्याने पीककर्ज मिळण्यासाठी मदत करा, शेतकऱ्यांना बियाणे व खते अनुदानावर उपलब्ध करून द्यावेत, जेणेकरून परतीच्या पिकांची पेरणी करता येईल अशी मागणी आमदार पाटील यांनी केली आहे. अतिवृष्टी व पुरामुळे शेतकरी हतबल झाले आहेत. तातडीची मदत व आधार मिळाल्यास त्यांचा आत्मविश्वास वाढेल. शासन व प्रशासनाने याकडे सहानुभूतीपूर्वक पाहून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणीही आमदार पाटील यांनी केली आहे.