गद्दाराला गाढायलाच पवारांनी मला दिली उमेदवारी
नंदाताई बाभुळकर यांनी घातली मतदारांना साद
कोल्हापूर
शरद पवार यांच्या पाठीत खंजीर खुपसून ते सत्तेत गेले. आज मतदार संघात 1600 कोटी रुपयांचा निधी आणल्याचा डंका त्यांच्याकडून पिटला जात आहे, पण हा विकास केवळ कंत्राटदरांचाच झाला आहे, त्यामुळे कंत्राटदारांचा विकास करणाऱ्या गद्दाराला गाडायला शरद पवार यांनी मला उमेदवारी दिली आहे, यासाठी तुमचे बळ मला द्या असे आवाहन करतानाच चंदगड मतदार संघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार नंदाताई बाबुळकर यांनी विरोधी उमेदवार आमदार राजेश पाटील यांच्यावर जोरदार निशाणा साधला.
राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या जंगी जाहीर सभेत बाभुळकर यांनी चंदगड विधानसभा मतदार संघात दादागिरी केली तर ताईगिरी काय असते हे मी दाखवून देईन असे आव्हान दिले. त्या म्ह्णाल्या, चंदगड विधानसभा मतदार संघातील जनता निष्ठावंत आहे. पाच वर्षापूर्वी भरलेलं ताट आम्ही दुसऱ्याच्या हातात दिलं. आम्ही प्रत्येकजण त्यांच्या विजयासाठी राबलो. पण, काही दिवसातच त्यांनी वेगळी वागणूक दाखविण्यास सुरूवात केली. ज्या शरद पवारांनी त्यांना मोठं केले, त्यांच्या पाठीत खंजीर खुपसला.
जुडेंगे तो जितेंगे
विरोधक अलिकडे बटेंगे तो कंटेंगे म्हणत आहेत, पण या विरोधकांचा बिमोड करण्यासाठी जुडेंगे तो जितेंगे हेच धोरण आता स्वीकारायला हवे. दिल्लीसमोर लोटांगण घालणाऱ्या या सरकारला महाराष्ट्र हद्दपार करूया असे आवाहन करून त्या म्हणाल्या, शरद पवार साहेब आणि बाबासाहेब कुपेकर यांची मैत्री अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे. शेवटच्या क्षणापर्यंत कुपेकर साहेब यांनी शरद पवार यांना साथ दिली. यापुढे तुम्ही मला साथ द्यावी. मी तुम्हाला सोडून कुठंही जाणार नाही,
संध्यादेवी कुपेकर यांनी चंदगडकरांना भावनिक साद घालताना चंदगडच्या विकासासाठी नंदाला तुमच्या स्वाधीन करत असल्याचे सांगितले. आपली लेक कधीच आपल्याला नाराज करणार नाही असे सांगत कुपेकरांचे सामाजिक कामाचे अनुवंशिक गुण नंदाताईमध्ये असल्याचे त्यांनी सांगितले.





