गजानन बेकरी चे संस्थापक विठ्ठल बाबाजी माळी यांचे प्रेरणादायी जीवन कार्य
विठ्ठल, विठ्ठल म्हणजे भगवान विष्णूचे रूप । भाग्य दाता, सदैव आनंद देणारा… असाच एक विठ्ठल आपल्यात होता. ज्याने स्वतः अहोरात्र कर्माच्या विटेवर उभे राहून उद्योग यशाचा मळा फुलवला. हा विठ्ठल म्हणजे गजानन बेकरीचे संस्थापक मा. श्री. विठ्ठल बाबाजी माळी.’
वयाच्या अवघ्या पाचव्या वर्षी आईविना पोरक्या झालेल्या विठ्ठलास त्यांच्या तिघी बहिणींनी सांभाळले. मोठ्या बहिणीचे लग्न झाले आणि अवघ्या बाराव्या वर्षी हा विठ्ठल परत एकदा एकटा पडला. रडून बेजार झालेल्या विठूला बहिण घरी घेऊन आली आणि त्यांचे पहिले पाऊल मेहुण्यांच्या महालक्ष्मी बेकरीत पडले. पहाटे पाचला उठून बेकरीत जावे नंतर शाळा करावी परत बेकरीत येऊन गुमान काम करावेः सगळीकडेच कडक शिस्त. कधी कधी हाताऐवजी पाठीत लाडू भेटायचे पण विठ्ठलच हा… फी अभावी शाळा सोडावी लागली.
पोटात कडकडून भूक लागली असताना हातातला वडापाव ठेवायला लागला, तरी हा विठ्ठल हसत होता. ‘आपण फसायचे नाही, दुसऱ्याला फसवायचे नाही हे तत्व सांभाळत खेमराज, हिंदुस्तान, इस्माईल, बेकरी इथे काम करून तयार होत होता. विठ्ठल उपवर झाला. घर नाही, नोकरी नाही, धंदा नाही अशा विठ्ठलाला केवळ व्यक्तिमत्त्वावर व मावशीच्या शब्दावर कांडगावची रुक्मिणी मिळाली. भरल्या चुड्याने या माऊलीने चिखल मातीने भट्टी सारवली. “ज्याचं शिराव घर त्याचा करावा नेटका संसार”, असे म्हणत या रुक्मिणीने विठ्ठलाला तन मन धनाने साथ दिली. आपल्या या रामाच्या वनवासात सीता बनून राहिली. येईल ती परिस्थिती स्वीकारली. आळस नाही कंटाळा नाही फक्त प्रामाणिक कष्ट, “छळून घ्या संकटांनो संधी पुन्हा मिळणार नाही, करपुराचा देह माझा जळून पुन्हा जळणार नाही.” असे संकटांना सांगत दोघे ठामपणे उभे राहिले. घर नाही, बेकरीला परवानगी नाही अशा संकटात धावा केला तो जगत जननी रेणुकाचा. माता रेणूका हाकेला धावली, नवसाला पावली, यशाची गंगा दारी आली.
असलेलं पुरवायचं, टिकवायचं आणि वाढवायचं या तत्त्वाने गजानन बेकरी उभी राहीली. गजानन महाराजांच्या कृपेने रविवार पेठेसोबतच, टाकाळा येथे देखील स्वतःचा व्यवसाय झाला. लाकडी भट्टी पासून सुरुवात करत सुसज्ज यंत्रणेपर्यंत पोहोचला संपूर्ण बेकरी उत्पादन बनवत व्यवसाय चोख केला. माळयाच्या विठ्ठलाने आपल्या हिमतीच्या जोरावर करवीर नगरीत बेकरी उद्योगाची पंढरी निर्माण केली, माळी परीवाराच्या कष्टाचे फलीत म्हणजेच गजानन बेकरी हा बेकरी क्षेत्रातील करवीर नगरीचा महाब्र ड बनला.. स्वच्छता, टापटिपपणा, प्रामाणिकपणा, सचोटी अशा अनेक गुणांसह बेकरी उद्योगाचा वसा श्री. विठ्ठल यांनी आपल्या उत्तम आणि उदय या दोन्ही मुलांना दिला. आलेल्या सूनाही कारभारात साथ देत कारभारीन बनल्या.
अयशस्वी शब्दातील अचा फरक पार करत श्री. विठ्ठल यशस्वी बनले. कर्तृत्वाच्या पंढरीत दातृ त्वचा मळा फुलवत अनेक ठिकाणी सढळ हाताने त्यांनी अर्थिक मदत केली.
पाय असावे जमिनीवरती कवेत अंबर घेताना,
गहिवर यावा जगास साऱ्या निरोप शेवटचा देताना….
असे म्हणत आपल्या कार्यकर्तृत्वाची प्रेरणा देत, गजानन बेकरी रुपी तेवता दीपस्तंभआपल्या मुलांना देवून, श्री. विठ्ठल बाबाजी माळी आनंतात विलीन झाले….
त्यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनी विनम्र अभिवादन..
शब्दांकन- श्री. संतोष दत्तात्रय माळी
सर 7385766637