गोकुळची आगामी निवडणूक महायुतीच्या झेंड्याखालीच
खासदार धनंजय महाडिक यांची माहिती, सतेज पाटील यांनीच गोकुळात राजकारण केलं
कोल्हापूर : गोकुळ दूध संघाची आगामी निवडणूक महायुतीच्या झेंड्याखालीच लढवली जाईल, त्यामध्ये मंत्री हसन मुश्रीफदेखील असतील अशी माहिती खासदार धनंजय महाडिक यांनी आज पत्रकार बैठकीत दिली. दरम्यान, गोकुळ मध्ये पक्षीय राजकारणाची सुरूवात आमदार सतेज पाटील यांनीच केली असा आरोपही त्यांनी केला.
खासदार महाडिक यांनी सांगितले की, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुतीच्या वतीने लढविण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. यामुळे जिल्हा परिषद, महापालिका निवडणुका महायुतीच्या वतीनेच होतील. गोकुळचा चेअरमन आता महायुतीचा झाला आहे. यामुळे आगामी निवडणूक महायुतीच्या वतीनेच होईल. मंत्री मुश्रीफ हे महायुतीत आहेत. त्यामुळे ते आमच्या सोबतच असतील.
काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सतेज पाटील यांनीच संघात पक्षीय राजकारण आणल्याचा आरोप करताना खासदार महाडिक म्हणाले, गोकुळच्या गेल्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून दबावतंत्र टाकत निवडणूक जिंकली. त्याचेच पडसाद आता उमटले आहेत. महादेवराव महाडिक आणि पी एन पाटील यांची सत्ता असताना गोकुळच्या एकूण ठेवी किती होत्या आणि आता किती ठेवी आहेत हे त्यांनी जाहीर पणे सांगावे असे आव्हान देतानाच गेल्या निवडणुकीत त्यांनी वासाच्या दुधाचा मुद्दा लावून धरला होता. त्यांची सत्ता आल्यानंतर त्यांनी वासाचे दूध किती प्रमाणात लोकांना परत केले ? याचे उत्तर द्यावे अशी मागणी त्यांनी केली.
गेल्या चार वर्षांमध्ये त्यामध्ये दोन हजारांहून अधिक संस्था वाढल्या. वाढलेल्या संस्थेच्या तुलनेत दुधाचे प्रमाण किती वाढले असा सवाल करून ते म्ह्णाले, निवडणूक आणि मतावर डोळा ठेवून त्यांनी संस्था वाढवल्या. मात्र, त्यांच्या या कारभाराचा फटका प्रामाणिक दूध उत्पादकांना बसत आहे.
महाडिक म्हणाले, ग्राहकांच्यावर कसलाही आर्थिक बोजा न टाकता दूध उत्पादकांना ज्यादा दूध दर देण्याची त्यांनी ग्वाही दिली होती आता ते अकरा रुपये दूध दरवाढ केली म्हणतात मात्र हे दूध दरवाढ ग्राहकांच्या माथी मारुन केले आहे. असा टोलाही त्यांनी मारला.
चौकट
गोकुळच्या अध्यक्षपद निवडीवरून ज्या काही घडामोडी घडल्या, त्या कुठल्याही प्रक्रियेत माझा सहभाग नव्हता असे स्पष्ट करतानाच आमदार पाटील यांनी शशीकांत पाटील यांचा राजकीय बळी दिला असा आरोपही त्यांनी केला.