‘गोकुळ’मध्ये सहकार मंत्रालय स्थापना सप्ताह व आंतरराष्ट्रीय सहकार दिन उत्साहात साजरा…
विविध उपक्रमांचे आयोजन
कोल्हापूर, ता. ५ : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्या., कोल्हापूर (गोकुळ) यांच्या वतीने भारत सरकारच्या सहकार मंत्रालयाच्या स्थापना सप्ताह (दि. २५ जून ते ६ जुलै २०२५) व आंतरराष्ट्रीय सहकार दिनानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. यावर्षीची थीम “सहकार सर्वांसाठी चांगले भविष्य घडवतात” अशी आहे, या संकल्पनेला अनुसरून हा कार्यक्रम झाला.
गोकुळच्या ताराबाई पार्क येथील कार्यालय येथे विविध विभागांचे माहिती स्टॉल्स उभारण्यात आले होते. यामध्ये गोकुळचे दुग्धजन्य पदार्थ, महालक्ष्मी पशुखाद्य, आयुर्वेदिक उपचार व उत्पादने, महिला डेअरी सहकारी नेतृत्व विकास कक्ष, स्लरी उत्पादने आदींचा समावेश होता. स्टॉल्सचे उद्घाटन जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) निळकंठ करे आणि सहाय्यक निबंधक (दुग्ध) प्रदीप मालगावे यांच्या हस्ते झाले. जिल्ह्यातील दूध उत्पादक, संस्थांचे सचिव, महिला स्वयंसेविका, गोकुळचे अधिकारी, कर्मचारी तसेच सहकार विभागातील मान्यवरांनी या स्टॉल्सना भेट दिली.
उद्घाटन प्रसंगी बोलताना जिल्हा उपनिबंधक निळकंठ करे म्हणाले कि, “गोकुळ ही केवळ दुग्ध संस्था नाही तर सहकार क्षेत्रातील एक आदर्श मंदिर आहे. संस्थेने दर्जेदार सेवा, आर्थिक पारदर्शकता आणि ग्रामीण विकासाच्या माध्यमातून सहकार मूल्यांची सातत्याने जपणूक केली आहे.” दरम्यान, दि. ५ जुलै रोजी आंतरराष्ट्रीय सहकार दिनाचे औचित्य साधून गोकुळच्या ताराबाई पार्क कार्यालयात सहकार ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला. ध्वजारोहण संघाचे माजी चेअरमन व ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील यांच्या हस्ते तसेच संचालक मंडळाच्या उपस्थितीत संपन्न झाले.
यावेळी मनोगत व्यक्त करताना संघाचे ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील म्हणाले, “गोकुळ ही संस्था केवळ दूध संकलनापुरती मर्यादित नसून, ग्रामीण भागातील सहकाराची प्रेरणा आहे. या उपक्रमांमुळे सहकाराची मूल्ये अधिक दृढ होण्यास हातभार लागला आहे. या सप्ताहाअंतर्गत ‘सहकार’ या विषयावर डॉ. एम. पी. पाटील यांचे अभ्यासपूर्ण व्याख्यानही आयोजित करण्यात आले.
प्रदर्शनात गोकुळच्या महिला विकास व बचत गट तसेच गोकुळच्या दूध उत्पादनांच्या स्टॉलला चांगला प्रतिसाद मिळाला. महिला गटाच्या स्टॉलवर सुमारे ३५ हजार तर गोकुळच्या दूध उत्पादनांच्या स्टॉलवर १५ हजार अशी एकूण ५० हजार रुपयांची उलाढाल झाली. हा उपक्रम महिलांच्या स्वावलंबनासोबतच गोकुळच्या दर्जेदार उत्पादनांप्रती ग्राहकांचा विश्वास अधोरेखित करणारा ठरला.
संघाचे चेअरमन नविद मुश्रीफ यांनी गोकुळचे दूध उत्पादक, दूध संस्था, ग्राहक, वितरक, कर्मचारी, हितचिंतक यांना आंतरराष्ट्रीय सहकार दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
यावेळी संघाचे माजी चेअरमन व ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील, अरुण डोंगळे, संचालक संभाजी पाटील, प्रकाश पाटील, बयाजी शेळके, बाळासो खाडे, संचालिका श्रीमती अंजना रेडेकर, जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) निळकंठ करे, सहाय्यक निबंधक (दुग्ध) प्रदीप मालगावे, सहाय्यक निबंधक चंद्रकांत निंबाळकर, सहाय्यक निबंधक इसुफ शेख, कार्यकारी संचालक डॉ.योगेश गोडबोले, जिल्हा महिला नेतृत्व विकास अधिकारी मृण्मयी सातवेकर, डॉ.व्ही.डी.पाटील, डॉ, विजय मगरे, हनमंत पाटील, अधिकारी, कर्मचारी, दूध उत्पादक संस्थांचे सचिव व प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
—————————————————————————————————-
फोटो ओळ – यावेळी संघाचे माजी चेअरमन व ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील, अरुण डोंगळे, संचालक संभाजी पाटील, प्रकाश पाटील, बयाजी शेळके, बाळासो खाडे, संचालिका श्रीमती अंजना रेडेकर अधिकारी व कर्मचारी दिसत आहेत.
—————————————————————————————————-