Spread the news

म. फुले द्विजन्मशताब्दी वैचारिक प्रबोधन व विवेकी कृतिशील कार्यक्रमाने साजरे करणार

­

 

म. फुले द्विजन्मशताब्दी संयोजन समितीच्या बैठकीत निर्धार

  •  

11 एप्रिल रोजी भव्य अभिवादन दिंडीने सुरुवात

सामाजिक न्याय परिषद, साहित्य संमेलने, शेतकरी परिषद, शिक्षण हक्क परिषद,स्त्री मुक्ती परिषद, सांस्कृतिक महोत्सव, पुस्तके प्रकाशन व वाटप,सेमिनार व 1000 व्याख्याने आयोजनाचा निर्धार

महात्मा फुले यांनी महाराष्ट्राला सामाजिक आर्थिक समतेचा विचार दिला. सत्यशोधक समाजाच्या माध्यमातून त्यांनी समाजाला धर्म परंपरा यांची समतेच्या मूल्यावर चिकित्सा करण्याची शिकवण दिली. छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली.कोल्हापुरात या चळवळीच्या प्रेरणेतून राजर्षी शाहू महाराजांनी शिवाजी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. शाहू महाराजांनी आपल्या धोरणातून सामाजिक न्यायावर आधारित राज्याची निर्मिती केली. पुढे डॉ. बाबासाहेब आंबेडकर समतेच्या या विचाराची संविधानात व्यापक समावेश केला. छत्रपती शिवाजी महाराज व फुले शाहू आंबेडकरांचे हे वैचारिक अतुल वैचारिक नात्यातून आधुनिक महाराष्ट्र घडला आहे. मात्र हा समतेच्या विचाराची सध्या पीछेहाट होताना दिसत आहे. म्हणून महात्मा फुले यांच्या द्विजन्मशताब्दीच्या माध्यमातून विचारांचा जागर करत महाराष्ट्र घडवूया असा निर्धार शासकीय विश्रामगृह येथील राजर्षी शाहू महाराज सभागृहात झालेल्या बैठकीत कोल्हापुरातील पुरोगामी शैक्षणिक सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रातील संघटना व अभ्यासकांनी केला.अध्यक्षस्थानी माजी कुलगुरू माणिकराव साळुंखे होते.
यावेळी द्विजन्मशताब्दी च्या सुरुवातीस शनिवार 11 एप्रिल जयंतीदिनी सकाळी ९.३० वा. बिंदू चौक ते छ. शाहू समाधी स्थळ अशी महात्मा फुले अभिवादन ग्रंथ दिंडी काढण्याचे ठरविण्यात आले.
यावेळी माजी खासदार राजू शेट्टी, माजी संमेलनाध्यक्ष लेखक लक्ष्मीकांत देशमुख, सरोज पाटील , डॉ. माणिकराव साळुंखे यांनी बोलताना “महात्मा फुले यांनी आपल्या वाङ्ममय व कृतीतून संपूर्ण देशाला स्त्री-पुरुष समता, शेतकरी मुक्ती, बहुजन समाजाचे मुक्ती, परस्पर बंधुभाव, शिक्षण हक्क, जाती अंत, धर्मचिकित्सा, धार्मिक सौहार्द याची शिकवण दिली. कोल्हापूर जिल्ह्याने हा विचार दोन शतक जोपासून महात्मा फुलेंना खऱ्या अर्थाने अभिवादन केले आहे” अशी मांडणी केली. त्यांच्या द्विजन्मशताब्दी निमित्त केवळ गाजावाजा न करता वैचारिक प्रबोधन व कृतिशील कार्यक्रमातून नव्या पिढीपर्यंत व घरोघरी महात्मा फुले यांचा समतेचा व सामाजिक न्यायाचा विचार पोहचवा असे आवाहन केले.
गिरीश फोंडे, वसंत मुळीक, राजा कांदळकर,भारती पवार,चंद्रकांत यादव संदीप देसाई, कादर मलबारी, बाबुराव कदम, सीमा पाटील, अनुराधा भोसले, बाबासाहेब देवकर, शाहीर दिलीप सावंत यांनी “सांस्कृतिक, सामाजिक, शेतकरी, महिला, कामगार यांच्या समित्या स्थापन करून त्याद्वारे साहित्य संमेलने, सांस्कृतिक महोत्सव, कला महोत्सव, फिल्म फेस्टिवल, आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय सामाजिक न्याय परिषद, प्रत्येक कॉलेजमध्ये व्याख्यान व सेमिनार, विद्यार्थ्यांसाठी पॉकेट बुक, महात्मा फुले यांचे संक्षिप्त चरित्र, वक्ता प्रशिक्षण शिबिर, नाटक ,एकपात्री प्रयोग, एकांकिका, सत्यशोधक व आंतरजातीय विवाह यांचे आयोजन करूया” असे आवाहन केले.
राजू शेट्टी यांनी जयसिंगपूर येथे विविध शेतकरी संघटनांना घेऊन शेतकरी परिषद घेऊन त्याद्वारे महात्मा फुले यांचा शेतकरी मुक्तीचा विचार मांडण्याची भूमिका सांगितली.
मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष राहुल पवार, इतिहास संशोधक डॉ.जे.के.पवार, शिवाजी विद्यापीठातील प्राध्यापक रणधीर शिंदे, डाएट चे माजी प्राचार्य श्री आय.सी.शेख सर यांनी महात्मा फुले यांचे समग्र वाड्मय पुन:प्रकाशित करणे व त्यांचे साहित्य हे आजच्या संदर्भामध्ये विश्लेषण करून नवीन पिढीसमोर, महिलांसमोर व तंत्रस्नेही शिक्षकांद्वारे अभ्यासकांनी नेले पाहिजे असे सांगितले.
कॅप्टन उत्तम पाटील, भारती पवार, कादर मलबारी यांनी कार्यक्रमांसाठीआर्थिक देणगी जाहीर केली.
अजय दळवी व प्रशांत जाधव यांनी चित्रकला स्पर्धा, सांस्कृतिक महोत्सव, पत्रलेखन, रांगोळी स्पर्धा, विविध कला स्पर्धा यांद्वारे महात्मा फुलेंचे विचार समाजापर्यंत पोहोचवण्याची आवाहन केले.
यावेळी आनंद माने, दिलीप पवार, रवी जाधव, स्वप्नाच्या घाटगे,प्रकाश पाटील, अनिल चव्हाण, संभाजी जगदाळे, सुधाकर सावंत,उत्तम पाटील, रघुनाथ वायदंडे, महेश जाधव, लक्ष्मण देशमुख, आनंदराव चौगुले, प्रशांत आंबी, उमेश देसाई, अभय कुमार गायकवाड, अभिजीत कांबळे यांनी देखील मनोगताद्वारे सूचना केल्या.
यावेळी कामगार नेते वसंत डावरे, डॉ.प्रशांत पाटील,रुपेश पाटील, विश्वास पवार, शिवाजी कांबळे, रमेश वडणगेकर, डॉ. प्रमिला जरग, डॉ.बाबुराव घुरके, आरती रेडेकर, भारत धोंगडे,कृष्णा पानसे, धनश्री पोळ, प्रवीण कांबळे यांच्यासहित कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Spread the news

You may also like

error: Content is protected !!