केंद्र सरकारच्या विविध योजनांचा अभ्यास करून शेतकऱ्यांनी कमी खर्चात जास्त उत्पादनावर भर द्यावा भीमा कृषी प्रदर्शनात खासदार धनंजय महाडिक यांचे आवाहन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मिलेट ची संकल्पना आणली आहारामध्ये मिलेटचा वापर करावा खासदार धनंजय महाडिक यांचे आवाहन
आधुनिक तंत्रज्ञानाचा ड्रोन टेक्नॉलॉजीचा वापर शेतकऱ्यांनी शेतीमध्ये करावा खासदार धनंजय महाडिक यांचे आवाहन
भारतातील सर्वात मोठा पाच फुटाचा इग्वाना (सरडा) कृषी प्रदर्शनाचे खास आकर्षण पाहण्यासाठी पहिल्याच दिवशी गर्दी
पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे व भव्य असे भिमा कृषी व पशु प्रदर्शनाचे थाटात उद्घाटन
कोल्हापूर/प्रतिनिधी : कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना नवनवीन तंत्रज्ञान ऑरगॅनिक शेतीवर भर कसा द्यावा यावर वेगवेगळ्या पद्धतीचे मार्गदर्शन नेहमीच भीमा कृषी प्रदर्शनात मिळते शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करण्यासाठी केंद्र सरकारच्या योजनांचा अभ्यास करून शेतकऱ्यांनी शेतीवर अधिक भर द्यावा असे आवाहन खासदार धनंजय महाडिक यांनी भीमा कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मिलेटची संकल्पना आणली आहारामध्ये मिलेटचा वापर होणे गरजेचे असल्याचे मतही खासदार धनंजय महाडिक यांनी यावेळी व्यक्त केले.
याचबरोबर आधुनिक तंत्रज्ञानाचा ड्रोन टेक्नॉलॉजीचा वापर शेतकऱ्यांनी शेतीमध्ये करावा खासदार धनंजय महाडिक यांनी आवाहन केले.
खासदार धनंजय महाडिक यांच्या संकल्पनेतून सुरू झालेले पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात भव्य अशा भिमा कृषी व पशु प्रदर्शनाचे आज फीत कापून थाटात उद्घाटन संपन्न झाले.यावेळी अध्यक्षस्थानी माजी आमदार महादेवराव महाडिक यांची उपस्थिती होती.
यावेळी बोलताना खासदार धनंजय महाडिक यांनी केंद्र सरकारच्या विविध योजनांचा अभ्यास करून शेतकऱ्यांनी कमी खर्चात जास्त उत्पादनावर द्यावा असे सांगितले. खासदार धनंजय महाडिक यांनी यावेळी शेतीमध्ये नवे प्रयोग, बदल स्वीकारण्यासाठी आवश्यक माहितीपूर्ण असणाऱ्या भीमा कृषी प्रदर्शनास शेतकऱ्यांनी आवर्जून भेट द्यावी असे आवाहन भीमा कृषी प्रदर्शनात उद्घाटनप्रसंगी केले. शेतकरी म्हटले की नुकसान आणि कृषी क्षेत्र म्हटले की तोटा हे नेहमी ऐकत आलो आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या बघत आलो आहे. यामुळेच गेल्या अठरा वर्षांपूर्वी भीमा कृषी प्रदर्शन शेतकऱ्यांसाठी सुरू केले. आज या प्रदर्शनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना नवनवीन माहिती तंत्रज्ञान याची माहिती मिळते. कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून नवनवीन काहीतरी देण्याचा प्रयत्न दरवर्षी असतो. नवनवीन बी बियाणे, ड्रोन टेक्नॉलॉजी, एआय चा वापर करून सेंद्रिय शेती कशी करावी,यावर भर दिला जातो. असे परिपूर्ण प्रदर्शन गेले अठरा वर्षे सातत्याने भरवले जात आहे असे सांगितले.
*चौकट*
राज्यात केंद्रात महायुतीची सत्ता आली तसेच आता कोल्हापूर जिल्ह्यात देखील महायुतीने चांगली कामगिरी केलेली आहे.महायुतीच्या माध्यमातून भरपूर प्रकल्प कोल्हापूरला मिळणार आहेत तसेच कोल्हापूर मुंबई विमानसेवा दोन वेळा सुरुवात झाली असून कोल्हापूर मिरज दुहेरी मार्गासाठी ९८४ कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत. तसेच आमदार अमल महाडिक यांच्या प्रयत्नातून आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्टेडियम कोल्हापुरात होणार आहे तसेच सर्किट बेंचचा पाठपुरावा केल्याने आज कोल्हापूरला सर्किट बेंच मिळाले आहे अजून नवनवीन अशी १५ कार्यालय कोल्हापुरात येणार असून रोजगाराच्या प्रचंड संधी उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे कोल्हापूरचा चेहरा मोहरा महायुतीच्या काळात बदलला जाणार आहे अशी ग्वाही खासदार धनंजय महाडिक यांनी दिली.
तर महायुतीचा महापौर म्हणून आपण जबाबदारी स्वीकारली असून, कोल्हापूरच्या प्रलंबित प्रश्नांवर कायमस्वरूपी तोडगा काढण्याचा आपला प्रयत्न राहणार आहे. केंद्रातील आणि राज्यातील नेत्यांचं मार्गदर्शन आणि खासदार धनंजय महाडिक, नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या सहकार्यातून विविध प्रकल्प राबवून येत्या दोन वर्षात शहराचा कायापालट करू, अशी ग्वाही महापौर रूपाराणी निकम यांनी दिली.
कोल्हापूर महापालिकेच्या नूतन नगरसेवकांचा सत्कार चॅनेल बी चे व्यवस्थापकीय संचालक पृथ्वीराज महाडिक आणि युथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांच्या हस्ते करण्यात आला.भिमा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विश्वराज महाडिक यांनी आभार मानले.
उद्घाटनप्रसंगी माजी आमदार महादेवरावजी महाडिक, उद्घाटनप्रसंगी विशेष अतिथी म्हणून महापौर सौ. रूपाराणी निकम,उपमहापौर श्री अक्षय जरग यांची उपस्थिती उपस्थिती होती.भाजपा प्रदेश सचिव श्री.महेश जाधव, भाजपा जिल्हाध्यक्ष मा. श्री. नाथाजी पाटील, गोकुळ संचालक अमरीश घाडगे, भागीरथी महिला संस्था अध्यक्षा मा. सौ. अरुंधती महाडिक,नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य,पंचायत समिती सदस्य,महापालिका नगरसेवक आदींची उपस्थिती होती.यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विविध पुरस्कार देण्यात आले.भीमा कृषी महिलांसाठी जिजामाता पुरस्कार देण्यात आले. यामध्ये मुक्काम पोस्ट नांदोली येथील सौ विद्या बळीराम पाटील, कागल येथील सौ वंदना दिनेश मुसळे, जळगाव येथील सौ.उषा विठ्ठल पाटील, मळगे खुर्द येथील सौ प्रज्वला पांडुरंग आडमूळ, मौजे सांगाव येथील सौ जयश्री आप्पासाहेब पाटील यांचा समावेश आहे.तर भीमा कृषी शेतीभूषण पुरस्कार मध्ये महाळुंगे येथील संभाजी शिवाजी चौगुले, काळजवडे येथील श्री रामचंद्र धोंडीराम पाटील, पोरले येथील मी बाजीराव दगडू साळुंखे, नुल येथील श्री प्रकाश बाबुराव सावंत आदिना पुरस्कार देण्यात आले. आदर्श शेतकरी पुरस्कार चौडाळ येथील श्री युवराज विष्णू पाटील, अकलूर येथील श्री अनिकेत साताप्पा माने, स्वानापुर अमोल आनंदराव पाटील, सरवडे येथील श्री जयसिंग अनंत पाटील, इंजोळे येथील मानसिंग राजाराम पाटील, जाधववाडी येथील रघुनाथ पांडुरंग जाधव आदींना पुरस्कार देण्यात आले.तर युवा शेतकरी पुरस्कार सुळकुड येथील प्रदीप यलगोंडा खोत, वाळकेवाडी येथील किशोर संभाजी कुंभार, तिरपन येथील श्री शरद बाजीराव पाटील यांना पुरस्कार देण्यात आले.
*भारतातील सर्वात मोठा अमेरिकन सरडा प्रदर्शनाचे खास आकर्षण*
*भारतातील सर्वात मोठा अमेरिकन आठ वर्षाचा साडेपाच फुटाचा इग्वाना (सरडा,चार वर्षाचा आणि पाच महिन्याचा सरडा आकर्षण आहे. हे तीन सरडे प्रदर्शनात आणण्यात आला असून हे तीन सरडे प्रदर्शनाचे खास आकर्षण आहेत. पहिल्याच दिवशी सरडा पाहण्यासाठी लोकांनी, शेतकऱ्यांनी गर्दी केली होती. प्रदर्शनात आलेला हिरवा सरडा चार महिन्याचा असून त्याची लांबी दोन फूट आहे चार वर्षानंतर तो चार फुटाचा आणि आठ वर्षानंतर तो सहा फुटाचा होतो. यात पाच महिन्याचा सरडा पाव किलो वजनाचा आहे.चार वर्षाचा सरडा चार फुटाचा ९ किलो वजनाचा आहे. तर आठ वर्षाचा सरडा पाच फुटाचा असून त्याचे वजन २२ किलो आहे. हे पूर्ण शाकाहारी असून भोपळा, कोथिंबीर, मेथीची भाजी, आणि अन्य भाजीपाला खातात. दिवसातून दोन वेळा सकाळी दहा वाजता आणि रात्री आठ वाजता त्यांना खाद्य पदार्थ द्यावे कोल्हापूर मधील किशोर वसंत चव्हाण सध्या मुंबईत राहत असून त्यांनी मुंबई येथे हे सरडे लहानपणापासून पाळले आहेत. या सरड्यांना मालकाची बोलीभाषा समजते हे सरडे विषारी नसून ते वर्षातून दोन वेळा ३५ अंडी घालतात. यांचे रक्त थंड असल्याने त्यांना उष्णतेची गरज असते.*
शेतकऱ्यांना शेतीसाठी उपयुक्त असलेली माहिती मिळणारे व शेतीसाठी आवश्यक असणारे साहित्य एकाच छताखाली खरेदी करता याव्यात यासाठी १८ वे भव्य कृषी व पशूप्रदर्शन मेरी वेदर मैदानावर १३ ते १६ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत भरविण्यात आले आहे. प्रदर्शनामध्ये अमेरिकन शेळ्या, बोकड, असे खास आकर्षण आहेत तर खास सांगोला, दहिवडीवरुन जातिवंत खिल्लार खोंड व खिल्लार गायी सहभागी झाल्या आहेत. परभणी, नांदेड, लातूर येथून लालकंधारी व देवणी, एच एफ जर्शी, साहिवाल, गिर इत्यादी जातीची खोंड, गाई आल्या आहेत, तसेच पंढरपुरी मुह्रा, मेहसाना, जाफराबादी म्हैस, रेडे सहभागी आहेत. तर जातिवंत घोडे, शेळ्या, मेंढ्या, वराह, विविध जातीच्या कोंबड्या तसेच विविध जातीचे पक्षी आले आहेत.
या प्रदर्शनामध्ये देश-विदेशातील विविध नामांकित कंपन्यांचा सहभाग प्रदर्शनात आहे यामध्ये प्रॉम्प्ट इक्विपमेंट प्रा. लि., कर्नाटका सोप ॲन्ड डिटर्जंट लि., डेक्कन फार्फ ईक्विपमेंट प्रा. लि, टाटा सोलर, ग्रीन प्लॅनेट बायो प्रॉडक्ट्स, लक्ष्मी पंप्स प्रा. लि., शेरखान लिमिटेड, चितळे उद्योग समूह, राजाराम बापू सहकारी दूध संघ, सावंत ऑरगॅनिक फार्म, डीजे कोकोनट फॉर्म प्रा. लिमिटेड अश्या भरपूर नामांकित कंपन्या प्रदर्शनात सहभागी झाल्या आहेत तसेच कोल्हापूर ऑटोमोबाईल डिलर्स असोसिएशन यांनी देखील या प्रदर्शनामध्ये सहभाग घेतला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना विविध कंपन्यांची उत्पादने पाहावयास व खरेदी करता येणार आहेत.
प्रदर्शनात तांदूळ महोत्सव अंतर्गत विविध प्रकारचा तांदूळ उपलब्ध करण्यात आला आहे. यामध्ये आजरा घनसाळ, रत्नागिरी चोवीस, भोगावती, इंद्रायणी तसेच बाजरी, नाचणी, संद्रिय गुळ, हळद आदींची उपलब्धता करण्यात आली आहे.ज्याची पहिल्याच दिवशी मोठ्या प्रमाणात विक्री ही झाली आहे.आत्माच्या वतीने शेतकरी गट कंपन्यांची माहिती दिली जात आहे.शासनाच्या कृषी विभागामार्फत शेतीसाठी उपयुक्त तंत्रज्ञान, सेंद्रिय शेती,मत्स्यपालन कसे करावे याची प्रात्यक्षिके, ए. आय तंत्रज्ञान याची
दिली जात आहे. तसेच शासनाच्या विविध योजनांची माहिती याठिकाणी दिली जात आहे. विविध प्रकारचा स्थानिक आणि विदेशी भाजीपाला, ऊस, बी-बियाणे पाहावयास मिळत आहे. तरी शेतकऱ्यासाठी परिपूर्ण असणारे हे भीमा कृषी व पशू प्रदर्शन पाहण्यासाठी शेतकऱ्यांसह नागरिकांनी भेट द्यावी असे आवाहन खासदार धनंजय महाडिक यांनी केले आहे.
भागीरथी महिला संस्थेच्या वतीने मा. सौ. अरुंधती महाडिक यांच्या नेतृत्वाखाली महिला बचत गटाच्या माध्यमातून महिलांनी तयार केलेल्या उत्पादनांना दरवर्षी भिमा कृषी प्रदर्शनात संधी मिळते,यावर्षीही दोनशे बचत गट आपली विविध प्रकारची उत्पादने या स्टॉलद्वारे लावली आहेत. महिलांनी बनविलेल्या उत्पादनाला भिमा कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून थेट बाजारपेठ मिळवून दिली गेली आहे.याचबरोबर प्रदर्शनामध्ये शेतकऱ्यांना चार दिवस तज्ञ व्यक्तींकडून शेतीविषयक माहिती दिली जाणार आहे आणि वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत ज्याद्वारे स्थानिक कलाकारांना आपली कला सादर करण्याची संधी मिळाली आहे.
प्रदर्शनामध्ये उद्या दुपारी १२ ते ४ या वेळेत क्षारपड जमिनीची एकात्मिक सुधारणा नवी दिशा या विषयावर तर डॉ. संग्राम धर्माजी काळे सह प्राध्यापक, मृदा, शास्त्र ,कृषी संशोधन केंद्र, कसबा डिग्रज, जि.सांगली यांचे शेतकऱ्यांना मार्गदर्शन होणार आहे. आणि आंबा लागवड व काढणी पश्चात तंत्रज्ञान या विषयावर डॉ. केशव हरी पुजारी माजी प्रमुख फलोद्यान सहयोगी अधिष्ठाता डॉ.बाळासाहेब सावंत, कोकण कृषी विद्यापीठ दापोली हे मार्गदर्शन करणार आहेत.आज कराओके गीत गायन स्पर्धा हा सांस्कृतिक कार्यक्रम याठिकाणी पार पडला.
तर १४ फेब्रुवारी रोजी राधानगरी येथील गंध महाराष्ट्राचा हा कार्यक्रम होणार आहे.
यावर्षीच्या भिमा कृषी प्रदर्शनास कृषी विभाग व किसान कल्याण मंत्रालय, कृषी विभाग, महाराष्ट्र राज्य, पशुसवर्धन विभाग, आत्मा, जिल्हा परिषद कोल्हापूर, वृंदावन फाउंडेशन आणि कोल्हापूर ऑटोमोबाईल डिलर्स असोसिएशन यांचे विशेष सहकार्य लाभले आहे. प्रदर्शन चार दिवस सकाळी १० ते रात्री ९ वाजेपर्यंत खुले राहणार आहे.याचबरोबर लाईव्ह डेमॉस्ट्रेशन पहाण्यास मिळत आहे.
चार दिवस आयोजित करण्यात आलेल्या या कृषी व पशू प्रदर्शनाचा कोल्हापूर तसेच आजूबाजूच्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन खासदार धनंजय महाडिक यांनी केले आहे.



