Spread the news

परीक्षा केंद्रावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे रेकॉर्डिंग जतन करणे अनिवार्य

­

 

मंडळाकडून क्षेत्रीय अधिकारी व परीक्षा केंद्र संचालकांना निर्देश

  •  

फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये होत असलेल्या इयत्ता १० वी आणि १२ वीच्या बोर्ड परीक्षांमध्ये पारदर्शकता, शिस्त आणि गैरप्रकारांना प्रतिबंध करण्यासाठी राज्य आणि विभागीय मंडळाने कडक पावले उचलली आहेत. या पार्श्वभूमीवर, विभागीय मंडळाने सर्व परीक्षा केंद्र शाळांचे मुख्याध्यापक, प्राचार्य आणि केंद्रसंचालकांसाठी सीसीटीव्ही यंत्रणेच्या वापराबाबत व रेकॉर्डिंग जतन करण्याबाबत अत्यंत सविस्तर मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. या निर्देशांचे पालन न झाल्यास संबंधित जबाबदार व्यक्तींवर थेट कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

उच्च माध्यमिक (इ. १२ वी) परीक्षा १० फेब्रुवारी ते १८ मार्च २०२६ आणि माध्यमिक शालान्त (इ. १० वी) परीक्षा २० मार्च ते १८ मार्च २०२६ या कालावधीत लेखी परीक्षा होत आहेत. या संपूर्ण लेखी परीक्षेच्या कालावधीत परीक्षा केंद्राचा परिसर, परीक्षेशी संबंधित सर्व वर्गखोल्या, तसेच आयटी (IT) आणि सामान्यज्ञान (GK) विषयांच्या ऑनलाईन परीक्षांसाठी वापरल्या जाणाऱ्या संगणक प्रयोगशाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित ठेवणे अनिवार्य करण्यात आले आहे. केवळ कॅमेरे लावणे पुरेसे नसून, प्रत्येक पेपरच्या दिवशी परीक्षा सुरू होण्यापूर्वी किमान ३० मिनिटे आधी आणि परीक्षा संपल्यानंतरही (दिव्यांग विद्यार्थ्यांचा जादा वेळ विचारात घेऊन) रेकॉर्डिंग सुरू ठेवणे बंधनकारक राहील. परीक्षा कालावधीत पेपर सुरू होण्यापूर्वी दररोज आणि वेळोवेळी सीसीटीव्ही कॅमेरे सुरू आहेत अथवा नाहीत तसेच रेकॉर्डिंग होत आहे अथवा नाही याबाबत खात्री करण्यासाठी केंद्र संचालकांना सूचना देण्यात आल्या आहेत.

तांत्रिक सुस्पष्टतेसाठी मंडळाने निर्देशित केले आहे की, सर्व कॅमेरे नेहमी सातत्यपूर्ण रेकॉर्डिंग मोड ‘Continuous Recording Mode’ वरच असावेत आणि मोशन रेकॉर्डिंग ‘Motion Recording’ पूर्णपणे टाळावे. रेकॉर्ड केलेले फुटेज पेन ड्राईव्ह संगणकावर किंवा आवश्यकतेनुसार हार्ड डिस्क मध्ये पुढील आदेशापर्यंत जतन करून (साठवून) ठेवावे. आवश्यकतेनुसार क्लाउड स्टोअरेज (Cloud Storage) किंवा एक्सटर्नल हार्डडिस्कवर त्याचा बॅकअप घेणे बंधनकारक आहे. या तांत्रिक कामासाठी आयटी शिक्षक किंवा तंत्रस्नेही शिक्षकांची मदत घेण्याचे सुचवण्यात आले आहे.

कॅमेऱ्यांच्या तांत्रिक दर्जाबाबत मंडळाने स्पष्ट केले आहे की, कमी प्रकाशातही स्पष्ट चित्रण होईल अशी प्रकाशव्यवस्था असावी आणि प्रत्येक फुटेजवर दिनांक व वेळेचा (Date & Time Stamp) अचूक उल्लेख असावा. तसेच, वीजपुरवठा खंडित झाल्यास रेकॉर्डिंगमध्ये खंड पडू नये यासाठी संपूर्ण सीसीटीव्ही प्रणाली यूपीएस (UPS) किंवा इन्व्हर्टरला जोडलेली असावी, ज्यामुळे किमान २ तास बॅकअप मिळेल याची खात्री केंद्रसंचालकांनी करायची आहे. याबाबत परिपत्रकाद्वारे लेखी सूचना कोल्हापूर विभागीय सचिव सुभाष चौगुले आणि कोकण विभागीय सचिव पुनिता
गुरव यांनी निर्गमित केल्या आहेत.

सुरक्षेच्या दृष्टीने, जिल्हा दक्षता समिती, मंडळाने अथवा वरिष्ठ कार्यालयाने मागणी केल्यास परीक्षा केंद्रांनी सीसीटीव्हीचे ‘लाईव्ह एक्सेस’ (Live Access) उपलब्ध करून देणे अनिवार्य आहे. जर परीक्षा कालावधीत कॅमेरे बंद आढळले, फुटेज उपलब्ध करून दिले नाही किंवा एक्सेस नाकारला, तर हा प्रकार गैरमार्ग अवलंबण्याच्या उद्देशाने केल्याचे मानले जाईल. अशा परिस्थितीत संबंधित केंद्राचे प्राचार्य, केंद्रसंचालक आणि कर्मचारी बदललेल्या केंद्रांच्या बाबतीत केंद्रसमन्वयक यांच्यावर ‘महाराष्ट्र गैरमार्ग प्रतिबंध अधिनियम १९८२’ अन्वये कारवाई करण्यात येईल.

परीक्षा केंद्रांना भेटी देणारी भरारी पथके आणि बैठे पथके प्रत्यक्ष मॉनिटर स्क्रीनवर सीसीटीव्ही यंत्रणा कार्यरत असल्याची खात्री करतील आणि तसा अहवाल शिक्षणाधिकाऱ्यांना सादर करतील. विशेषता बैठ्या पथकांवर सीसीटीव्ही यंत्रणा सुरू असल्याची खात्री करण्याबाबत महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली आहे. एकूणच, संपूर्ण परीक्षा प्रक्रिया सीसीटीव्हीच्या तिसऱ्या डोळ्याच्या निगराणीखाली पार पाडण्यासाठी मंडळाने ही कडक नियमावली लागू केली आहे.

“राज्य मंडळाच्या निर्देशानुसार सर्व क्षेत्रीय अधिकारी व केंद्र संचालकांना याबाबत अवगत करण्यात आले आहे. मंडळाच्या पुढील आदेशापर्यंत परीक्षा कालावधीतील रेकॉर्डिंग परीक्षा केंद्रांनी जतन करणे अनिवार्य आहे.
-राजेश क्षीरसागर,
विभागीय अध्यक्ष,
कोकण व कोल्हापूर मंडळ.


Spread the news

You may also like

error: Content is protected !!