कागल तालुक्याला एकाचवेळी मिळालेली पदे हा केवळ योगायोग…!

Spread the news

कागल तालुक्याला एकाचवेळी मिळालेली पदे हा केवळ योगायोग…!

­

 

वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार हसन मुश्रीफ

  •  

राष्ट्रवादी जिल्हाभर वाढवण्याचा मी आयुष्यभर प्रयत्न केला…

कोल्हापूर, दि. १८:
कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व पदे कागल तालुक्याला एकाचवेळी मिळाली हा केवळ योगायोग आहे, असे स्पष्टीकरण वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केला. विशेषतः जनतेच्या मनामध्ये आणि कुठल्याही पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये अशी शंका असू नये, म्हणून मी प्रांजळपणे खुलासा करीत असल्याचेही, पत्रकात म्हटले आहे.

मंत्री हसन मुश्रीफ यांनी प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकातील मुद्दे असे……..

□ के. डी. सी. सी. बँक…….
कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची अध्यक्षपदाची निवड दि. २० जानेवारी २०२२ रोजी झाली होती. त्यावेळी ही जबाबदारी माझ्यावर सोपवू नये, अशी विनंती मी तत्कालीन आमदार कै. पी. एन. पाटीलसाहेब, आमदार विनय कोरे, आमदार सतेज उर्फ बंटी पाटील, माजी आमदार के. पी. पाटील, माजी आमदार राजेश पाटील, ए. वाय. पाटील इत्यादी प्रमुख नेतेमंडळी व संचालकांना मी केली होती. त्यावेळी आमदार कै. पी. एन. पाटील यांनी चेअरमन व्हावे, अशी मी सुचना केली होती. परंतु; आमदार कै. पी. एन. पाटील यांनी ‘मी आमदार आहे व भोगावती साखर कारखान्याचाही चेअरमन आहे. त्यामुळे ही जबाबदारी माझ्यावर देऊ नये. ही जबाबदारी श्री. मुश्रीफांनीच स्वीकारावी’, अशी त्यांनी विनंती केली होती. त्याचवेळी आमदार विनय कोरे यांनी ‘मुश्रीफांशिवाय पर्याय नाही’, असे सांगितल्यामुळे सगळ्या नेते मंडळींनी मला आग्रह केला आणि मी चेअरमन झालो. आता दहा वर्षाच्या बँकिंग रेग्युलेटरी ॲक्टमध्ये बदल झाल्यामुळे जेव्हा येत्या डिसेंबरमध्ये मुदत संपेल त्यावेळी हा माझा कार्यकाळ संपुष्टात येईल.

□ बाजार समिती………
त्यानंतर बाजार समितीच्या निवडणूकीच्या चेअरमन निवडीमध्ये हे पद रोटेशन पद्धतीने पहिल्यांदा आमदार कै. पी. एन. पाटील यांना करवीर तालुक्याला हे पद दिले. नंतर पन्हाळा तालुक्यामध्ये आमदार विनय कोरे यांना हे पद दिले. त्यानंतर राष्ट्रवादीला कागल तालुक्याला हे पद आले आणि त्यामुळे सूर्यकांत ऊर्फ बाळासाहेब पाटील हे चेअरमन झाले. आता त्यांनी मुदत संपण्याआधीच आपला राजीनामा देण्याची तयारी दाखवलेली आहे. वर्तमानपत्रामध्येही त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

□ गोकुळ दूध संघ…….
गोकुळ चेअरमन निवडीमध्ये निवडणुकीपूर्वीच मी, पालकमंत्री प्रकाशराव आबिटकर, आमदार चंद्रदीप नरके, आमदार सतेज उर्फ बंटी पाटील, माजी आमदार के. पी. पाटील व सर्वच नेते मंडळींनी पहिली दोन वर्षे विश्वास आबाजी पाटील, नंतरची दोन वर्षे अरुणराव डोंगळे या जेष्ठ सदस्यांना देण्याचे आम्ही वचन दिले होत. निवडणूकीपूर्वी आम्ही हे वचन दिले होते. नंतर एक वर्षासाठी गोकुळचे संस्थापक आनंदराव पाटील – चुयेकर यांचे चिरंजीव शशिकांत पाटील – चुयेकर यांना द्यायचे आम्ही ठरवले होते. त्याप्रमाणे मी त्यांचे नावही जाहीर केले होते. परंतु; मुख्यमंत्री महोदयांनी युतीचाच चेअरमन करायचं असा आदेश दिला. शेवटी शशिकांत पाटील यांना शुभेच्छा देऊन इटली देशाच्या दौऱ्यावर गेलेल्या नविद मुश्रीफांना बोलवण्यात आले आणि चेअरमन पद देण्यात आले.

□ जिल्हा परिषद…….
जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये दरवेळेला कागल तालुक्यावर अन्याय झाल्याची भावना कार्यकर्त्यांच्या मनामध्ये होती. एकवेळेला कै. पी. एन. पाटलांच्या आग्रहामुळे मी आणि तत्कालीन नेते मंडळींनी राहुल पाटील यांना जिल्हा परिषदेचा अध्यक्ष केले. त्यावेळी कागलचे युवराज पाटील- बापू अध्यक्ष होऊ शकले नाहीत. नंतर आम्ही त्यांना उपाध्यक्ष करण्याचं ठरवलं. चंदगडचे माजी आमदार राजेश पाटील यांनी आजऱ्याच्या जयवंतराव शिंपी यांच्यासाठी आग्रह धरला. मीही मोठ्या मनाने ते मान्य केले. जयवंतराव शिंपी उपाध्यक्ष होत असताना आम्ही सर्वांनी युवराज पाटील यांना गोकुळचे स्वीकृत संचालक पद देण्याचा शब्द दिला होता. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कागल तालुक्यातील सर्व कार्यकर्त्यांच्या भावना होत्या कि, एकदा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा व कागल तालुक्याचा व्हावा. योगायोगाने हे सर्व जुळून आलेलं आहे. त्यामुळे, ही संधी घ्यावी अशा सर्वांच्या इच्छेखातर मला त्यांच्या इच्छेला मान द्यावा लागला. मनातल्या इतर भावना दूर ठेवून सौ. शिल्पाताई खोत यांना जिल्हा परिषद अध्यक्ष करावं लागलं.

□ या सगळ्या घटनेवरून आपल्या लक्षात येईल. प्रत्येक वेळेला योगायोग आला त्यामुळे ही पदे आली. आता येत्या काळात के. डी सी. सी. बँकेची, गोकुळ दूध संघाची निवडणूक लागत आहेत. आपोआप ही पदे रिकामी होणार आहेत. बाजार समितीच्या अध्यक्षांनी राजीनामा दिलेला आहे. जिल्हा परिषद सव्वा वर्षासाठी आहे. सांगण्याचे तात्पर्य एवढेच आहे, ही सर्व पदे केवळ योगायोगाने आलेली आहेत. मी ज्यावेळेला महाविकास आघाडीमध्ये काम करत होतो, त्यावेळी महाविकास आघाडी एकसंघ आणि भक्कम कशी राहील, असा प्रामाणिकपणे प्रयत्न केला. आता मी महायुतीमध्ये कार्यरत आहे. महायुतीमध्ये मी मंत्री आहे. माझी जबाबदारी आहे कि, युती कशी भक्कम होईल. युतीचे कसे सगळे पदाधिकारी होतील. त्यासाठी मी प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आहे.

कृपया, या घटना वस्तुस्थितीला धरून आहेत. याबद्दलचे कथन मी प्रांजळपणाने केलेले आहे. याचा कोणीही गैरसमज करून घेऊ नये, ही माझी विनंती आहे.


Spread the news

You may also like

error: Content is protected !!