*काँग्रेसची हाक, कोल्हापुरकरांनो मराठवाड्याला साथ देऊया*
*आमदार सतेज पाटील यांचे आवाहन*
*कोल्हापूर :* सध्या मराठवाडा अतिवृष्टीच्या भयंकर संकटातून जात आहे. अनेक गावे पाण्याखाली गेल्याने शेती, घरे, स्वप्नं आणि भविष्य सगळंच वाहून गेलं आहे. त्यामुळे संकटग्रस्त मराठवाड्याच्या मदतीला धावून जाण्याचे आवाहन कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटीने कोल्हापूरकरांना केले आहे. काँग्रेसचे विधानपरिषदेतील गटनेते तथा जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आमदार सतेज पाटील यांच्या पुढाकारातून पूरग्रस्त बांधवांच्या मदतीसाठी हात पुढे करुया हा मदतीचा संकल्प काँग्रेसने केला आहे. त्यासाठी किराणा सामान, प्रथमोचार साहित्य, सॅनिटरी पॅडस, चप्पल, स्लीपर्स, पाणी बॉटल्स, पुरुष, महिला, लहान मुलांचे कपडे, ब्लँकेटस, चटई, रेनकोट, टॉवेल्स व शालेय साहित्य देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
बुधवार पासून ते २८ सप्टेंबर पर्यंत ही मदत जिल्हा काँग्रेस कमिटीत जमा करण्यात येणार आहे. त्यानंतर २९ सप्टेंबरला ट्रकद्वारे ही मदत मराठवाड्यातील पूरग्रस्त विविध जिल्ह्यांमध्ये पाठवण्यात येणार आहे. कोल्हापुरकरांनी महापुराचा वेदनादायक अनुभव घेतला आहे. महापुराच्या काळात देशभरातून मदतीचा हात मिळाला होता. त्यामुळे आता दातृत्व करण्याची आपली वेळ आहे. ही आपली जबाबदारी असून ही तुमची छोटीशी मदतही पुरग्रस्तांसाठी जीवनरेखा ठरेल. मराठवाडा पुन्हा नव्याने उभा राहण्यासाठी त्यांना मदतीचा हात पुढे करूया असे आवाहन आमदार सतेज पाटील यांनी केले आहे.