*केडीसीसी बँक राबविणार “आई” महिला पर्यटन धोरण*
*संचालक मंडळाच्या बैठकीत निर्णय*
*पर्यटन क्षेत्रामध्ये महिला सहभागाला मिळणार चालना*
*पर्यटन व्यवसायातील रू. १५ लाखापर्यंत कर्जाचा मिळणार व्याज परतावा*
कोल्हापूर, दि. १:
कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक महाराष्ट्र शासनाचे “आई” हे महिला पर्यटन धोरण राबविणार आहे. पर्यटन व्यवसायाच्या माध्यमातून महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला पाठबळ देण्याचा निर्णय बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत झाला. बँकेचे अध्यक्ष व वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ अध्यक्षस्थानी होते. या धोरणामुळे पर्यटन क्षेत्रामध्ये महिला सहभागाला मिळणार चालना मिळणार आहे. पर्यटन व्यवसायातील रू. १५ लाखापर्यंत कर्जाचा व्याज परतावाही मिळणार आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, या योजनेअंतर्गत महिलांनी पर्यटन व्यवसायासाठी रू. १५ लाखापर्यंतचे कर्ज घेतले असल्यास त्या कर्जावरील व्याज परतावा हा बँक नियमाप्रमाणे पर्यटन संचालनालयाकडून दिला जाणार आहे.
या धोरणाची पंचसूत्री….
□ महिला उद्योजकता विकास
□ महिलांसाठी पायाभूत सुविधा
□ महिला पर्यटकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य
□ महिला पर्यटकांसाठी कस्टमाईज्ड उत्पादने/ सवलती
□ प्रवास आणि पर्यटन विकास
अर्जदाराची पात्रता…..!
या कर्ज योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार महिला कोल्हापूर जिल्ह्यातील असणे आवश्यक. लाभार्थीचे बँक खाते आधार लिंक असावे. संबंधित पर्यटन व्यवसाय महिलेच्या मालकीचा व त्यांनी चालवलेला असावा. व्यवसायात ५० टक्के व्यवस्थापकीय मालकी व इतर कर्मचारी महिला असणे आवश्यक. महिला अर्जदारांनी विहित नमुन्यात ऑफलाईन किंवा ऑनलाईन पद्धतीने नोंदणी अर्ज केल्यानंतर त्यांना पर्यटन संचालनालयाकडून पात्रता प्रमाणपत्र म्हणजेच एलओआय दिले जाईल. त्या आधारे बँकेकडून कर्ज मंजूर करून घ्यावे. व्यवसाय सुरू झाल्याच्या फोटोसह कर्जाची नियमित परतफेड आवश्यक.
*महिलांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी…..!*
बँकेचे अध्यक्ष व वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, महाराष्ट्र सरकारने महिला केंद्रीत असे महिला पर्यटन धोरण बनवलेले आहे. हेच धोरण केडीसीसी बँकेने जिल्हाभर राबविण्याचा निर्णय घेतलेला आहे. या धोरणाच्या माध्यमातून महिलांचा पर्यटन क्षेत्रातील सहभाग आणि त्यांच्या आर्थिक विकासाचा स्तरही उंचावेल. या धोरणाच्या माध्यमातून केडीसीसी बँक जिल्ह्यातील महिलांना नवीन उद्योगाकरीता व जुना व्यवसाय वाढविण्याकरीता प्राधान्य देणार आहे. मी व्यक्तीश: आणि केडीसीसी बँक सदैव आमच्या माता- भगिनींच्या पाठीशी आहोत.
योजनेअंतर्गत खालील व्यवसायांसाठी कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे.
□ कॅरॅमॅन- राहण्यासाठी व प्रवासासाठी सुसज्ज फिरते वाहन.
□ टूर अँड ट्रॅव्हल एजन्सी- प्रवास, निवास व संपूर्ण टूर पॅकेज सेवा पुरवणारी संस्था.
□ साहसी पर्यटन- जमीन, हवा, जल क्षेत्रावरील सहज पूर्ण व शारीरिक कष्ट घेणारे पर्यटन.
□ पर्यटक सुविधा केंद्र माहिती कक्ष- प्रवास आरक्षण सेवा, आपत्कालीन साह्य केंद्र.
□ कृषी पर्यटन केंद्र- शेती व ग्रामीण जीवनाचे अनुभव देणारी पर्यटन स्थळे.
□ होम स्टे- ग्रामीण होम स्टे, शहरी होम स्टे, थीम असलेले होम स्टे, होम स्टेचे नूतनीकरण
□ निवास न्याहारी- निवासासोबतच न्याहारीचा समावेश असणारी सेवा
□ रिसॉर्ट- निवास, मनोरंजन व विश्रांती यासाठी एकत्रित सुविधा
□ मोटेल- महामार्गाजवळ असणारी प्रवाशांसाठीची निवास स्थळे व उपाहारगृहे
□ रेस्टॉरंट: जेवणासाठी पूर्ण सेवा देणारे ठिकाण
□ टेंट- कापड किंवा कॅनव्हासचे तात्पुरते निवासस्थळ
□ ट्री हाऊस- झाडावर किंवा उंच जागी बांधलेली निवासव्यवस्था
□ व्होकेशनल हाऊस- व्यावसायिक कौशल्य, प्रशिक्षण व निवासाची सुविधा
□ पर्यटन व्हीला: पर्यटकांसाठी स्वतंत्र व्हीला स्वरूपातील निवास
□ वूडन कॉटेजेस- लाकडी व पर्यावरणपूरक घर
□ पॉड्स- छोट्या- तंत्रज्ञानावर आधारित एकट्या प्रवाशासाठी निवास
□ महाभ्रमण- एकाचवेळी अनेक स्थळे समाविष्ट असणारे गट पर्यटन
□ बीच शॅक- समुद्रकिनाऱ्यावर असलेली खाद्यपेय व विश्रांतीसाठी असलेली झोपडी व शेड
□ उपहारगृहे- छोटे व पारंपारिक जेवण देणारी खाद्यगृहे
□ फास्ट फूड- लवकर मिळणारे व सहज खाण्याजोगे खाद्यपदार्थ
□ महिला चलीत कॉमन किचन- महिला गटाद्वारे चालवलेली सामूहिक स्वयंपाकगृहे
□ कॅफे- कॉफी व हलक्या जेवणाच्या सुविधा असलेले ठिकाण
□ बेकरी- ब्रेडचे कुकीज व इतर बेक केलेले पदार्थ विक्रीचे ठिकाण
□ टूर ऑपरेटर- पर्यटकांसाठी संपूर्ण टूरचे आयोजन करणारी सेवा
□ ट्रॅव्हल एजंट- प्रवास आरक्षण, हॉटेल बुकिंग, विजा इत्यादी सेवा देणारे
□ टूर मार्गदर्शक- पर्यटकांना माहिती व मार्गदर्शन करणारी व्यक्ती
□ क्रूज- पाण्यावर जल पर्यटन करणारे लक्झरी जहाज
□ टूर अँड ट्रॅव्हल एजन्सी- प्रवास, निवास, संपूर्ण टूर पॅकेज सेवा देणारी संस्था
□ आर्ट अँड क्राफ्ट व्हिलेज- स्थानिक कला, वस्तू व हस्तकलेचे दर्शन व विक्रीचे ठिकाण
□ टुरिस्ट ट्रान्सपोर्ट ऑपरेटर- पर्यटक वाहतुकीसाठी वाहने पुरवणारी सेवा. ही वाहने रिक्षा बस चार चाकी सारखी पर्यावरण पूरक इलेक्ट्रिकल वाहतूक सेवा
□ आदिवासी निसर्ग पर्यटनाशी संबंधित प्रकल्प- आदिवासी जीवनशैली व नैसर्गिक पर्यटन यांचे मिश्रण
□ मेडिकल टुरिझम- उपचारासाठी येणाऱ्या पर्यटकांसाठी सेवा
□ वेलनेस सेंटर- मानसिक व शारीरिक तंदुरीसाठी सेवा देणारे केंद्र
□ आयुर्वेद योगा केंद्र- पारंपरिक भारतीय उपचार पद्धती व योगाभ्यास केंद्र
□ हँडीक्राफ्टर्स- हस्तकला कलाकार व स्थानिक कलाकाराकडून बनविलेल्या हस्तकला वस्तू
□ सुविनिअर शॉप- स्मरणिका विक्री करणारी दुकाने
□ कला व संस्कृती- स्थानिक लोककला, संगीत, नृत्य, संस्कृती यांचे सादरीकरण
□ स्थानिक उत्पादक विक्री केंद्र- स्थानिक शेतकी खाद्य व हस्तकला उत्पादने विक्रीसाठी केंद्र
□ धार्मिक स्थळी निर्माल्य व्यवस्थापन- मंदिरे व धार्मिक स्थळी निर्माण होणा-या जैविक कचऱ्याचे व्यवस्थापन
□ प्रसाद विक्री करणारी दुकाने- अधिकृत व मान्यताप्राप्त प्रसाद विक्री दुकाने
□ विविध खाद्यपदार्थ विक्रेते- स्थानिक खाद्यपदार्थ विकणारे छोटे विक्रेते
□ इव्हेंट मॅनेजमेंट- पर्यटनाशी संबंधित विविध कार्यक्रमाचे आयोजन व व्यवस्थापन.
=========





