केडीसीसी बँक करणार सोलर प्रकल्पांनाही अर्थ पुरवठा* *संचालक मंडळ बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय* *मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत प्रकल्पांना थेट आणि सहभागा अंतर्गत मुदती कर्जाचे धोरण*

Spread the news

*केडीसीसी बँक करणार सोलर प्रकल्पांनाही अर्थ पुरवठा*

*संचालक मंडळ बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय*

*मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत प्रकल्पांना थेट आणि सहभागा अंतर्गत मुदती कर्जाचे धोरण*

    •  

*कोल्हापूर, दि. २७:*
कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने सोलर प्रकल्पांनाही अर्थ पुरवठा करण्याचे धोरण निश्चित केले आहे. बँकेचे अध्यक्ष व वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय झाला. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० अंतर्गत सोलर प्रकल्पांना थेट आणि सहभागाअंतर्गत मुदती कर्जाच्या धोरणास संचालक मंडळांने मान्यता दिली आहे.

केडीसीसी बँकेमार्फत प्रामुख्याने शेतीसह साखर कारखाने, सूतगिरण्या, मार्केटिंग संस्था, पगारदार पतसंस्था यांना कर्ज पुरवठा केला जात आहे. दरम्यान; या धोरणाच्या माध्यमातून बँकेने सौर ऊर्जेसारख्या नवीन क्षेत्राबाबत अर्थसाहाय्याचा निर्णय घेऊन व्यवसायवाढीच्या दिशेने आणखी एक महत्त्वाचे पाऊल टाकले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० अंतर्गत एकूण सात हजार मेगावॅट क्षमतेचे विकेंद्रीत सौर प्रकल्प राबवून सन 2025 या वर्षातील सुमारे 30 टक्के फिडरचे सोलरायझेशन करण्याचे उद्दिष्ट “मिशन 2025” महाराष्ट्र राज्य सरकारकडून निश्चित करण्यात आलेले आहे. या मिशनमध्ये ०.५ ते २५ मेगावॅट क्षमतेचे विकेंद्रीत सौर प्रकल्प स्थापित केले जाणार आहेत. या सौर ऊर्जा प्रकल्पाचे व्यवस्थापन महावितरणच्यावतीने केले जात आहे. सौर प्रकल्पामधून निर्मित वीज खरेदीचा महावितरणशी 25 वर्षांचा करार केला जातो. वीज खरेदी दर टेंडर पद्धतीने ठरतो. कृषी पायाभूत सुविधा अंतर्गत म्हणून सौर ऊर्जा निर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारनेही अनुदान देण्याचे आणि तीन टक्के व्याज परताव्याचे धोरण घेतले आहे.

*सूर्य हा ऊर्जेचा खजिना…!*
याबद्दल बोलताना बँकेचे अध्यक्ष व वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, सूर्य हा संपूर्ण जगासाठी अपारंपारिक ऊर्जेचा अखंड स्त्रोत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत देश ऊर्जेच्या बाबतीमध्ये स्वयंपूर्ण करण्याचा निर्धार केलेला आहे. त्या भूमिकेतूनच त्यांनी सौर ऊर्जेला प्राधान्य दिले आहे. राष्ट्रीय प्रवाहाचा एक भाग म्हणूनच सौरऊर्जा निर्मिती बरोबरच पर्यावरण रक्षणाच्यादृष्टीने केडीसीसी बँकेनेही सौर प्रकल्पांना अर्थसाहाय्य करण्याचे धोरण घेतले आहे.

केडीसीसी बँकेचे सोलर प्रकल्पांना अर्थपुरवठा करण्याचे धोरण असे…….
□ सहकारी संस्था आणि कंपन्यांना होणार कर्जपुरवठा.

□ प्रकल्प उभारण्यासाठी बँक 80 टक्के कर्ज पुरवठा करणार व 20 टक्के स्वगुंतवणुकीची अट.

□ प्रकल्पासाठी महावितरणशी त्रिस्तरीय करार.

□ कोल्हापूर जिल्ह्यातील प्रकल्पांसाठी केडीसीसी बँक अग्रणी बँक म्हणून काम करेल.

□ इतर जिल्ह्यातील प्रकल्पांसाठी बँक सहभागा अंतर्गत कर्जपुरवठा करेल.

□ एका प्रकल्पास साधारणतः 10 ते 16 कोटींची गरज. कर्ज परताव्याची मुदत नऊ वर्षे.

या बैठकीला उपाध्यक्ष माजी आमदार राजूबाबा आवळे, आमदार सतेज उर्फ बंटी पाटील, आमदार डाॅ. राजेंद्र पाटील- यड्रावकर, माजी खासदार डॉ. श्रीमती निवेदिता माने, माजी आमदार संजयबाबा घाटगे, ए. वाय. पाटील, प्रताप उर्फ भैय्या माने, बाबासाहेब पाटील -आसुर्लेकर, रणजीतसिंह पाटील, सुधीर देसाई, विजयसिंह माने, सौ. श्रुतिका काटकर, सौ. स्मिता गवळी, कर्मचारी प्रतिनिधी आय. बी. मुन्शी आणि दिलीप लोखंडे आदी संचालक व प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी गोरख शिंदे उपस्थित होते.
===========


Spread the news

You may also like

error: Content is protected !!