-
कोल्हापुरात रंगला भिमा नवरात्री नवरंग दांडीया कार्यक्रम, रामकृष्ण हॉलवर तरूणाईच्या प्रचंड उत्साहात झाला रासदांडीया सोहळा
कोल्हापुरात एवढया मोठया प्रमाणात गरबा दांडीयाचे प्रथमच आयोजन होते. अतिशय भव्यदिव्यरित्या होणार्या रासदांडिया स्पर्धेची व्याप्ती वाढवण्यासाठी प्रयत्न करू, अशी ग्वाही खासदार धनंजय महाडिक यांनी दिली. नवरात्रोत्सवानिमित्त ए.जी.व्हेंचर प्रस्तुत भिमा नवरात्री नवरंग दांडीया कार्यक्रमात ते बोलत होते. रामकृष्ण हॉलवर तरूणाईच्या सळसळत्या उत्साहात आणि प्रचंड गर्दीत सुमारे चार तास रासदांडीयाचा कार्यक्रम रंगला.
नवरात्रोत्सवानिमित्त कोल्हापुरात प्रथमच मोठया प्रमाणात भिमा नवरात्री नवरंग हा रासदांडीयाचा उपक्रम रंगला. या उपक्रमाचं सौ. अंजली महाडिक आणि अथर्व गायकवाड यांच्या संयोजनातून आणि पुढाकारातून शनिवारी रामकृष्ण हॉलमध्ये गरबा कार्यक्रमाचं आयोजन केले होते. खासदार धनंजय महाडिक, भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा सौ. अरूंधती महाडिक, चॅनेल बी चे व्यवस्थापकीय संचालक पृथ्वीराज महाडिक, भिमा साखर कारखान्याचे अध्यक्ष विश्वराज महाडिक, सौ. वैष्णवी महाडिक यांच्या उपस्थितीत देवीची आरती करून सोहळयाला सुरवात झाली. विशाल सुतार प्रेझेंटस् झंकार ग्रुप आणि डी.जे.च्या तालावर हा सोहळा रंगला. चॅनेल बी माध्यम प्रायोजक असलेल्या या सोहळयामध्ये ४ वर्षाखालील, ९ वर्षाखालील, १४ वर्षाखालील आणि १५ वर्षावरील वयोगटातील तरूण-तरूणींचे गट सहभागी झाले होते. दांडीया खेळातील कौशल्याचे प्रदर्शन घडवत, तरूणाईने डीजेच्या तालावर उत्तरोत्तर हा खेळ रंगतदार बनवला. सुमारे चार तास चाललेल्या या गरब्यामध्ये ५०० तरूण-तरूणींचा सहभाग होता. तर सोहळयासाठी २ हजारहून अधिक नागरिकांनी उपस्थिती लावली होती. १५ वर्षावरील गटात सर्वोत्तम ग्रुप म्हणून सनेडो ग्रुपला २० हजार रुपयांचे बक्षिस देण्यात आले. खेलैया ग्रुपला द्वितीय क्रमांकाचे १० हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात आले. तर उल्लेखनीय खेळ केलेल्या लहान मुलांना सायकल, विविध प्रकारची खेळणी बक्षिसे म्हणून देण्यात आली. परिक्षक सागर चावला आणि श्रीमती हेमाली यांच्या हस्ते बक्षिस वितरण करण्यात आले. स्पर्धेसाठी एम.एम.ग्रुप संचलित हॉटेल नैवेद्यम, संजय घोडावत विद्यापीठ, काले बजाज, जिजाई मसाले, फ्रेमो फिल्मस्, ऍड. हर्षवर्धन सुर्यवंशी यांचे प्रायोजकत्व आणि सहकार्य लाभले. या स्पर्धेत एकूण १ लाख रुपयापर्यंतची बक्षिसे देण्यात आली.