- कोल्हापुरात साकारली पस्तीस किलो चांदीची गणेशमुर्ती
एक्कावन्न इंच उंचीचा लालबागचा राजा रुपातील मुर्ती
कोल्हापूर हे कलानगरी म्हणून जगभर ओळखले जाते. कलेच्या अनेक क्षेत्रात कोल्हापूरच्या कलाकारांनी जगात आपला ठसा उमटविला आहे. सोने-चांदीच्या सुबक आणि देखण्या दागिण्यांसाठी व विविध वस्तूंसाठी प्रसिध्द असणाऱ्या कोल्हापुरात आता तब्बल पस्तीस किलो वजनाची चांदीची गणेशमुर्ती साकारली आहे. लालबागचा राजा रुपातील ही मुर्ती असून तिची उंची एक्कावन्न इंच इतकी आहे. केवळ पंचवीस दिवसात ही मुर्ती साकारली असून मध्य प्रदेश येथील भाविकाच्या मागणीनुसार हे काम पूर्ण झाले असल्याची माहिती कृष्णा आर्टस, वृध्दी सिल्व्हरचे जयेश ओसवाल, शैलेश ओसवाल, वैभव ओसवाल यांनी पत्रकार परिषदेत दिली.
विविध देव-देवतांच्या चांदीच्या लहान मुर्ती व इतर अनेक वस्तू कोल्हापुरात मोठ्या प्रमाणावर तयार होतात. पण, सव्वाचार फूट उंच ( ५१ इंच) मुर्तीची मागणी एका भाविकाकडून आली. त्यानुसार हे काम करण्याचे आव्हान आम्ही स्वीकारले. पोकळ मुर्ती कोल्हापुरात तयार होतात. कारण येथील कामगारांचे कौशल्य आणि कुशल तंत्रज्ञामुळे ते शक्य होते. सुरवातीला प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मुर्तीचे विविध भाग करुन त्याचे मोल्ड काढले जातात. त्यानंतर डाय, आटणी, पास्टा, बेटकाम, कटींग जोडकाम, नक्षीकाम आणि शेवटी फिनिशिंग व पॉलीश अशा विविध प्रक्रिया होवून मुर्ती साकारते. मात्र, ही सारी प्रक्रिया केवळ पंचवीस दिवसात पूर्ण करुन तब्बल बावीस भाग जोडून ही मुर्ती साकारली आहे. कृष्णा आर्टस व वृध्दी सिल्व्हरच्या माध्यमातून चांदीच्या विविध कलाकुसरीच्या वस्तू व मुर्ती तयार केल्या जातात. त्यांना ग्राहकांची मोठी मागणी असते. मात्र, एवढी भव्य मुर्ती साकारण्याचे काम पहिल्यांदाच यशस्वीपणे पूर्ण केल्याचा आनंद असल्याचेही जयेश ओसवाल म्हणाले.