कोल्हापूर सर्किट बेंच सामाजिक, आर्थिक न्यायासाठी मैलाचा दगड
खंडपीठासाठी प्रयत्न करू, सरन्यायाधिश भूषण गवई यांचे उद्गार
कोल्हापूर
राजकीय लोकशाहीबरोबरच देशात आर्थिक व सामाजिक लोकशाही महत्त्वाची आहे, या पार्श्वभूमीवर कोल्हापूर सर्किट बेंच सामाजिक आणि आर्थिक न्यायासाठी मैलाचा दगड ठरेल असा विश्वास सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधिश भुषण गवई यांनी व्यक्त केला. सर्किट बेंचचे रुपांतर लवकरच कायमस्वरुपी खंडपीठमध्ये होईल, त्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आलोक आराध्ये यांनी प्रस्ताव पाठवावा, आपल्याकडे अजून सव्वा तीन महिन्यांचा कालावधी असल्याचे सांगत त्यांनी खंडपीठासाठी प्रयत्न करण्याचे सुचित केले.
मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचचे उद्घाटन सरन्यायाधिश गवई यांच्या हस्ते झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, न्यायमूर्ती आलोक आराध्ये, पालकमंत्री प्रकाश आबिटकर, खासदार शाहू महाराज यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत शानदार समारंभात हे उद्घाटन झाले. दरम्यान, सोमवारपासून या बेंचच्या कामास प्रत्यक्षात सुरूवात होणार आहे. पहिल्याच दिवशी अडीचशेपेक्षा अधिक खटल्यांची सुनावणी होणार आहे.
सरन्यायाधिश गवई आपल्या भाषणात म्ह्णाले, सर्किट बेंचच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने न्याय पक्षकारांच्या दारी आला आहे. महाराष्ट्र न्यायदानाच्या प्रक्रियेत सुविधा पुरविण्यात मागे असल्याचा आरोप काही ठिकाणी होतो. पण, मला तसे वाटत नाही. केवळ वीस दिवसात ज्या गतीने इमारत सुसज्ज केली, यावरून राज्य सरकार खंडपीठाच्या इंट्रास्ट्रक्चर साठी लागेल ती मदत करेल, यात शंका नाही. या निमित्ताने सहा जिल्ह्यातील वकिलांसाठी खूप मोठी संधी निर्माण झाल्याचे सांगताना ते म्हणाले, राजर्षी शाहू महाराज यांचे आमच्यावर खूप उपकार आहेत. त्यामुळे छोटीशी परतफेड करण्याची मला संधी या निमित्ताने मिळाली. सरन्यायाधीश होऊन आनंद झाला त्याच्यापेक्षा जास्त आनंद आज मला झाला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, सर्किट बेंचच्या निमित्ताने कोल्हापूरच्या सर्वांगिण विकासाचे दालन आज खुले झाले आहे. सामान्य माणसाला न्याय देण्यासाठी जे काही करावे लागेल ते सर्व राज्य सरकार करेल. वकिलांवर होणारे हल्ले रोखण्यासाठी सरकार सकारात्मक पाऊल उचलेल असेही त्यांनी सांगितले.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, कोल्हापूर सर्किट बेंचमुळे सामान्यांना लवकर न्याय तर मिळणार आहेच, शिवाय पैसा आणि वेळही वाचणार आहे.
प्रारंभी अॅड. संग्राम देसाई यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. यावेळी न्यायमूर्ती आलोक आराध्ये, निवृत्त न्यायमूर्ती मोहित शहा, महाराष्ट्र व गोवा बार असो. चे अध्यक्ष अमोल सावंत, न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी सरन्यायाधिश गवई, मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे यांच्यासह अनेकांचा सत्कार करण्यात आला. सर्किट बेंचसाठी २५ एकर जमीन दिल्याची घोषणा करतानाच लवकरात लवकर येथे इमारत बांधण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले. सूत्रसंचलन उमेश सावंत यांनी केले.
या कार्यक्रमास उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, मंत्री जयकुमार गोरे, मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्यासह खासदार, आमदार, वकिल मोठ्या संख्येने उपस्थित होते.
चौकट
केवळ वकिलांच्या फायद्यासाठी पुण्यात खंडपीठ व्हावे अशी मागणी होत होती. माझ्याकडेही तशी मागणी झाली. पण, आपण ती नाकारली. पुण्याची ही वकिली आपण करणार नाही असे स्पष्ट सांगितल्याचे सरन्यायाधिश गवई यांनी स्पष्ट केले. यापेक्षा पुणेच कोल्हापूरला जोडा असे सांगताना ते म्हणाले, अजितदादा आज उपस्थित नाहीत नाही, तर मुख्यमंत्री समोरच मी सांगितलं असतं. केवळ पुणे बारामती करू नका पुणे-कोल्हापूर एक्स्प्रेस वे तयार करा.