*कोल्हापूर विमानतळावरील नवीन एटीसी टॉवरसह अग्नीशमन केंद्राचे आणि कोल्हापूर ते नागपूर विमान सेवेचा केंद्रीय नागरी विमान वाहतुक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते झाला शुभारंभ.*
*कोल्हापूर विमानतळाला छत्रपती राजाराम महाराजांचे नाव देण्यासाठी पाठपुरावा करू, नामदार मुरलीधर मोहोळ यांची ग्वाही*
कोल्हापूर विमानतळावर एटीसी टॉवरची उभारणी करण्यात आलीय. त्याचबरोबर तांत्रीक ब्लॉकसह अग्नीशमन केंद्र उभारण्यात आले आहे. त्याचे उद्घाटन आज करण्यात आले. तर कोल्हापूर ते नागपूर विमानसेवेचा शुभारंभ झाला. त्यासाठी केंद्रीय नागरी विमान वाहतुक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आज कोल्हापुरात आले होते. कोल्हापूर विमानतळाचा अधिक गतीमान विस्तार करून, या विमानतळाला छत्रपती राजाराम महाराजांचे नाव देण्यासाठी पाठपुरावा करू, अशी ग्वाही नामदार मोहोळ यांनी दिली.
कोल्हापूरच्या विमानतळावर ४५ कोटी रूपये खर्चुन एअर कंट्रोल टॉवरची उभारणी करण्यात आली आहे. केंद्रीय नागरी विमान वाहतुक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते एटीसी टॉवरचे उद्घाटन झाले. तसेच स्टार एअरवेजने सुरू केलेल्या कोल्हापूर ते नागपूर विमानसेवेचा शुभारंभ नामदार मोहोळ यांच्या हस्ते झाला. यावेळी पालकमंत्री प्रकाश आबिटकर, खासदार शाहू महाराज, खासदार धनंजय महाडिक, धैर्यशील माने, आमदार अमल महाडिक, राहूल आवाडे, अशोकराव माने, जिल्हाधिकारी अमोल येडगे, विश्वहिंदू परिषदेचे जवाहरलाल छाबडा यांची प्रमुख उपस्थिती होती. उद्घाटनानंतर नामदार मोहोळ यांनी पत्रकारांशी संवाद साधला. कोल्हापूर विमानतळाला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. छत्रपती राजाराम महाराजांनी ९० वर्षापूर्वी हे विमानतळ उभारले होते. या विमानतळाचा अधिक गतीने विस्तार केला जाईल, असे नामदार मोहोळ यांनी सांगितले. खासदार धनंजय महाडिक यांच्या पाठपुराव्यामुळे विमानतळाचा विकास होतोय. १९०० मीटर असलेली धावपट्टी आता ३ हजार मीटर व्हावी, असा प्रयत्न आहे. त्यासाठी ६५ एकर जागेचे भुसंपादन होणे गरजेचे आहे. त्यातील ६० एकर जागा ताब्यात आली आहे. भूसंपादन झाल्यानंतर धावपट्टीचा विस्तार होईल, असे नामदार मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले. कॉंग्रेसच्या ७० वर्षाच्या काळात देशभरात ७४ विमानतळे होती. पण गेल्या १० वर्षात मोदी सरकारच्या कार्यकाळात विमानतळांची संख्या १६२ वर गेली आहे. भविष्यात देशात ४०० विमानतळे असतील, ही दळणवळणाच्या दृष्टीने मोठी क्रांती असल्याचे नामदार मोहोळ यांनी सांगितले. पश्चिम महाराष्ट्रातील तरूणांसाठी फ्लाईंग ट्रेनिंग सेंटर सुरू करण्यात येईल. तसेच विमानाची देखभाल दुरूस्ती कोल्हापूर विमानतळावरच व्हावी, यासाठी प्रयत्न केले जातील. तसेच कोल्हापूर विमानतळावर कार्गो सेटअप सुरू केला जाईल, त्याचा फायदा ४ ते ५ जिल्हयांना होईल, असे नामदार मोहोळ यांनी सांगितले. कोल्हापूर विमानतळाला छत्रपती राजाराम महाराजांचे नाव देण्याचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठवला आहे. त्याला मान्यता देण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे नामदार मोहोळ म्हणाले. उडान योजनेचा लाभ देशभरातील दीड कोटी नागरीकांनी घेतला आहे. पण सध्या विमान सेवेचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर आहेत. याबाबत नामदार मोहोळ यांनी स्पष्टीकरण दिले. महाराष्ट्रात जवळपास ९६ हवाई मार्ग उडान योजनेतून सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. पण विमानाचे तिकीट दर खुपच वाढले, तर निश्चितच त्याबाबत विचार करू, असेही त्यांनी स्पष्ट केले. नवी मुंबईतील विमानतळ सुरू झाल्यानंतर, विमानांसाठी पुरेशी जागा आणि वेळा मिळतील आणि विमानांची संख्या वाढवली जाईल, असेही नामदार मोहोळ यांनी सांगितले. भारत- पाकिस्तान युध्द परिस्थितीत तुर्कीनं पाकिस्तानला मदत केली आहे. ज्या देशांनी पाकिस्तानला मदत केली, त्या देशांवर निर्बंध आणण्याबाबत केंद्र सरकार विचार करत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष विजय जाधव, प्रदेश सचिव महेश जाधव, गोकुळचे संचालक चेतन नरके उपस्थित होते. दरम्यान कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स आणि व्यापारी संघटनांच्यावतीने विमानसेवेबाबत मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. शिवाय कोल्हापुरातून मुंबईला दररोज सकाळी आणि संध्याकाळी विमान सेवा सुरू करावी आणि कोल्हापूर ते अयोध्या विमानसेवा सुरू करावी, अशी मागणी खासदार धनंजय महाडिक यांनी केली.