* कोल्हापूरचा महापौर हा राष्ट्रवादीचाच होणार
मंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती, आमची कासवाची चाल असेल
कोल्हापूर
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा फिनिक्स पक्षाप्रमाणे आहे. कोल्हापूर महापालिकेच्या अनेक निवडणुकांमध्ये आम्ही दुसऱ्या स्थानावर आलो आहोत. आम्ही महापौर, स्थायी समिती सभापती पद अशी सगळी पद घेतली आहेत. यावेळीसुद्धा महापौर हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा होणार असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी आज पत्रकार बैठकीत दिली.
□ निवडणूक आयोगानेच मतचोरी केल्याची तक्रार अनेक दिवसापासून राहुल गांधी मांडत आहेत. या प्रश्नावर मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, या संदर्भात निवडणूक आयोगाने काही दिवसांपूर्वी उत्तर दिले आहे. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी त्यांच्या मुद्यांचे खंडन केले आहे. वास्तविक; पराभव हा पराभव असतो. तो पचवायचीही ताकद लागते. निवडणुकांमध्ये कच्च्या मतदाराच्या लोकांसमोर येत असतात. त्यावर हरकतीही मागवल्या जात असतात. कोल्हापूर जिल्ह्यात एकही उमेदवार असं झालेलं आहे, असं म्हणायला तयार नाही. राहुल गांधी या मुद्द्यावरून विनाकारण निवडणूक आयोगाचा वेळ घेत आहेत. देशाचा वेळ घेत आहेत आणि संसदेचाही वेळ घेता आहेत. यामधून काहीही साध्य होणार नाही. मला वाटतं की, बिहारच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांचा हा काहीतरी प्लॅन असू शकतो.
□ शरद पवार यांनी केलेल्या गौप्यस्फोटाबाबत विचारले असता मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, याबद्दल तर मला खरोखरच आश्चर्य वाटते. त्या व्यक्तींची नावे, पत्ते, फोन नंबर तरी लिहून ठेवले असतीलच की पवारसाहेबांनी. त्यांना विचारायला हवं होतं की, हे कसं करून देणार आहात? विधानसभा निवडणूक होऊन आजघडीला नऊ महिने होऊन गेले आणि पवारसाहेब ही गुगली आता टाकत आहेत. आज संजय राऊतही म्हणत आहेत, की असे लोक येऊन गेले. अशा कपोलकल्पित गोष्टी सांगून लोकांचे फक्त मनोरंजनच होईल.
□ उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेने कलंकित मंत्र्यांना मंत्रिमंडळातून काढून टाका, असा आरोप करीत आज राज्यभर मोर्चे काढलेले आहेत. या प्रश्नावर मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, जे आरोप आहेत ते सिद्ध व्हावे लागतात. उच्च न्यायालये, सर्वोच्च न्यायालय त्यासाठी आहे. आरोप सिद्ध न होता कारवाई कशी होईल, असा सवाल करतानाच मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, विरोधी पक्षांचे कामच आहे की वातावरण सतत असं ढवळणं आणि सत्तारूढ पक्षावर टीका करीत राहणं.
.
□ सर्किट बेंच तयारीची पाहणी करणाऱ्यांमध्ये तुम्ही दिसत नाही, या प्रश्नावर मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, मी काही पाहणी करायला जाणार नाही. उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाची कार्यक्रम आचारसंहिता वेगळी असते. ज्यावेळी हे कोल्हापूरचे जिल्हा न्यायालय बांधले त्यावेळी तत्कालीन माननीय उच्च न्यायाधीशानी मला बोलावून घेतले. त्यांनी सांगितले की, या इमारतीचा सर्वोत्कृष्ट प्लॅन तुम्ही केलेला आहे. परंतु; सगळ्या जिल्ह्यातून अशी मागणी पुढे आली तर त्या इमारती बांधाव्या लागतील. त्यानुसार ही जिल्हा न्यायालय इमारत ज्यावेळी बांधण्यात आली, त्यावेळी ती सर्वोत्कृष्ट जिल्हा न्यायालयाची इमारत ठरली. आता तो टाईप प्लॅन म्हणून सर्व राज्यभर राबवित आहोत.
दरम्यान; ज्यावेळी त्यांच्या भूमिपूजनाचा आणि उद्घाटनाचा प्रश्न आला त्यावेळी अध्यक्ष कोण, प्रमुख पाहुणे कोण, व्यासपीठावर उपस्थिती कोणाची हे न्यायालय ठरवत असते. मुंबई उच्च न्यायालयाच्या माननीय न्यायाधीशांनी जे ठरवलेलं असेल त्यामध्ये हस्तक्षेप आम्ही करणार नाही. ही लढाई सहा जिल्ह्यातील जनतेने आणि वकिलांनी जिंकलेली आहे. मुंबई उच्च न्यायालयात जाऊन फार महागामध्ये न्याय घ्यावा लागायचा. त्यांनी ही लढाई जिंकलेली आहे. तसेच; या लढाईमध्ये सर्व दैनिकांचा सहभाग आहे. सर्व प्रसार माध्यमांचा सहभाग आहे. त्यावेळीपासून आम्ही सातत्याने त्यासाठी प्रयत्न करीत आहोत. एक वेळ वकिलांनी कोर्टात जाणार नाही, असा पवित्र घेत कोर्ट कामावर बहिष्कार घातला होता. त्यावेळी माननीय उच्च न्यायालयाने वकिलांच्या सनदा रद्द करू, असा इशारा दिला होता. त्यावेळीही आम्ही रदबदली केली होती. असे अनेक प्रयत्न केलेले आहेत. सर्किट बेंचची निर्मिती हा विजय सर्वांचाच आहे. यामुळे कोल्हापूर जिल्ह्याचा फार महत्वपूर्ण विकास होणार आहे. कोल्हापूरच्या विकासामध्ये २० टक्के वाढ होईल. कोल्हापूरची हद्दवाढ सुद्धा होईल. एकूणच कोल्हापूरच्या विकासाचे महाद्वार खुले झाले आहे, असा विश्वासही मंत्री मुश्रीफ यांनी व्यक्त केला.
□ शक्तिपीठ महामार्गाबाबत विचारले असता श्री. मुश्रीफ म्हणाले, शक्तिपीठ करायचा आहे ही मुख्यमंत्र्यांची भूमिका आहे. त्यांनी ती कधी दडवूनही ठेवलेली नाही. परंतु; शक्तिपीठ हा कोणावरही लादायचा नाही, हीच त्यांची भूमिका आहे. आम्हा लोकप्रतिनिधींना, शेतकऱ्यांना विश्वासात घेतल्याशिवाय शक्तिपीठ रस्ता करणार नाहीत. त्यांनी आम्हाला अनेक मार्ग सुचविलेले आहेत. त्यापैकी जो मार्ग चांगला असेल. कमीत कमी बागायती जमीन जाईल व जिथे शेतकरी समाधान असेल त्या ठिकाणाहून शक्तीपीठ रस्ता नेण्याची भूमिका मुख्यमंत्र्यांनी मांडलेली आहे.
□ शक्तीपीठ महामार्गाच्या प्रस्तावित खर्चाचा आकडा वाढविलेला आहे, या आमदार सतेज पाटील यांच्या वक्तव्याकडे लक्ष वेधले असता मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, आमदार सतेज पाटील हे नवीनच आर्किटेक्ट झालेले आहेत. या विषयातील त्यांचं ज्ञान ईतकं प्रगल्भ झाले आहे, हे मला काय माहित नव्हतं. असं कधी होत नसतं. रस्ता किती किलोमीटरचा असतो, तो कॉंक्रिटीकरणाचा की कसा? यावर त्याचे दर ठरत असतात. मला वाटतय, हा त्यांचा गोड गैरसमज असावा.
□ बानगे ता. कागल येथे वारकरी संप्रदायाच्या कार्यक्रमाबद्दल बोलताना मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, श्रावण महिन्यामध्ये एक आध्यात्मिक कार्यक्रम करायचा, अशी माझी आणि आमच्या कार्यकर्त्यांची भावना होती. त्यानुसार हा कार्यक्रम आयोजित केला होता. पंढरीची वारी करून आलेल्या पायी वारीतील विणेकरी व तुळशीवाल्या माऊलींच्या पायांच्या पूजनाचा हा सोहळा होता. दहा हजाराहून अधिक श्री विठ्ठलभक्त या मंगलमय आणि पवित्र सोहळ्याला उपस्थित होते. मी आणि माझी पत्नीही तिथे दिवसभर उपस्थित होतो. साक्षात पांडुरंगाचे आणि हयात नसलेल्या आई-वडिलांचे पाय पुजण्याचा साक्षात्कार आम्हाला झाला. दरम्यान; डिसेंबर- जानेवारी महिन्यामध्ये आम्ही भव्य दिव्य असा कागल कीर्तन महोत्सव आयोजित करणार आहोत.
=========