महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स च्या ‘भारतीय आहोत, भारतीयच वापरू’ जनजागृती अभियानाला सुरुवात** *’आत्मनिर्भर भारत’ घडवण्यासाठी महाराष्ट्र चेंबरचा पुढाकार; अमेरिकेच्या 50% कराला सडेतोड उत्तर*

Spread the news

*महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स च्या ‘भारतीय आहोत, भारतीयच वापरू’ जनजागृती अभियानाला सुरुवात**

*’आत्मनिर्भर भारत’ घडवण्यासाठी महाराष्ट्र चेंबरचा पुढाकार; अमेरिकेच्या 50% कराला सडेतोड उत्तर*

कोल्हापूर, दि. 9 : भारताला आर्थिकदृष्ट्या अधिक सक्षम आणि ‘आत्मनिर्भर’ बनवण्यासाठी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड अग्रिकल्चर या संस्थेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. 9 ऑगस्ट क्रांती दिनाचे औचित्य साधून त्यांनी ‘भारतीय आहोत, भारतीयच वापरू’ या नावाने एक राज्यव्यापी जनजागृती अभियानाची सुरुवात केली आहे. या अभियानाचा मुख्य उद्देश नागरिकांना स्वदेशी वस्तूंचा वापर करण्यासाठी प्रोत्साहित करणे हा आहे.
या अभियानाच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी यांनी अमेरिकेने भारतावर लादलेल्या 50% कराच्या मनमानी निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, “अमेरिकेच्या या अन्यायकारक धोरणांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सडेतोड उत्तर दिले आहे. अशा कठीण परिस्थितीत आम्ही महाराष्ट्र चेंबर म्हणून पंतप्रधानांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत. त्यांच्या ‘आत्मनिर्भर भारत’ या संकल्पनेला बळ देण्यासाठीच आम्ही हे अभियान सुरू केले आहे.”
गांधी यांनी पुढे सांगितले की, अमेरिका असो किंवा चीन, यांसारख्या देशांच्या मनमानी कारभाराला योग्य प्रत्युत्तर देण्यासाठी आता भारतीयांनीच पुढाकार घेणे आवश्यक आहे. देशाची अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी आणि परदेशी वस्तूंवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने आपल्या देशात तयार होणाऱ्या वस्तूंना प्राधान्य द्यायला हवे. याच विचारातून आम्ही हे जनजागृती अभियान सुरू केले आहे. या अभियानाच्या माध्यमातून राज्याच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात जाऊन लोकांना स्वदेशी वस्तूंचे महत्त्व पटवून दिले जाईल. येत्या सणासुदीमध्ये किमान ५ हजार कोटींचा विदेशी वस्तू व्यापार कमी होवून भारतीय वस्तूंची विक्री वाढेल.
यावेळी गांधी यांनी सर्व उद्योगधंदे, व्यापारी आणि सर्वसामान्य नागरिकांना या अभियानात सहभागी होऊन ‘आत्मनिर्भर भारत’ घडवण्याच्या या राष्ट्रीय कार्याला हातभार लावण्याचे आवाहन केले.
या प्रसंगी व्यापारी आणि उद्योजक उपस्थित होते. या अभियानामुळे येत्या वर्ष भरात महाराष्ट्रातून किमान ७० हजार कोटींच्या भारतीय वस्तूंचा वापर वाढविण्याचे उद्दिष्ठ पूर्ण केल्यास देशाच्या आर्थिक विकासाला निश्चितच गती मिळेल, असा विश्वासही गांधी यांनी यावेळी व्यक्त केला.

  •  

*फोटो ओळी : महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड अग्रिकल्चर तर्फे सुरु केलेल्या भारतीय आहोत. भारतीयच वापरू अभियाना च्या बोध चिन्हाचे अनावरण करताना चेंबर चे अध्यक्ष ललित गांधी*


Spread the news

You may also like

error: Content is protected !!