महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHATET) जाहीर; अर्ज प्रक्रिया 27 मार्चपासून
कोल्हापूर, दि. 25 (जिमाका) : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांच्या वतीने घेण्यात येणारी महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHATET) 2026 चे रविवार २१ जून रोजी आयोजन करण्यात आले आहे. शासन निर्णय २३ ऑगस्ट २०१३ अन्वये ही परीक्षा घेतली जाते.
इयत्ता १ ली ते ५ वी (पेपर १) तसेच इयत्ता ६ वी ते ८ वी (पेपर २) साठी शिक्षक/शिक्षण सेवक पदावर नियुक्तीसाठी इच्छुक उमेदवारांना ही परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे. सर्व प्रकारच्या (अनुदानित, विनाअनुदानित व कायम विनाअनुदानित) शाळांसाठी ही अट लागू आहे.
परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया २७ मार्च पासून सुरू होणार असून १६ एप्रिल २०२६ पर्यंत संबंधितांना अर्ज सादर करता येणार आहेत. अर्ज भरणे, परीक्षा शुल्क, वेळापत्रक व इतर सविस्तर माहिती अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
वेळापत्रक पुढीलप्रमाणे :-
ऑनलाईन आवेदनपत्र व परीक्षा शुल्क भरण्याचा कालावधी : २७ मार्च ते १६ एप्रिल
प्रवेशपत्र ऑनलाईन प्रिंट काढून घेणे : ९ जून ते २१ जून
शिक्षक पात्रता परीक्षा पेपर १ दिनांक व वेळ : रविवार, २१ जून सकाळी १०.३० ते दुपारी १ वाजता
शिक्षक पात्रता परीक्षा पेपर २ : रविवार, २१ जून २०२६, दुपारी २.३० ते सायं. ५ वाजता
काही प्रशासकीय कारणांमुळे वेळापत्रकात बदल होण्याची शक्यता असल्याने उमेदवारांनी https://mahatet.in या अधिकृत संकेतस्थळाला नियमित भेट देऊन अद्ययावत माहिती तपासावी, असे आवाहन आयोगाचे आयुक्त महेश चौथे यांनी केले.





