महावितरणचे अध्यक्ष श्री. लोकेश चंद्र यांचा
‘नॅशनल लीडरशिप अवॉर्ड २०२६’ ने गौरव
मुंबई, दि. २८ फेब्रुवारी २०२६: महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. लोकेश चंद्र यांच्या ऊर्जा क्षेत्रातील कामगिरीची दखल घेत त्यांचा शुक्रवारी (दि. २७) आयोजित यंदाच्या नॅशनल लिडरशिप परिषदेमध्ये ‘इंडियाज बिझीनेस लिडर ऑफ एक्सलेन्स अवॉर्ड-२०२६’ या पुरस्काराने गौरव करण्यात आला.
मुंबई येथील स्टॉक एक्सचेंजच्या इंटरनॅशनल कन्व्हेन्शन हॉलमध्ये टाइम्स एस्पायर या संस्थेच्या वतीने नॅशनल लिडरशिप शिखर परिषदेचे आयोजन करण्यात आले. या परिषदेत संस्थात्मक उत्कृष्ट नेतृत्व, पर्यावरण व शाश्वत ऊर्जा, नाविन्यपूर्ण उपक्रम, कौशल्य विकास, आधुनिक तंत्रज्ञान आदींवर सादरीकरण व चर्चा करण्यासाठी देशातील खासगी व सरकारी विभागांचे वरिष्ठ अधिकारी सहभागी झाले होते. यावेळी अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. लोकेश चंद्र यांना जाहीर झालेला पुरस्कार त्यांच्यावतीने संचालक (संचालन) श्री. सचिन तालेवार, विशेष कार्य अधिकारी श्री. मंगेश कोहाट यांनी स्वीकारला.
मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वात राज्याच्या ऊर्जा क्षेत्रात परिर्वतन सुरु आहे. महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. लोकेश चंद्र यांनी अपर मुख्य सचिव (ऊर्जा) आभा शुक्ला यांच्या मार्गदर्शनात ऊर्जा परिवर्तनाला मोठा वेग दिला आहे. यामध्ये महावितरणने प्राधान्य दरांवर सर्व ऊर्जा स्त्रोतांमध्ये आतापर्यंत ८२ गिगावॅट क्षमतेच्या वीज खरेदीचे दीर्घकालीन करार (पीपीए) केले आहेत. यामध्ये ६५ ट्क्के अपारंपरिक ऊर्जेचा समावेश आहे. शेतकऱ्यांना प्रामुख्याने दिवसा व शाश्वत वीजपुरवठा करणे, वीज खरेदीचा व पर्यायाने अनुदानाचा बोजा कमी करणे, औद्योगिक व व्यावसायिक वीजदर कमी करणे यासाठी ‘मुख्यमंत्री सौर कृषिवाहिनी योजना २.०’ व ‘मागेल त्याला सौर कृषिपंप’ योजना अत्यंत उपयुक्त ठरत आहे. या दोन्ही योजनेतून सध्या १८ लाख ८२ हजारांपेक्षा अधिक शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा सुरु झाला आहे.
महावितरणकडून विजेच्या मागणीचा अंदाज व त्याचे कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारे विश्लेषण करण्यासाठी स्वतंत्र प्रणाली विकसित करण्यात आली आहे. त्याद्वारे मागणीचा अचूक अंदाज व सर्वात कमी खर्चात वीज खरेदीचे व्यवस्थापन सुरू आहे. यासह ऊर्जा क्षेत्रातील विविध योजना, डिजिटल ग्राहकसेवेचे प्रभावी व्यवस्थापन व नाविन्यपूर्ण नेतृत्वासाठी महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. लोकेश चंद्र यांची या पुरस्कारासाठी निवड झाली.





