*माजी पालकमंत्री सतेज पाटील यांनी बगलबच्च्यांच्या खांद्यावर बंदूक न ठेवता स्वत: समोर यावे;*
*पाकीट बाबांनी यापुढे बोलताना विचार करून बोलावे, अन्यथा अनेक प्रकरणे बाहेर काढू : शिवसेना जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण यांचा इशारा*
कोल्हापूर दि.१४ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकार राज्याच्या विकासाचे पाऊल टाकत आहे. तत्कालीन मुख्यमंत्री आणि सद्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या गेल्या साडे तीन वर्षांच्या काळात राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांच्या माध्यमातून कोल्हापूर जिल्ह्याला कोट्यावधी रुपयांचा निधी मिळाला आहे. यातून बरीच विकास कामे पूर्णत्वास येताना दिसत आहेत. याउलट माजी पालकमंत्री सतेज पाटील यांची कारकीर्द कर्तव्यशून्य राहिली आहे. त्याचप्रमाणे माजी खासदार राजू शेट्टी यांना तर जनतेनेच नाकारले आहे. त्यामुळे या दोघांना आता बिनबुडाच्या टीका करण्याखेरीज कोणतेही काम शिल्लक राहिले नसल्यानेच वैफल्यग्रस्त होवून ते कर्तव्यदक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांच्यावर प्रसिद्धी पोटी खोटे आरोप करत आहेत. माजी पालकमंत्री सतेज पाटील यांनी बगलबच्च्यांना पुढे न करता स्वत: समोर यावे. राजू शेट्टी यांच्यासारख्या पाकीटबाबांनी यापुढे बोलताना विचार करून बोलावे, अन्यथा त्यांची अनेक प्रकरणे आम्हीही बाहेर काढू, असा सज्जड इशारा शिवसेना जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिला आहे.
शिवसेना जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण पुढे म्हणाले कि, जनतेने महायुतीवर दाखविलेल्या विश्वासामुळे राजू शेट्टी यांच्यासारख्या अनेकांना आता काही काम राहिलेले नाही. शैक्षणिक संस्थांमधील बेहिशोबी डोनेशनच्या मिळकतीवर एका नेत्याने अनेक पाकीटबाबांना दत्तक घेतले आहे. त्यांना इतरांवर टीका करण्यासाठीच पोसले जात आहे. शक्तीपीठ महामार्ग संपूर्ण राज्याच्या विकासात मोलाचे योगदान देणारा ठरणार आहे. त्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकरीबांधवांचा वाढता पाठींबा मिळत असल्याने विरोधकांना पोटशूळ उठले असून, वैयक्तिक टीका टिप्पणी पर्यंत त्यांची पातळी घसरली आहे. वैयक्तिक टीका टिप्पणी करणे राजकीय संस्कृती नाही, परंतु जर आमदार राजेश क्षीरसागर यांच्यासारख्या कर्तबगार नेत्यावर कोणीही वैयक्तिक खोट्या टीका करत असतील तर त्यांची अनेक प्रकरणे शिवसेना बाहेर काढेल.
आमदार सतेज पाटील यांनी निवडणुकीतही १०० कोटींच्या रस्त्यांचे वर्क ऑर्डर झाल्या नसल्याची खोटी बतावणी केली होती. त्यावेळी आमदार राजेश क्षीरसागर यांनी दिलेले आवाहन त्यांनी का स्वीकारले नाही? त्याचपद्धतीने आताही शक्तीपीठ महामार्गाच्या समर्थनार्थ असणाऱ्या शेतकरी बांधवांना खोटे शेतकरी म्हणण्याची मजल त्यांची गेली आहे. याबाबतही आमदार राजेश क्षीरसागर यांनी त्यांना जाहीर आवाहन दिले आहे, ते त्यांनी स्वीकारावे आणि समर्थन देणारे शेतकरी बाधित शेतकरी असतील तर त्यांनी राजकीय संन्यास घ्यावा. कोल्हापूर शहराची हद्दवाढ, खंडपीठ असे जिव्हाळ्याचे प्रश्न ते पालकमंत्री असताना सोडवू शकले असते. परंतु त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत कन्व्हेन्शन सेंटरच्या फक्त बाता केल्या ते कन्व्हेन्शन सेंटर आमदार राजेश क्षीरसागर यांनी मंजूर केले. थेट पाईपलाईनच्या पाण्याच्या आंगोळीसाठी ते अनेक वर्षे प्रतीक्षेत होते परंतु त्यातही ढपला पाडून गळकी थेट पाईपलाईन कोल्हापूर वासीयांच्या माथी मारली. आय.आर.बी. टोलचे भूत कोल्हापूरकरांच्या मानगुटीवर बसवून स्वत: टोलची पावती फाडली. ख्रिश्चन समाज दफनभूमीसाठी आरक्षित जागा त्यांना सुटली नाही. ख्रिश्चन समाजाला वाऱ्यावर सोडून त्यांनी स्वत: कॉलेजसाठी जागा लाटली, ही पाप ते कुठ फेडणार.. या उलट आमदार राजेश क्षीरसागर यांनी गेल्या काही वर्षात कन्व्हेन्शन सेंटर मंजूर केले. रंकाळा तलावाचे सुशोभिकरण करून कोल्हापूरच्या वैभवात भर घातली. ३२०० कोटी रुपयांचा कोल्हापूर सांगली पूरनियंत्रण प्रकल्प मंजूर केला. १०० कोटींचे रस्ते आणले, संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाच्या पुर्नबांधणीसाठी मा.एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून एका दिवसात निधी मंजूर केला. पुढील काळातही कोल्हापूर जिल्ह्याच्या आणि राज्याच्या विकासात आमदार राजेश क्षीरसागर यांचे मोलाचे योगदान असणार आहे. आय.टी.पार्क, फौंड्री हब, पर्यटन विकास यामाध्यमातून आमदार राजेश क्षीरसागर यांनी कोल्हापूर जिल्ह्याचा कायापालट केल्याचे दिसून येईल.
आमदार सतेज पाटील हे आमदार राजेश क्षीरसागर यांच्यावर खोटे आरोप करून दमले आहेत. त्यामुळे जुने तत्थ्यहीन आरोप राजू शेट्टी या पाकीटबाबांकडून वधवून पुन्हा जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत. माजी खासदार राजू शेट्टी यांनाही कारखानदारांशी युती केल्याने पैशाची कावीळ झाली आहे. त्यांनाही सर्व ठिकाणी पैसेच दिसू लागले आहे. पण, त्यांनी लक्षात घ्यावे कि, दुसऱ्याला बोट दाखविताना चार बोटे स्वत: कडे असतात. त्यांनी आरोप सिद्ध करावेत असे खुले आव्हान शिवसेना देत आहे. त्याचप्रमाणे माजी खासदार राजू शेट्टी यांनी गगनबावडा तालुक्यात शेकडो एकर जमीन कुणाच्या जीवावर घेतली याचाही खुलासा त्यांनी करावा.
महायुती सरकार विकासाचे काम करत असताना शेतकरी बांधवांमध्ये गैरसमज पसरवून राजकीय पोळी लाटण्याचा डाव विरोधकांनी आणि त्यांनी पोसलेल्या बगलबच्च्यांनी सुरु केला आहे. परंतु, खोटे आरोप करून संभ्रम पसरविण्याच्या त्यांच्या उद्योगाला जनतेने वेळीच ओळखले असून, येणाऱ्या काळात शक्तीपीठ महामार्ग पूर्णत्वास येण्यासाठी उर्वरित शेतकरी बांधव स्वत:च्या सहमतीने पुढे येतील, असा ठाम विश्वासही जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण यांनी व्यक्त केला.