दूध उत्पादकांच्या विश्वासावर ‘गोकुळ’ची भरारी
– नविद मुश्रीफ
चेअरमन, गोकुळ दूध संघ
कोल्हापूर, ता. ७ : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्या. (गोकुळ) हा दुग्धव्यवसायामध्ये जिल्ह्यातीलच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील आदर्श दूध संघ ठरला आहे. दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांना प्राधान्य, योग्य दराची हमी, जातिवंत म्हैस खरेदी अनुदान, वैरण अनुदान, पशुवैद्यकीय सेवा, संस्था इमारत अनुदान, मुक्त गोठा योजना तसेच विविध अनुदान योजना, ग्राहकांनासाठी नवीन दुग्धजन्य उत्पादनांची निर्मिती अशा अनेक उपक्रम गोकुळने राबविले असून ‘गोकुळ’वरील दूध उत्पादकांचा विश्वास अधिक द्विगुणित झाला आहे. या विश्वासाच्या भक्कम आधारावर ‘गोकुळ’ची भरारी सुरू आहे. यंदाच्या ६३ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या पार्श्वभूमीवर संघाने गेल्या काही महिन्यांत राबवलेल्या उपक्रमांचा आढावा घेऊन शेतकऱ्यांसमोर आणखी काही महत्त्वाचे मुद्दे मांडले आहेत.
गोकुळ दूध संघाने यावर्षांला ‘युवा दूध उत्पादक वर्ष’ म्हणून साजरे करण्याचा निर्णय घेतला असून या माध्यमातून ग्रामीण भागातील युवकांना दुग्ध व्यवसायाकडे आकर्षित करून उत्पन्नाच्या नवीन संधी उपलब्ध करून देण्याचा संकल्प गोकुळने केला आहे. वीस लाख लिटर संकलनाचे उद्दिष्ट गाठणे, म्हैस दूध वाढीसाठी शेतकऱ्यांसाठी आणखी प्रोत्साहन योजना, फर्टीमीन प्लस अनुदार योजना, तसेच जातिवंत रेडी/वासरू संगोपन योजना या योजनेसह गोकुळ चे दूध व दुग्धजन्य पदार्थांच्या विक्रीत वाढ होण्यासाठी तसेच गोकुळचे दुग्धजन्य पदार्थ आंतरराष्ट्रीय बाजार पेठेमध्ये विक्री करणेसाठी संघाचे वितरण (मार्केटिंग) यंत्रणा अधिक सक्षम करणे यावर भविष्यात लक्ष राहिल असे त्यांनी स्पष्ट केले.
गोकुळने नुकतीच म्हैस व गाय दूध खरेदी दरात प्रतिलिटर १ रुपयेची वाढ केली असून यामुळे गोकुळच्या दूध उत्पादकांना महिन्याला जवळपास ५ कोटी रुपयांचा जादा दर मिळणार आहे. गेल्या महिनाभरात गोकुळच्यावतीने दर वर्षीप्रमाणे जिल्ह्यातील १२ तालुक्यांमध्ये संपर्क सभांचे आयोजन करण्यात आले. या सभेत दूध उत्पादक शेतकरी, संस्था प्रतिनिधी यांनी थेट संवाद साधून आपले प्रश्न, सूचना आणि अडचणी मांडल्या.त्यांच्या या प्रश्नांचे, अडचणीचे निरसन स्थानिक पातळीवरच केले गेले आहे. आणि जे धोरणात्मक मुद्दे आहेत त्यांना वार्षिक सभेत नोंदवून आवश्यक ते निर्णय घेतले जाणार आहेत. काही संस्थांनी संघाच्या वार्षिक अहवालावर लेखी प्रश्न विचारले आहेत. याची गोकुळ प्रशासनाने योग्य ती दखल घेऊन संबंधित संस्थेना लेखी उत्तरे देण्याची व्यवस्था केली आहे.
गोकुळ दूध संघाच्या ६३ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत संस्था प्रतिनिधींनी मांडलेला प्रत्येक प्रश्न व सूचना ही संघासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. त्यांची नोंद घेऊन उत्पादकांच्या हितासाठी आवश्यक ती ठोस पावले उचलण्यात येतील, अशी ग्वाही गोकुळचे चेअरमन नविद मुश्रीफ यांनी दिली. “वार्षिक सभेत दूध उत्पादक सभासदांना प्रश्न विचारण्याचा व सूचना देण्याचा संपूर्ण अधिकार आहे. प्रत्येक प्रश्नाला समाधानकारक उत्तरे दिली जातील. तसेच सुचवलेले मुद्दे प्रत्यक्ष अंमलात आणले जातील,” असे आश्वासन मुश्रीफ यांनी दिले. मुश्रीफ पुढे म्हणाले की, “गोकुळ संचालक मंडळाचे निर्णय, पारदर्शक कार्यपद्धती आणि उत्पादकांशी असलेला थेट संवाद यामुळे संघाची प्रगती अधिक वेगाने होत आहे. संघाच्या प्रगतीमागे उत्पादकांचा विश्वास आणि सातत्याने दिलेले सहकार्य हाच मोठा आधार आहे.” येत्या ९ सप्टेंबर २०२५ रोजी श्री महालक्ष्मी पशुखाद्य कारखाना, पंचतारांकित औद्योगिक वसाहत, कागल येथे गोकुळची ६३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा होत आहे. या सभेत २०२४-२५ या आर्थिक वर्षाचा वार्षिक अहवाल, अंदाजपत्रक, विविध विकासकामे आणि उत्पादकांच्या हिताशी संबंधित नवे निर्णय जाहीर होणार आहेत. “ही सभा उत्पादकांसाठी महत्त्वपूर्ण ठरणार असून सर्व संस्था प्रतिनिधी आणि दूध उत्पादकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे,” असे आवाहन चेअरमन नविद मुश्रीफ यांनी केले.
दूध उत्पादकांच्या हितासाठी यंदा संघाने काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत :
· गाय व म्हैस दूध खरेदी दरात १ रुपयांची वाढ – १ सप्टेंबरपासून लागू.
· जातिवंत म्हैस खरेदी अनुदान ४०,००० वरून ५०,००० रुपये.
· इमारत अनुदानात ८,००० ते १०,००० रुपयांची वाढ.
दुध संस्था कर्मचारी प्रोत्साहन प्रतिलिटर पाच पैसे वाढ
· वासरू संगोपन योजनेत २,००० रुपये वाढ.
· महालक्ष्मी पशुखाद्य कारखान्यातून सभासदांना ५०% सबसिडी दरात (७५ रुपये) मिनरल मिक्स्चर दिले जात आहे. आतापर्यंत संघाने ७ कोटी रुपयांचे मोफत मिक्स्चर वितरित केले आहे.
· पशुखाद्य विक्री करणाऱ्या सचिवांना तीन महिन्यांसाठी कमिशन वाढ दिली आहे.
· संस्थेच्या कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन दरात वाढ करून कर्मचारी हिताचा विचार केला आहे.
· मुक्त गोठा अनुदान योजना
सौर ऊर्जा प्रकल्पामुळे बचत
करमाळा येथील सौर ऊर्जा प्रकल्पामुळे संघाला दरवर्षी ७–८ कोटी रुपयांची बचत होणार आहे. वीज खर्च कमी झाल्याने संघाची आर्थिक स्थैर्य अधिक मजबूत होत आहे.
भविष्यातील योजना
· गोकुळ चीज व आईसक्रिम यांसारख्या नवीन उत्पादनांची निर्मिती.
· गोकुळच्या दुग्धजन्य उत्पादनांची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये उपलब्ध करण्याच्या मानस.
· गाभण जनावरांसाठी ‘प्रेग्नेंसी रेशन’ पशुखाद्य लवकरच उपलब्ध करून दिले जाणार आहे.
—————————————————————————————————-