कडगांवचे सुपुत्र व दिल्ली- मेरठ अपघातातील शहीद जवान अक्षय शिवाजी चौगुले यांच्या पार्थिवाचे मंत्री हसन मुश्रीफ यांनी घेतले अंत्यदर्शन
कर्तव्यावरच अपघाती निधन झालेल्या जवानाला पुष्पचक्र अर्पण करून वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली
कडगांव, दि. ४:
कडगांव ता. गडहिंग्लज येथील सुपुत्र व दिल्ली- मेरठ येथे कर्तव्यावर असलेले जवान श्री. अक्षय शिवाजी चौगुले यांचे तीन दिवसांपूर्वी अपघाती निधन झाले होते. आज त्यांचे पार्थिव गावी पोहोचले. कडगांवमध्ये पोहोचत वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले आणि पुष्पचक्र अर्पण करून भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.
यावेळी बोलताना मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, ऐन तरुण वयातच जवान अक्षय शिवाजी चौगुले यांच्या जाण्यामुळे त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा पहाड कोसळलेला आहे. समाज म्हणून आपण सर्वजण या कुटुंबाच्या पाठीशी उभे राहूया. ऊन, वारा, पाऊस, बर्फ, थंडी अशा अनेक संकटांनी चहुबाजूने घेरलेले असतानाही भारतमातेच्या संरक्षणासाठी तळहातावर प्राण घेऊन सैनिक लढत असतात. अशा आजी-माजी- सैनिकांच्या आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे, हे आपणा सर्वांचे सामाजिक कर्तव्य आहे.
यावेळी माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सतीश पाटील – गिजवणेकर, गोड साखरचे चेअरमन प्रकाशभाई पताडे, जिल्हा परिषद सदस्य सौ. शैलजा पाटील, गडहिंग्लज पंचायत समितीच्या सभापती डॉ. प्रतिभा चव्हाण – आगलावे, तहसीलदार ऋषिकेत शेळके, सदानंद पाटील, बंटी पाटील, नेताजी पाटील, भीमराव राजाराम, आनंदा पाटील, संजय बटकडली, अजित जामदार आदी प्रमुखांसह ग्रामस्थ व पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
…………
कडगांव ता. गडहिंग्लज येथील सुपुत्र व दिल्ली- मेरठ येथील अपघातातील शहीद जवान अक्षय शिवाजी चौगुले यांच्या पार्थिवाचे मंत्री हसन मुश्रीफ यांनी अंत्यदर्शन घेतले व पुष्पचक्र अर्पण करून भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.





