*कबनूर मतदारसंघात गुंडापुंडांच्या दहशतीला न घाबरता राष्ट्रवादीच्या उमेदवारांना विजयी करा*
*मंत्री हसन मुश्रीफ यांचे आवाहन*
*ॲड. शरद कांबळे-शिंदे, अशोक पाटील, सौ. अनुराधा पाटील यांच्या विजयाने इतिहास घडवा*
कबनूर, दि. ५:
कबनूर जिल्हा परिषद मतदारसंघात आम्ही विरोधी उमेदवारांच्या गुंडागर्दीचा बोलबाला ऐकला आहे. अशा गुंडा- पुंडांच्या दहशतीला न घाबरता राष्ट्रवादीच्या उमेदवारांना प्रचंड मताधिक्याने विजयी करा, असे आवाहन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. आम्ही राष्ट्रवादीचे कार्यकर्ते अशा गुंडा-पुंडांना मानत नाही. जिल्हा परिषद उमेदवार ॲड. शरद कांबळे- शिंदे, कबनूर पूर्व पंचायत समिती मतदारसंघाच्या उमेदवार सौ. अनुराधा बाळकृष्ण पाटील, कबनूर पश्चिम पंचायत समिती मतदारसंघाचे उमेदवार अशोक देवगोंडा पाटील यांच्या विजयाने एक नवा इतिहास घडवा, असेही ते म्हणाले.
कबनूर ता. हातकणंगले येथे कबनूर जिल्हा परिषद मतदारसंघातील राष्ट्रवादीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ मंत्री श्री. मुश्रीफ बोलत होते.
भाषणात मंत्री श्री. मुश्रीफ पुढे म्हणाले, दिवसेंदिवस कबनूरचा विस्तार वाढत असल्यामुळे गावाचे नागरिकीकरण झपाट्याने वाढत आहे. साहजिकच इथले प्रश्न न सुटता तेही वाढतच आहेत. कबनूर जिल्हा परिषद मतदारसंघातील राष्ट्रवादीच्या तिन्ही उमेदवारांना संधी द्या, इथल्या विकास कामांसाठी लागेल तेवढा निधी देऊ.
चौकट……
*पाच हजार घरकुले देऊ….!*
मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, कबनूर मतदारसंघातील या तिन्ही उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने निवडून द्या. कागल शहराप्रमाणेच कबनूरमध्येही बेघरांना पाच हजाराहून अधिक घरकुले देऊ. ही घरकुले ५० हजार रुपयेपेक्षा कमी किमतीत लाभार्थ्यांना मिळतील.
जिल्हा परिषद उमेदवार ॲड. शरद कांबळे- शिंदे म्हणाले, मंत्री हसनसाहेब मुश्रीफ यांच्या माध्यमातून मराठा मंडळ जागा, कचरा उठाव, स्वच्छता व आरोग्य, शैक्षणिक सुविधा, स्वच्छ व मुबलक पाणी या विकासकामांच्या पूर्ततेसह व्यक्तिगत कल्याणकारी योजनाही ग्रामस्थांच्या घरोघरी पोहोचवू.
यावेळी व्यासपीठावर केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैया माने, मिलिंद कोले, कोल्हापूरचे नगरसेवक आदिल फरास, बाळासाहेब देशमुख, असिफ फरास, सुहास जांभळे, अमित गाताडे, अनिल पाटील, बी. एन. पाटील, राहुल कांबळे, अंकुश डांगे, प्रियांका कांबळे आदी प्रमुख उपस्थित होते.
……….
*कबनूर जिल्हा परिषद मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर प्रचारसभेत बोलताना वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, जिल्हा परिषद उमेदवार ॲड. शरद कांबळे आणि समोर उपस्थित जनसमुदाय.*
=========



