*केंद्रासह राज्यातही सत्ता नसल्यामुळे विरोधक निधी आणणार कसा…?*
*मंत्री हसन मुश्रीफ यांचा सवाल*
*कोल्हापूरवासीयांना खोटी स्वप्ने दाखवून दिशाभूल करणे बंद करा*
*प्रभाग क्र. ३, १२, १४, १९ मध्ये जाहीर सभांना जोरदार प्रतिसाद*
*कोल्हापूर, दि. ७:*
काँग्रेसची सत्ता केंद्रासह राज्यातही नाही. एकही आमदार नाही. त्यामुळे त्यांना केंद्राकडूनही निधी मिळणार नाही आणि राज्याकडूनही निधी मिळणार नाही. जिल्हा नियोजन मंडळातूनही त्यांना निधी मिळणार नाही. तर मग काँग्रेस पक्ष कोल्हापूर शहरातील नागरिकांना दाखवीत असलेली खोटी स्वप्ने आणि शहरातील विकासकामांचे प्रश्न कसे सोडवणार आहेत? असा सवाल वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केला.
ते पुढे म्हणाले, जनतेला फसवून, थापा मारून खोटी स्वप्ने दाखवू नका. याच्याही पुढे जाऊन माझी तर त्यांना जाहीर विनंती आहे की, सगळ्या उमेदवाऱ्या माघार घ्या. आम्ही महायुती म्हणून काय- काय करणार आहोत ते आम्ही जनतेला स्टॅम्पवर लिहून देतो.
कोल्हापूर महापालिकेच्या प्रभाग क्र. ३, १२, १४, १९ मध्ये जाहीर सभांना जोरदार प्रतिसाद मिळाला.
यावेळी त्यांच्यासमवेत आमदार राजेश क्षीरसागर, भाजपचे प्रदेश सरचिटणीस महेश जाधव, शहराध्यक्ष विजय जाधव, केडीसीसी बँकेचे माजी संचालक असिफ फरास आदी प्रमुखांसह महायुतीचे पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.
मंत्री श्री. मुश्रीफ पुढे म्हणाले, कोल्हापूर महानगरपालिकेची सत्ता महायुतीला द्या; कोल्हापूर शहराचा स्वर्ग केल्याशिवाय राहणार नाही. विरोधी महाविकास आघाडीकडे विकासाचा कोणताही अजेंडा नसून कोल्हापूरचा सर्वांगीण विकास महायुतीच करेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
*सीपीआर आणि शेंडा पार्क…..!*
श्री. मुश्रीफ म्हणाले, महायुतीचे सरकार हे जनतेची सेवा करणारे सरकार आहे. छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालय म्हणजेच सी. पी. आर. हा दवाखाना कोल्हापूरकरांची लाईफ लाईन आहे. थोरला दवाखाना अशी ओळख असलेल्या या दवाखान्याचा शंभर कोटी निधीतून कायापालट होत आहे. येत्या दोन-तीन महिन्यात या थोरल्या दवाखान्याचे रूप मुंबईच्या बॉम्बे हॉस्पिटल, जसलोक हॉस्पिटल यासारखे सुंदर होईल. शेंडा पार्कमध्ये ३० एकरांत राजर्षी छत्रपती शाहू महाराज वैद्यकीय नगरी साकारत आहे. तिथे अकराशे बेडचे हॉस्पिटल निर्माण होत आहे. यामध्ये ६०० बेड्सचे सामान्य रुग्णालय, अडीचशे बेड्सचे अतिविशेषोपचार रुग्णालय आणि अडीचशे बेड्सचे कॅन्सर हॉस्पिटल साकारत आहे. कोल्हापूरच्या एकाही रुग्णाला मुंबई किंवा पुण्याला उपचारासाठी जावे लागणार नाही.
…………..
*कोल्हापूर: कोल्हापूर महापालिका निवडणूकीत प्रभाग १४ मध्ये शाहूपुरीतील पंचमुखी गणेश मंदिर परिसरामध्ये महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ जाहीर सभांमधून बोलताना वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, आमदार राजेश क्षीरसागर व उपस्थित नागरिक.*
===========



