*मंत्री हसन मुश्रीफ यांना परदेशात जातानाही रुग्णांचीच काळजी*
*अखंडित रुग्णसेवेसाठी तरतूद*
*कागल, दि. ११:*
महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री तथा; कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचे जनतेशी ऋणानुबंध घट्ट आहेत. विशेषता; रुग्णसेवा हा त्यांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. पंधरवड्याच्या परदेशी सहलीवर जातानासुद्धा रुग्णांची काळजी घेणारे श्री. मुश्रीफ आगळेवेगळे लोकप्रतिनिधी आहेत. परदेश दौऱ्यादरम्यानच्या पंधरवड्याच्या काळात रुग्णांची उपचाराअभावी परवड होऊ नये म्हणून त्यांनी मनुष्यबळाची विशेष तरतूद करून ठेवली आहे. रुग्णसेवा अखंडित ठेवण्यासाठी श्री. मुश्रीफ यांची ही तळमळ लौकिकास्पद आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, मंत्री श्री. मुश्रीफ शुक्रवारपासून दि. १२ ते २२ इंग्लंड आणि स्कॉटलंड दौऱ्यावर जात आहे. त्यांच्या कागलमधील घराबाहेरच्या फलकावर याबाबतचे जाहीर निवेदन केले आहे. फलकावर लिहिलेल्या निवेदनात म्हटले आहे……
*समस्त रुग्णांच्या माहितीसाठी…..!*
माझ्यासह आम्ही केडीसीसी बँकेचे सर्व संचालक मंडळ येत्या दहा दिवसांसाठी आपापल्या खर्चाने परदेश दौऱ्यावर जात आहोत. शुक्रवार दि 12/ 9/ 2025 पासून सोमवार दि. 22/ 9/ 2025 या कालावधीत हा परदेश दौरा आहे. या परदेश दौऱ्यामध्ये माझ्यासोबत माझे स्वीय सहाय्यक श्री. वजीर नायकवडी हेही सहभागी आहेत.
दरम्यान; रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा….. या भावनेतून ती नियमित व अखंडितपणे सुरूच राहणार आहे. रुग्णांची व नातेवाईकांची गैरसोय होऊ नये म्हणून रुग्णसेवेची ही जबाबदारी श्री. योगेश कांबळे व श्री. गैबी नाईक यांच्यावर दिलेली आहे. परदेश दौऱ्याच्या या कालावधीत रुग्ण अथवा नातेवाईकांनी श्री. योगेश कांबळे व श्री. गैबी नाईक यांच्याशी संपर्क साधावा. रुग्णांच्या योग्य त्या उपचारासंबंधी पुढील व्यवस्था ते करतील.
तसेच, परदेश दौऱ्यामध्ये माझा मोबाईल सुरू असेल. लंडन, स्कॉटलंड या देशांची वेळ पाहून महत्त्वाचे (अर्जंट) काम असेल तर फोन करण्यास काहीच हरकत नाही.
*वैद्यकीय सेवा अखंडीत राहील…….!*
या फलकावर मंत्री हसन मुश्रीफ यांनी म्हंटलेले आहे, परदेश दौऱ्याच्या या कालावधीमध्ये माझा मोबाईल सुरूच असेल. अत्यंत आवश्यक काम असेल तर फोन कराच. या काळात वैद्यकीय सेवा ही निरंतरपणे सुरूच असेल. त्यासाठी सकाळी कागलमधील निवासस्थान आणि मुंबईतील मंत्रालयासमोरील अ – ५ या निवासस्थानी रुग्णसेवेसाठी माणसांची व्यवस्था केलेली आहे.
……….
*कागल- वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी परदेश दौऱ्यावर जातानाही रुग्णसेवा अखंडित ठेवण्यासाठी रुग्णांना व नातेवाईकांना असे जाहीर निवेदन केले आहे.*
===========