*नाना नानी पार्कचा रौप्य महोत्सव उत्साहात संपन्न*

Spread the news

*नाना नानी पार्कचा रौप्य महोत्सव उत्साहात संपन्न*
कोल्हापूर महानगरपालिका व रोटरी क्लब ऑफ कोल्हापुर यांचा संयुक्त उपक्रम असलेल्या ताराबाई पार्क मधील रोटरी नाना नानी पार्कचा रौप्य महोत्सव सोहळा अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. रविवार दिनांक 15 फेब्रुवारी रोजी संपन्न झालेल्या या सोहळ्याचे प्रमुख पाहुणे राज्याचे अतिरिक्त मुख्य सचिव राजगोपाल देवरा हे उपस्थित होते. ज्येष्ठांसाठी विरंगुळा केंद्र विकसित व्हावे यासाठी नाना नानी पार्क सारख्या उद्यानांच्या विकासासाठी समाजातील विविध सामाजिक संस्थांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले. खासदार छत्रपती शाहू महाराज कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
रोटरी नाना नानी पार्क मध्ये नियमित येणाऱ्या ज्येष्ठांनी पार्क बद्दल कृतज्ञता व्यक्त केली. मुख्य सचिव राज गोपाल देवरा पुढे म्हणाले खरे तर नाना नानी पार्क महापालिकेने विकसित केले असतें तर ते व्यवस्थित देखभाली खाली राहिले नसते मात्र रोटरी क्लब ऑफ कोल्हापूरने त्यात वाटा उचलल्यामुळे पार्कचे सौंदर्य अधिक खुलत गेले. अशाच पद्धतीने शहरातील अनेक उद्याने अशा सामाजिक संस्थांच्या माध्यमातून उभी करता येतील.
खासदार शाहू महाराज म्हणाले, बरेचदा कामानिमित्त इकडून जाणे झाले पण पार्कमध्ये कधी गेलो नाही आज रौप्य महोत्सव निमित्त मी पार्क मध्ये आलो. खूप चांगले काम रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर आणि महानगरपालिकेने उभे केले आहे पुन्हा इथे यायला निश्चितच आवडेल.
नूतन महापौर सौ. रुपाराणी निकम म्हणाल्या की माझ्याकडे खूप कमी वेळ व खूप कामे आहेत , आपणासारख्या संस्थांच्या मदतीतून अशी अधिकाधिक कामे करायला मला नक्कीच आवडेल.
रौप्य महोत्सवी समितीचे अध्यक्ष डॉक्टर रमाकांत दगडे म्हणाले, नाना नानी पार्क संकल्पना उभी करण्याचे श्रेय दिवंगत दिग्विजय खानविलकर यांच्याकडे जाते. मुंबईतील गिरगाव चौपाटीवर असलेल्या नाना नानी पार्क सारखे किंवा त्या पद्धतीचे नाना नानी पार्क कोल्हापुरात व्हावे अशी त्यांची इच्छा होती, देवरा यांच्या मदतीने हें काम पूर्ण झाले.
2006 पासून रोटरी नाना नानी पार्क चा कार्यभार संजीव चिपळूणकर यांनी चेअरमन म्हणून सांभाळला त्यानंतर मीटिंग व सर्व वर्तमानपत्रांच्या मोफत लायब्ररीसाठी साडेसातशे स्क्वेअर फुटाचा खुला हॉल, कमळ उद्यान, पाथवेची दुरुस्ती ,बागेतील पाला पाचोळ्या पासून खताचा प्रोजेक्ट, एक्वागार्ड सह पिण्याच्या पाण्याची सोय, टॉयलेट ब्लॉक असे सर्व सुख सोयींनी युक्त नाना नानी पार्क बनवले. बाहेरील बाजूस रॉक गार्डन देखील बनवण्याची सुरुवात केली व बाग परिपूर्ण बनवण्याचा प्रयत्न केला. या बागेत येऊन आमचे आयुष्य वाढले असा ज्येष्ठ मंडळींचा रिमार्क ऐकून मनाला परिपूर्ण आनंद वाटला असे मत यावेळी नाना नानी पार्क कमिटी चेअरमन संजीव चिपळूणकर यांनी व्यक्त केले.
यावेळी मुख्य आयुक्त (आयकर विभाग) आर एन माधवी, महापौर रुपाराणी निकम, मधुरिमा राजे छत्रपती, नगरसेवक पल्लवी देसाई यांची प्रमुख उपस्थिती होती. रोटरीचे अध्यक्ष प्रदीप कारंडे, प्रोबस चे अध्यक्ष दिगंबर कुलकर्णी व सर्व सदस्यांचे सहकार्य लाभले.

­

 


Spread the news

You may also like

error: Content is protected !!