- *नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना कधी भरपाई देणार*
*आमदार सतेज पाटील यांचा सवाल : कार्यवाही सुरु असल्याची मंत्र्यांची माहिती*
*कोल्हापूर :* राज्यात नैसर्गिक आपत्तीमुळे मृत्यूमूखी पडलेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांना आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शंभर टक्के नुकसानभरपाई देण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली आहे. असा प्रश्न काँग्रेसचे विधानपरिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी बुधवारी अधिवेशनात उपस्थित केला. यावर, शेतकऱ्यांच्या पीक नुकसानीबाबत मदत देण्यासंदर्भात शासन स्तरावर कार्यवाही सुरु असल्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी सांगितले.
सतेज पाटील म्हणाले, राज्यात गेल्या तीन महिन्यात झालेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे तसेच वीज पडून झालेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीपिकांंचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्याचबरोबर जिवितहानीही झाली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील नुकसानग्रस्त भागांमध्ये तात्काळ पाहणी आणि पंचनामे करण्याबाबत कोणती कार्यवाही केली? मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तींच्या कुुटुंबियांंना आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शंभर टक्के नुकसान भरपाई देण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली ? असा सवाल आमदार पाटील यांनी उपस्थित केला. यावर मंत्री मकरंद पाटील यांनी नैसर्गिक आपत्तीमुळे झालेले मृत व्यक्ती आणि मृत जनावरांबाबत अनुदान तातडीने आणि वेळेवर वाटपासाठी उणे प्राधिकार पत्रावर देयक सादर करण्याची सुविधा शासनाकडून देण्यात आल्याचे सांगितले. काही ठिकाणी अनुदान वाटपही केले आहे. तर काही ठिकाणी अनुदान वाटपाबाबतची कार्यवाही तहसीलस्तरावर सुरु आहे. शेती पीक नुकसानीचे पंचनामे तातडीने करुन मदत वितरणाबाबत सूचना दिल्याचे मंत्री मकरंद पाटील यांनी सांगितले.