एनजीओ कंपॅशन २४,कोल्हापूर वुई केअर, निसर्ग अंकुर संस्था, इकोस्वास्थ आणि किर्लोस्कर आईल इंजिन्स ह्यांच्यावतीने येत्या ४ आणि ५ ऑक्टोंबर रोजी रानभाज्या आणि सेंद्रिय उत्पादन महोत्सव
कोल्हापूर/ प्रतिनिधी : सह्याद्री डोंगररांगा ,कोकण आणि विशेषतः पश्चिम महाराष्ट्रातील अत्यंत दुर्गम भागात, जंगलात नैसर्गिकरित्या उगवणाऱ्या आणि सहजगत्या उपलब्ध होणाऱ्या आरोग्यदायी, पौष्टिक व औषधी अशा रानभाज्यांची ओळख सर्वांना होऊन, त्यांचा वापर आहारात करावा,निसर्गप्रेमींंनी या रानभाज्या आपल्या परसबागेत लावाव्यात, तसेच शेतकऱ्यांनी महत्वाच्या दुर्मिळ रानभाज्यांची शेतात लागवड करुन त्यांचे फायदे मिळवावेत ह्यादृष्टीने एनजीओ कंपॅशन २४,कोल्हापूर वुई केअर आणि निसर्ग अंकुर ह्यांच्यावतीने जवळपास २०० हुन अधिक रानभाज्यांचे आणि सेंद्रिय उत्पादनांचे माहितीपूर्ण प्रदर्शन येत्या शनिवारी आणि रविवारी ४ आणि ५ ऑक्टोंबर २०२५ रोजी श्री महालक्ष्मी सांस्कृतिक भवन, साईक्स एक्सटेंशन टाकाळा, कोल्हापूर येथे सकाळी १० ते रात्री ८ ह्या वेळेत आयोजित करण्यात आले आहे,अशी माहिती एनजीओ कंपेंशन २४ आणि कोल्हापूर वुई केअरचे अध्यक्ष मिलिंद धोंड यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
या प्रदर्शनाचे उदघाटन शनिवारी सकाळी ४ ऑक्टोंबर रोजी १०.३० वाजता महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, राज्यसभा खासदार धनंजय महाडिक, माजी खासदार संजय मंडलिक यांच्या हस्ते होणार असून विभागीय कृषी केंद्र सहसंचालक बसवराज मास्तोळी, अतिरिक्त जिल्हाधिकारी संजय शिंदे, शिवाजी विद्यापीठाच्या जैवतंत्रज्ञान विभाग प्रमुख प्रा.डॉ. ज्योती जाधव, मुद्रांक जिल्हाधिकारी बाबासाहेब वाघमोडे यांच्या उपस्थितीत होणार आहे.
निसर्ग वनस्पती विविधतेने अत्यंत समृद्ध आहे.पुरातन काळापासून,पारंपारिकपणे अनेक रानभाज्या आवडीने शिजविल्या व खाल्ल्या जातात. निसर्गात अत्यंत दुर्मिळ असणाऱ्या गारंबीची ४ फुटी शेंग ,टेटूची तलवारीसारखी २ फुटी शेंग, खाजकुहीलीचे , वेल,शेरणी ,चन्नीचे वेल, सोनार वेल, कांड्याचित्रक, गाजरीची भाजी, खरशिंग शेंगा, कडवी,अमरकंद, नळीची भाजी, समुद्रशोक, दगडावर वाढणारा जैताळू, खडक अंबाडी, गिरजाला, सागरी किनाऱ्यावर वाढणारी समुद्रीय घोळ ,समुद्र शिंगी अशा कधीही सहज न बघायला मिळणाऱ्या रानभाज्या आपल्याला येथे बघता येतील.रुकाळू (वृक्षांवर उगवणारा अळू ), तीनतोंडी , मांजरी, बाफेली, सफेद मुसळी,कडवी, कोळयाचो माड अशा अत्यंत दुर्मिळ असणाऱ्या रानभाज्या तसेच करटोली, दिंडा, कुडा,आंबुशी, पाथरी,कुरडू ,बांबू कोंब ,रानगवर, केना,पानांचा ओवा, कपाळफोडी, चिवळ, आघाडा,काटेमाठ, जिवंती,अंबाडा, सुरण , टाकळा ,मटारू, भुई आवळी, भारंगी ह्या औषधी गुणांनीयुक्त आरोग्यवर्धक असलेल्या अनेक रानभाज्या आपल्याला ह्या प्रदर्शनात बघता येतील. लोकांना या रानभाज्यांची ओळख आणि माहिती मिळावी म्हणून मोहन माने, आणि सेंद्रिय उत्पादनांची माहिती डॉ.दिलीप माळी यांच्या परिश्रमातून साकार होत आहे. असे हे विविध अंगी रानभाज्यांचे माहितीपूर्ण प्रदर्शन आयोजित करण्यात येत आहे. अथक प्रयत्नांनी अनेक रानभाज्यांची बियाणे व तरु वापरून त्यांची रोपे कुंड्यांत तयार करण्यात आली असून ह्या रानभाज्यांच्या कुंड्या तसेच रानभाज्यांची बी-बियाणे प्रदर्शनात मांडण्यात येणार आहेत.
ह्या प्रदर्शनात मार्गदर्शन आणि सहकार्य मिळतेय ती, रानभाज्यांची ओळख, संवर्धन व संरक्षण याकरिता सन २०१० पासून विविध कृतीशील उपक्रम राबविणाऱ्या वनस्पती तज्ञ डॉ. मधुकर बाचुळकर ह्यांच्या “निसर्ग अंकुर “ ह्या संस्थेची. ह्या संस्थेतर्फे छायाचित्रांसह माहितीपूर्ण प्रदर्शन,मार्गदर्शक पुस्तके ,रानभाज्या पाककृती प्रात्यक्षिके व स्पर्धा ,तसेच रानभाज्या खाद्यमहोत्सव याचे सातत्याने आयोजन करण्यात येते.याबरोबरच संस्थेतर्फे दरवर्षी रानभाज्या शोधमोहीम राबविण्यात येते व विविध प्रदेशात वापरात असलेल्या नवनव्या रानभाज्यांची माहिती संकलित करण्यात येते.
या अनोख्या रानभाज्यांची चव चाखता यावी म्हणून, खाद्यपदार्थांचे स्टॉल्स ठेवण्यात येणार असून, महाराष्ट्रात प्रथम १०० हून अधिक रानभाज्या आणि त्यांची रोपे आणि
सेंद्रिय गूळ ,मध,भाजीपाला,धान्य, हर्बल औषध,ऑरगॅनिक औषध, कंपोस्ट खत,गांडूळ खत,
भाजीपाल्याची डीहायड्रेटेड पावडर,
सेंद्रिय भाजीपाला रोपे व बी बियाणे यांच्यासह सेंद्रिय भाजीपाल्यापासून बनवलेले खाद्यपदार्थांचे स्टॉल्स असे एकूण ३५ स्टॉल्स प्रदर्शनस्थळी उपलब्ध असतील.
ह्या वेळच्या प्रदर्शनाचे खास आकर्षण म्हणजे ५ ऑक्टोंबर रोजी दुपारी १२:०० वाजता प्रदर्शनस्थळी खास महिलांसाठी भरवण्यात येणारी रानभाज्यांची पाककृती स्पर्धा ( ग्रामीण व शहरी विभाग ) आणि त्यासोबत रोख पारितोषिक / सर्टिफिकेट जिंकण्याची संधी मिळणार आहे.
आजच खाली दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधा .स्पर्धेत नाव नोंदवून सहभागी व्हा….
सौ . मंजिरी कपडेकर – 9373319495
ऐश्वर्या जामसंडेकर – 7620619495
आपण महाराष्ट्राच्या मातीत फुलणाऱ्या ,रोगप्रतिकारक शक्ती वाढवणाऱ्या आरोग्यवर्धक रानभाज्या आणि सेंद्रिय उत्पादनांची माहिती घेऊन ,चौकस आहारातून सुदृढ पिढी घडवण्यासाठी विद्यार्थी, महिला,आबालवृद्ध तसेच सर्व नागरिकांनी ह्या एकमेव वैशिष्ट्यपूर्ण प्रदर्शनाचा अवश्य लाभ घ्यावा,असे आवाहन एनजीओ कंपेंशन २४, कोल्हापूर वुई केअरचे अध्यक्ष मिलिंद धोंड ह्यांनी केले आहे.
हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले असून प्रवेश विनामूल्य आहे.
चॅनल बी प्रदर्शनाचे मीडिया पार्टनर असून गार्डन क्लब कोल्हापूर, सौ.मंजिरी कपडेकर कूकींग क्लासेस, युथ ऍनेक्स आणि वुई केअर हेल्पलाईन तसेच डॉ.एन.डी.पाटील महाविद्यालय, मलकापूर,सार्थ, व्ही.टी.पाटील फौंडेशन, सिद्धगिरी नर्सरी आणि अवनी संस्था या सर्व संस्थांच्या मोलाच्या सहकार्याने हे प्रदर्शन पार पडणार आहे.
पत्रकार परिषदेस निसर्ग अंकुरचे अध्यक्ष डॉ.मधुकर बाचुळकर, डॉ. दिलीप माळी,पल्लवी कुलकर्णी, मंजिरी कपडेकर , शरद आजगेकर, अनुराधा भोसले, मोहन माने, अभिजित पाटील,प्रदर्शनाचे प्रोजेक्ट चेअरमन सुशांत टक्कळकी, को -चेअरमन अमृता वासुदेवन, कविता घाटगे, जितेंद्र शाह आणि निसर्ग अंकुर संस्थेचे , व्ही.टी.पाटील फौंडेशन आणि गार्डन क्लबचे पदाधिकारी उपस्थित होते.