*अन्यथा.. हक्कभंग दाखल करू : आमदार राजेश क्षीरसागर यांचा महापालिका अधिकाऱ्यांना इशारा*
*शहरातील दयनीय रस्त्यांबाबत महापालिका अधिकारी धारेवर, एक आठवड्याची मुदत*
कोल्हापूर दि.२७ : ऐन सणासुदीच्या काळात देशभरातील भाविक आई अंबाबाईच्या दर्शनाला येत आहेत. शहरातील रस्त्यांची दयनीय स्थिती पाहता नागरिकांमधून असंतोष व्यक्त होत आहे. जीवघेण्या खड्ड्यांमुळे नागरिकांचे जीव धोक्यात आले आहेत. यामुळे कोल्हापूर शहराची बदनामी होत आहे. लोकप्रतिनिधीना याची विचारणा होत आहे. रस्त्यांसाठी आम्ही जीव तोडून निधी आणायचा पण.. महानगरपालिकेचे अधिकाऱ्यांच्या अकार्यक्षमपणामुळे बदनामीला आम्ही सामोरे जायचे. बैठका घेवून सूचना करूनही कामात सुधारणा होताना दिसत नाही. पुढील काळात हे खपवून घेतले जाणार नाही. कोणाचीही मुलाहिजा न बाळगता अधिकाराचा वापर करून येत्या आठ दिवसांत शहरातील रस्त्यांची सुधारणा झालेली दिसली पाहिजे. अन्यथा.. लोकप्रतिनिधींच्या सूचनांचा अवमान करणाऱ्या अधिकाऱ्यांवर येत्या अधिवेशनात हक्कभंग प्रस्ताव दाखल करू, असा सज्जड इशारा राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी कोल्हापूर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना दिला.
शहरातील शहरातील दयनीय अवस्था झालेल्या रस्त्यांबाबत शासकीय विश्रामगृह येथे आयोजित बैठकीत आमदार राजेश क्षीरसागर यांनी महापालिका अधिकाऱ्यांना धारेवर धरत कामाबाबत संताप व्यक्त केला. यासह रस्त्यांची सुधारणा करण्यासाठी तात्काळ उपाययोजना करा अशा सूचना देत एक आठवड्यांची मुदत महापालिका अधिकाऱ्यांना दिली.
यावेळी बोलताना आमदार राजेश क्षीरसागर पुढे म्हणाले कि, शहरातील रस्त्यांसाठी निधी मंजूर आहे. पण दर्जेदार काम दिसून येत नाही. महानगरपालिका अधिकाऱ्यांचे यावर नियंत्रण नाही. महानगरपालिकेची सल्लागार कंपनी, वॉर्ड अधिकारी, उपअभियंत्यांनी जागेवर जावून पाहणी करणे गरजेचे आहे. त्यांच्या कामातील चुकांमुळे संपूर्ण शहराची बदनामी होत आहे. कंत्राटदार काम करत नसतील तर त्याला ब्लॅक लिस्ट मध्ये टाकून त्यांचे काम काढून घ्या. काम करणाऱ्या कंत्राटदाराला नव्याने निविदा काढून काम द्या. कोणीही राजकीय दादागिरी करत असेल तर लोकांचे काम थांबविणाऱ्यावर गुन्हे दाखल करा. पुढील काळात गलथान कारभार खपवून घेतला जाणार नाही. रस्त्यांची कामे वेळेत आणि दर्जेदार पद्धतीने झाली पाहिजेत. रस्त्यांच्या कामांची यादी तयार करून त्या- त्या भागातील वॉर्ड अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करा. शहरातील प्रत्येक कामासाठी पूर्ण वेळ द्या. हा शेवटचा इशारा असले पुढील काळात शहरातील रस्त्यासह इतर सर्वच प्रश्न अधिकाऱ्यांनी गांभीर्याने घेतला नाही तर कोणालाही माफ केले जाणार नाही, असा इशारा दिला.
*पाणी प्रश्न, गांधी मैदान, कर्मचारी वेतनाबाबतही अधिकारी धारेवर*
रस्त्यांसह शहरातील पाणी प्रश्न गंभीर आहे. आजही काही भागात अपुरा पाणी पुरवठा होत आहे. याबाबत प्रशासन गंभीर नाही रोष मात्र लोकप्रतिनिधींवर येत आहे. यामध्ये सुधारणा करा. गांधी मैदानात मुद्दाम पाणी साठण्याची परिस्थिती निर्माण करणाऱ्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्याबाबत पुढे काय कारवाई करण्यात आली? गांधी मैदानात पुन्हा पाणी साचले जावू नये याची खबरदारी घ्या. कंत्राटी कर्मचाऱ्याना मिळणाऱ्या मानधनातून ठेकेदार अधिक रक्कम कपात करत असल्याची तक्रार आली होती. त्याचे काय झाले अशी विचारणा आमदार क्षीरसागर यांनी केली असता नोटीस दिली असल्याचे अधिकारी कृष्णात पाटील यांनी सांगितले. यावर संताप व्यक्त करत आमदार क्षीरसागर यांनी कागदी घोडे नाचवू नका. कामगारांचे पैसे खाणाऱ्या ठेकेदारावर तात्काळ कारवाई करून गोरगरीब कर्मचाऱ्यांचे हक्काचे वेतन तात्काळ मिळवून देण्याची सूचना केल्या.
या बैठकीस अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, शहर अभियंता रमेश मस्कर, उपशहरअभियंता फुलारी, सुरेश पाटील, गुजर, रस्ते विकास कन्सल्टंट सुरज गुरव, कृष्णात पाटील, जिल्हा वाहतूक समिती सदस्य रेवणकर आदी उपस्थित होते. .