12 व 13 मार्च रोजी आयटीआयमध्ये प्लेसमेंट ड्राईव्ह; उमेदवारांना नोकरीची संधी

Spread the news

12 व 13 मार्च रोजी आयटीआयमध्ये प्लेसमेंट ड्राईव्ह; उमेदवारांना नोकरीची संधी

­

 

कोल्हापूर, दि. 9 (जिमाका) : अल्पमुदतीचा रोजगारक्षम प्रशिक्षण कार्यक्रम (STEP) योजनेअंतर्गत प्रशिक्षित उमेदवार तसेच इतर नोकरी इच्छुक उमेदवारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, कोल्हापूर व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था शाहूवाडी, शिरोळ, चंदगड, भूदरगड, हातकणंगले व गडहिंग्लज यांच्या संयुक्त विद्यमाने प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन करण्यात आले आहे.

  •  

यामध्ये 12 मार्च रोजी सकाळी 10 ते दुपारी 2 या वेळेत आयटीआय शाहूवाडी, शिरोळ व चंदगड येथे तर 13 मार्च रोजी याच वेळेत आयटीआय भूदरगड, हातकणंगले व गडहिंग्लज येथे प्लेसमेंट ड्राईव्ह होणार आहे. आयटीआय शाहूवाडी येथे इलेक्ट्रिशियन पदासाठी 30 रिक्त पदे उपलब्ध आहेत. आयटीआय शिरोळ येथे मोल्डिंग, पॅटर्न मेकर, वेल्डिंग, टर्नर व CNC ऑपरेटर या पदांसाठी 45 पदे आहेत. आयटीआय चंदगड येथे फिटर व वेल्डिंग पदांसाठी 85 रिक्त पदे उपलब्ध आहेत. तसेच 13 मार्च रोजी आयटीआय भूदरगड येथे CCTV Installation Technician व Electrician पदांसाठी 25 रिक्त पदे तर आयटीआय हातकणंगले येथे Self Employed Tailor व Electrician पदांसाठी 55 रिक्त पदे उपलब्ध आहेत.

या मेळाव्यासाठी अल्पमुदतीचा रोजगारक्षम प्रशिक्षण कार्यक्रम (STEP) अंतर्गत प्रशिक्षित उमेदवार तसेच 10 वी, 12 वी व आयटीआय पात्रता असलेले उमेदवार पात्र असतील. इच्छुक उमेदवारांनी rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर भेट देऊन आपला पसंतीक्रम ऑनलाईन नोंदवावा. प्रत्यक्ष मुलाखतीसाठी येताना उमेदवारांनी सर्व शैक्षणिक कागदपत्रे तसेच आवश्यकतेनुसार रिझ्युम सोबत आणणे आवश्यक आहे. जास्तीत जास्त उमेदवारांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त जमीर करीम यांनी केले.


Spread the news

You may also like

error: Content is protected !!