*सामान्य कुटुंबातील पोरीने MPSCतून एकावेळी दोन पोस्ट मिळवल्या !!*
*सेंट्रिग काम करणारा बाप आणि शेतात मजुरी करणाऱ्या आईचा पांग फेडला*…
@प्राचार्य डॉ.महादेव नरके
*अस्मिता लांडगे*.. वडणगे ( ता. करवीर ) येथील धनगर गल्लीतील सामान्य कुटुंबातील मुलगी. शिक्षण गावातील देवी पार्वती हायस्कूलमधून.. वडील सेंट्रिग कामाला तर आई शेतात मजुरी करणारी..पोरीला स्पर्धा परीक्षा आणि शासकीय नोकरी लहानपणापासून खुणावत होती. पण घरच्या परिस्थितिचे प्रेशर आणि गरिबीची जाण होती ..
पण जिद्द दांडगी…
दहावीनंतर पुढील शिक्षणासाठी कोल्हापुरात प्रवेश घेतला.आणि हळू हळू शिक्षणासोबत स्पर्धा परीक्षा अभ्यास सूर ठेवला. आणि आज तिने मोठ यश मिळवलं..
अस्मिताचे वडील भगवान हे मित्र.. हातात पिशवी घेऊन फिरणारा साधा माणूस..
मित्राच्या मुलीचे कौतुक आणि लांडगे कुटुंबाचा सत्कार करायला त्यांच्या धनगर गल्लीतील घरात पोहोचलो.
भगवान नेहमीप्रमाणे हसत समोर आला.
दोन खोल्यांच त्यांच साध घर आज पोरीच्या यशाने आनंदाने जणू डोलत होतं. उत्साहाने भरून गेल होत…
अस्मिताला सांगत होती, “काहीतरी वेगळं करायचं होत मला. प्रयत्न सुरू ठेवले. एके ठिकाणी मार्गदर्शनासाठी क्लास जॉइन केला.त्यानंतर स्वतः अभ्यास सुरू ठेवला, सोबत कमी फी मधील ऑनलाइन क्लासची सोबत घेतली.
लवकर नोकरी मिळवायची होती मला ! कोल्हापूर कोर्टमधील क्लार्कसाठी परीक्षा आणि मुलाखत दिली. यश मिळणारच ही खात्री होती; पण यादीत नाव आले नाही.
थोडी निराशा आली पण पुन्हा मनाला समजावल.. आणि जिद्दीने अभ्यास सुरू केला. काल MPSC परीक्षेचा निकाल लागला, आणि कर सहाय्यक ( Tax Assistant) आणि मंत्रालय सहायक या पोस्ट मिळाल्या.. आई वडिलांच्या कष्टाचे चीज केल्याचा मला खूप आनंद झाला..” डोळ्यात समाधानाचे भाव आणून अस्मिता सांगत होती .पण तिच्या बोलण्यात प्रचंड आत्मविश्वास होता.
पोरीच्या या यशाने आई छायाताई आणि वडील भगवान यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे हसू होते.
अभिमानाने मुलीचे कौतुक सांगताना दोघांना शब्द कमी पडत होते.
” अस्मिताने खूप कष्ट घेतले इथं पोहोचायला. रविवार असुदे, गावची महाशिवरात्री यात्रा असुदे, गणपती उत्सव असुदे , रक्षाबंधन असुदे , ती ठरल्या वेळेत सकाळी ७ वाजता अभ्यासासाठी कोल्हापूरला जात होती..तिने सणावाराचा मोह टाळला.”
वडील भगवान सांगत होता, अस्मिताचा रिक्षाने वडणगे ते गंगावेश आणि परत हा प्रवास 40 रुपयात व्हायचा.मी हातावर 50 रुपये दिले तरी ती 40 रुपयेच घ्यायची.आमच्या कष्टाची आणि परिस्थितीची जाणीव म्हणून पोरीने 10 रुपये ज्यादा घ्यायचे टाळले….गंगावेशमधून चालत गांधी मैदान वाचनालयात चालत जाऊन तिने अभ्यास केला.”
या यशानं अस्मिताने आई बापाचा पांग फेडलाय.
अशा मुली म्हणजे आई बापाचा ,कुटुंबाचा अभिमान…
गावचा ,समाजाचा अभिमान …
सलाम, अस्मिताच्या कर्तृत्वाला..
अस्मिताचे यश हे सामान्य कुटुंबातील अनेक मुला मुलींना प्रेरणा देणारे आहे.





