प्राचार्य सुनीलकुमार लवटे यांचा अकरा एप्रिलला सत्कार
अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन
कोल्हापूर
ज्येष्ठ विचारवंत, संशोधक, साहित्यिक डॉ. सुनीलकुमार लवटे यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त अकरा एप्रिल रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. ग्रंथ प्रकाशन, अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त सत्कार यासह अनेक कार्यक्रमांचा यामध्ये समावेश आहे. डॉ. सुनीलकुमार लवटे अमृत महोत्सव समितीच्या वतीने सायंकाळी पाच वाजता पेटाळा येथील राम गणेश गडकरी सभागृहात हा कार्यक्रम होणार आहे.
डॉ. लवटे अमृत महोत्सव समितीच्या वतीने वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. 11 एप्रिल रोजी लवटे सर यांचा अमृत महोत्सवी वाढदिवस आहे. त्या दिवशी त्यांचा सत्कार, ग्रंथ प्रकाशन व विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये वायकुळ लिखित तिमिर छेदताना हे डॉ. लवटे यांचे चरित्रग्रंथ, डॅा.विश्वास सुतार यांचा सुनीलकुमार लवटे समग्र वाड्:मय , तसेच डॉ. लवटे सरांच्या विषयी भाषणांचा संग्रह हा ग्रंथ रूपाने प्रकाशित केले जाणार आहेत.
या समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर तर अध्यक्ष म्हणून इतिहास संशोधक जयसिंगराव पवार हे उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाच्या तयारीसाठी झालेल्या बैठकीस अमृत महोत्सव समितीचे अध्यक्ष प्राचार्य जी.पी. माळी, उपाध्यक्ष प्रवीण चौगुले, प्रा. टी.के. सरगर, सचिव विश्वास सुतार, खजिनदार प्रा. प्रभाकर हेरवाडे, प्रा. सी.एम. गायकवाड, भाग्यश्री कासोटे, गुरुबाळ माळी, सागर बगाडे, विजय एकशिंगे, अमेय जोशी, राजेंद्रकुमार गोंधळी, निशांत गोंधळी, संदीप मगदूम यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.