५३ वर्षावरील दीर्घ आजाराने त्रस्त कर्मचाऱ्यांना जनगणना कामगिरीतून वगळा : राजेंद्र कोरे
कोल्हापूर दि.२५ : जनगणना कामगिरीतून ५३ वर्षावरील व दीर्घ आजाराने त्रस्त असलेले कर्मचारी, गरोदर व स्तनदा माता व दिव्यांग कर्मचाऱ्यांना जनगणना कामगिरीतून वगळण्यात यावे अशी मागणी, महाराष्ट्र राज्य मान्य खाजगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर महासंघाचे राज्य सचिव राजेंद्र कोरे यांनी आज कोल्हापूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
मे व जून महिन्यामध्ये होऊ घातलेल्या राष्ट्रीय जनगणना मोहिम पार पडणार आहे.या राष्ट्रीय कामासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उत्सुक आहेत. सदर कामगिरीसाठी शहरस्तरीय प्रगणक व पर्यवेक्षक यांचे कामगिरी आदेश मोबाईल व्हाट्सअप द्वारा देण्यात आले आहेत.
जनगणना कामगिरी आदेशांचा विचार करता मार्च, एप्रिल व मे या महिन्यांमध्ये सेवानिवृत्त होणाऱ्या मुख्याध्यापक, शिक्षक व कर्मचारी, ५३ वर्षावरील दीर्घ आजाराने त्रस्त असलेले हृदयरोग बायपास/ एन्जोप्लास्टी झालेले कर्मचारी.गरोदर स्त्रिया व स्तनदा माता तसेच दिव्यांग शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनाही आदेश देण्यात आले आहेत. वरील बाबींचा विचार करता सदरची जनगणना मोहिम मे व जून महिन्यात पूर्णपणे उन्हाळ्याच्या दिवसात होणार असल्याने ५३ वर्षा वरील कर्मचाऱ्यांच्या तसेच सेवानिवृत्त होणाऱ्या मुख्याध्यापक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रगणक व पर्यवेक्षक आदेश रद्द करावेत अशी मागणी करण्यात आली आहे.
” मार्च, एप्रिल व मे महिन्यांमध्ये सेवानिवृत्त होणारे कर्मचारी , गरोदर स्त्रिया व स्तनदा माता,दिव्यांग शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना कामगिरीतून वगळण्याचे,आश्वासन अतिरिक्त आयुक्त आडसूळ यांनी दिले. “





