*रोटरी सेंट्रलचे मिस चायवाली*
*शिवानीच्या स्वप्नांना पाठबळ*
रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर सेंट्रल यांच्यावतीने रामानंदनगर येथील शिवानी पाटील या युवतीला एक लाख रुपये निधीतून टी स्टॉल देण्यात आला आहे. वडिलांच्या निधनाचे दुःख पचवत ,आईच्या आजारपण सांभाळत अत्यंत निर्धाराने स्वतःच्या पायावर उभारण्याची जिद्द बाळगणाऱ्या “मिस चायवाली” शिवानीच्या स्वप्नांना खऱ्या अर्थाने रोटरी सेंट्रलने पाठबळ दिले आहे.
रोटरी क्लब कोल्हापूर सेंट्रल सातत्याने विविध सामाजिक उपक्रम राबवण्यामध्ये अग्रेसर आहे. गेल्या महिन्यात क्लबच्या वतीने महाराष्ट्राची गौरवगाथा हा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमावेळी जमलेल्या निधीतून समाजातील विविध घटकांना त्याच दिवशी मदत करण्यात आली. यानुसार गांधीनगर येथील उपजिल्हा रुग्णालयासाठी दोन वॉटरफिल्टर युनिट, कुशिरे येथील आश्रम शाळेसाठी वॉटर फिल्टर युनिट, उमेद फाउंडेशन तसेच बालकल्याण संकुल या संस्थांना जीवनावश्यक साहित्य, बालेघोळ येथील शाळेला शैक्षणिक साहित्य देण्यात आले.
या निधीतून एखाद्या युवतीला किंवा महिलेला स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी मदत करण्याचा निश्चय रोटरी सेंट्रलचे अध्यक्ष संजय भगत, आणि कम्युनिटी सर्विस डायरेक्टर प्राचार्य डॉ. महादेव नरके आणि रोटरी सेंट्रलच्या सदस्यांनी केला. त्यानुसार माहिती घेत असताना मिस चायवाली या नावाने रामानंदनगर चौकात चहाचा स्टॉल चालविणाऱ्या
शिवानीबद्दल माहिती मिळाली.
त्यानुसार या दोघांनी शिवानीची प्रत्यक्ष भेट घेऊन तिच्या भविष्यातील वाटचालीविषयी जाणून घेतले .
चहा देत देत शिवानी सांगत होती, ” माझे वडील वारले असून आईला सध्या औषध उपचारासाठी खर्च करावा लागतो. आम्ही घरासाठी अठरा लाखांचे कर्ज काढले आणि त्यापैकी सहा लाखांचे कर्ज फिटले आहे. उर्वरित कर्ज मी या चहाच्या स्टॉलवर काम करून भागवणार आहे. हा चहाचा छोटा स्टॉल मी भाड्याने घेतला आहे. सध्या गोखले कॉलेजमध्ये कॉमर्सच्या दुसऱ्या वर्षाला शिकत असून त्याबरोबरच दिवसभर हा चहाचा व्यवसाय करते. नवीन मोठ्या आकाराचा चहाचा स्टॉल बनवून घेऊन त्यावर चहाबरोबर चपाती भाजी. तसेच अन्य नाष्टा सुद्धा सुरू करणार असल्याचे शिवानीने सांगितले.
तिच्या बोलण्यात कुठेही परिस्थितीबद्दल तक्रार नव्हती; उलट जीवनात आलेल्या परिस्थितीला सामोरे जात निश्चयाने वाटचाल करण्याचा निर्धार होता.
तिचे हे बोलणे एकूण प्रभावित झालेल्या भगत आणि डॉ. नरके यांनी तुला हवा तसा चहाचा स्टॉल आम्ही रोटरी सेंट्रल मार्फत बनवून देऊ, असे सांगताच शिवानीच्या आनंदाला पारावर उरला नाही.
गेल्या आठवड्यात शिवानीचा
हा नवीन स्टॉल सुरू झाला आहे. जिद्दीने आयुष्यात काहीतरी करून दाखवायचे स्वप्न पाहणाऱ्या शिवानीला रोटरी सेंट्रलने दिलेल्या पाठबळामुळे तिच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत आहे. या स्टॉल्स हस्तांतरवेळी सेंट्रल चे अध्यक्ष संजय भगत, सेक्रेटरी रवी खोत, विजय रेळेकर ,पंडित कोरगावकर, डॉ.महादेव नरके, डॉ.समीर कोतवाल, अभय सोनवणे, सचिन गाडगीळ,सौ.संयोगिता भगत, सौ वर्षा वायचळ यांच्यासह बालाजी पार्क भागातील नागरिक उपस्थित होते.