मंडलिकांच्या प्रचारार्थ सरसावली मनसे
जिल्हाभर उठवणार प्रचाराचे रान
प्रदेश सरचिटणीस बाळासाहेब शेंडगे .
कोल्हापूर : कोल्हापूर मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांच्या प्रचारार्थ जिल्हाभर रान उठवण्यासाठी मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी संजय मंडलिक यांची भेट घेऊन आपल्या प्रचाराचे नियोजन सांगितले.
यावेळी खासदार संजय मंडलिक यांनी राज ठाकरे यांनी दिलेल्या बहुमोल पाठिंबाबद्दल आभार व्यक्त करून आवश्यक ती सर्व मदत मनसेच्या पदाधिकाऱ्यांना देण्याचा शब्द दिला.
यावेळी प्रदेश सरचिटणीस बाळासाहेब शेंडगे म्हणाले, “भारताला विकसित देश बनविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणे आवश्यक आहे. यासाठीच मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मोदींना बिनशर्त पाठिंबा दिला आहे. आमची सर्व ताकद निश्चितच महायुतीच्या उमेदवाराच्या पाठीशी राज्यभर राहील.
कोल्हापूरचे उमेदवार मंडलिक यांना निवडून आणण्यासाठी मनसे जिल्हाभर प्रचाराचे रान उठवेल.”
जिल्हाध्यक्ष राजू दिंडोर्ले म्हणाले, ” मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी महायुतीला पाठिंबा व्यक्त केला असून त्यांच्या आदेशानुसारच मनसेचे सर्व कार्यकर्ते महायुतीच्या उमेदवारांच्या विजयासाठी मैदानात उतरले आहेत.
मनसेची सर्व मते महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मिळतील.
मनसेचे बाळासाहेब शेंडगे, जिल्हाध्यक्ष राजू दिंडोर्ले, शहराध्यक्ष प्रसाद पाटील, विजय करजकर, अमित पाटील, अभिजीत पाटील, राजू पाटील, अभिजीत राऊत, नागेश पाटील, अभिजित पाटील, शिवाजी मते यांच्यासह अन्य प्रमुख कार्यकर्त्यांनी महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांची भेट घेऊन जिल्हाभर प्रचाराची यंत्रणा सक्रिय करण्याबाबत आपली भूमिका मांडली.
यावेळी खासदार मंडलिक यांनी आपण मनसेच्या सर्व कार्यकर्त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचा निर्वाळा दिला.





