शिक्षणमहर्षी  डॉ. बापूजी साळुंखे यांचा 38 वा स्मृतिदिन साजरा

Spread the news

शिक्षणमहर्षी  डॉ. बापूजी साळुंखे यांचा 38 वा स्मृतिदिन साजरा

 कोल्हापूर दि. 8 : श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था ही महाराष्ट्रातील नावलौकिक असलेली शिक्षण संस्था आहे. शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांनी  महाराष्ट्रातील 12 जिल्हे आणि बेळगावसह 14 जिल्हयात शिक्षणाचा प्रचार आणि प्रसार केला. त्यामुळे महाराष्ट्राच्या डोंगरदऱ्यातील बहुजन समाजापर्यंत शिक्षण्‍ पोहोचले. आधुनिक महाराष्ट्राच्या जडणघडणीत शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांचे योगदान मोलाचे आहे. बापूजींचे द्रष्टेपण त्यांनी खेडोपाडयात निर्माण केलेल्या संकुलांमधून दिसते. विद्यार्थ्यांना बहुज्ञानशाखीय शिक्षणाला सामोरे जावे लागणार आहे. या अस्वस्थ वर्तमानाच्या काळात बापूजींच्या विचारांचे स्मरण आणि अंगीकार करायला हवा, बापूजींना अभिप्रेत असणारा शिक्षकच चांगला समाज घडवू शकतो.  असे प्रतिपादन मा.ना.पंकज भोयर, (राज्यमंत्री, शालेय शिक्षण, गृह (ग्रामीण), सहकार, खनिकर्म, गृहनिर्माण) यांनी केले. ते शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांच्या 38 व्या स्मृतिदिन निमित्त्‍ा आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी  श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष मा. प्राचार्य अभयकुमार साळुंखे हे होते.

याप्रसंगी प्रमुख वक्ते सुप्रसिध्द कवी व व्याख्याते  मा. श्री अविनाश भारती यांनी ‘आजची संस्कृती व डॉ.बापूजी साळुंखे यांची विचारधारा’ या विषयावर बोलताना, शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांच्या प्रार्थनेमध्ये मानवतावादी दृष्टी पाहायला मिळते. बापूजींनी सांगितलेला  ‘ज्ञान, विज्ञान आणि सुसंस्कार यांसाठी शिक्षणप्रसार’ हा ध्येयवाद सर्वानी आचरणात आणून विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत योगदान द्यावे. विद्यार्थ्यांनी शिक्षकांवर विश्वास ठेवावा आणि शिक्षकांनी तो विश्वास सार्थ करावा.  तरच येणाऱ्या काळात सुजाण नागरिक घडतील. बापूजींची प्रार्थना, शैक्षणिक विचार आणि तत्वज्ञानामधील मार्गदर्शक तत्वांचा संदर्भ नव्या शैक्षणिक धोरणात आहे. बापूजींच्या सत्य्, शील, प्रामाणिकता, त्याग, पिळवणूकीस आळा या पंचसुत्रीचा अवलंब करुन विद्यार्थ्यांनी आपला व संस्थेचा नावलौकिक वाढवावा.  असे मत व्यक्त केले.

  •  

            अध्यक्षीय मनोगतात संस्थेचे कार्याध्यक्ष मा. प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांनी  शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांनी संघर्षातून बहुजन समाजाला शिक्षणप्रवाहात आणण्यासाठी श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेची उभारणी केली.  शिक्षणातील संधी आणि आव्हाने ओळखून बापूजींनी शिक्षण क्षेत्रात अव्याहत कार्य केले. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण राबविताना शिक्षकांनी सजग असणे गरजेचे आहे. तसेच तंत्रज्ञानाचा वापर करुन त्यावर स्वार होण्याचे आव्हान शिक्षकांनी स्वीकारले पाहिजे आणि समाजाभिमुख शिक्षणावर भर दिला पाहिजे. या बापूजींच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने शिक्षकांनी बापूजींच्या विचार व कार्याचा वारसा आत्म्‍ासात करुन विद्यार्थी घडवावेत. असे प्रतिपादन केले.

या प्रसंगी संस्थेतील गुणवंत विद्यार्थी व शाळा सिध्दी मुल्यमापन अंतर्गत विजेते म्हणून प्रथम क्रमांक विवेकानंद कॉलेज,कोल्हापूर, व्दितीय क्रमांक राजे रामराव महाविद्यालय, जत,  तृतीय क्रमांक पद्मभुषण डॉ.वसंतदादा पाटील महाविद्यालय, तासगाव यांचा सत्कार पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच पाल येथील कलाशिक्षक श्री.विजयकुमार पांडुरंग शिंगण यांनी साडेचार एकर परिसरात शिवराज्याभिषेक संबंधी रांगोळी काढून लंडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद केल्याबद्दल श्री. शिंगण यांचा विशेष सत्कार करण्यात आला.  यावेळी डॉ.मच्छिंद्र नांगरे लिखीत ‘शिक्षणमहर्षी डॉ.बापूजी साळुंखे विचारधन’ पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.

प्रारंभी संस्थेच्या कला शिक्षकांच्या कलाकृतीचे प्रदर्शन मान्य्‍वरांच्या हस्ते संपन्न्‍ झाले.  या कलाप्रदर्शनात रेखाचित्र, हस्तकला, शिल्पकला यासारख्या 100 हून अधिक कलाकृतींची मांडणी करण्यात आली होती. दुपारच्या सत्रात संस्थेतील मुध्याध्यापकांसाठी परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते.  कार्यक्रमाची सुरुवात श्री. महेश हिरेमठ व सहकाऱ्यांनी सादर केलेल्या शिक्षणमहर्षी डॉ.बापूजी साळुंखे रचित संस्था प्रार्थनेने व सुमधुर भक्तीगीतांने झाली. स्वागत, प्रास्ताविक  व पाहुण्यांचा परिचय करुन देताना संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. कौस्तुभ गावडे यांनी, शिक्षणमहर्षी डॉ.बापूजी साळुंखे यांनी लावलेल्या ज्ञानाच्या रोपटयाचा ज्ञानवटवृक्ष झालेला आहे.  शब्दांचे धन मानून गुरुदेव कार्यकर्ते ज्ञानार्जन करीत आहेत.  कृत्रिम बुध्दीमत्ता, संगणक, आधुनिक तंत्रज्ञान यांची सोबत करत संस्था दर्जात्मक विकास साधत आहे, असे प्रतिपादन केले.   कार्यक्रमाचे आभार संस्थेचे सहसचिव (प्रशासन) मा. श्री सिताराम गवळी यांनी मानले तर सूत्रसंचालन डॉ. कविता तिवडे, प्रा. सुप्रिया पाटील यांनी केले.

याप्रसंगी संस्थेच्या सेक्रेटरी मा.प्राचार्या सौ.शुभांगी गावडे, संस्थेचे उपाध्यक्ष मा. अविनाश पाटील, संस्थेचे सहसचिव (अर्थ) प्राचार्य डॉ.मिलिंद हुजरे, संस्थेचे कोल्हापूर विभागप्रमुख मा. श्री. श्रीराम साळुंखे, विवेकानंद कॉलेजचे प्राचार्य डॉ.आर.आर.कुंभार , सर्व विभागप्रमुख, संस्थेचे आजीव सेवक, आजी माजी पदाधिकारी, शाखाप्रमुख, गुरुदेव कार्यकर्ते, विद्यार्थी, विद्यार्थिनी मोठया संख्येने उपस्थित होते.

——————————————————————————————————————–

 


Spread the news

You may also like

error: Content is protected !!