शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांची 9 जूनला 107 वी जयंती पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रम मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे यांची माहिती

Spread the news

शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांची 9 जूनला 107 वी जयंती

पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रम

मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे यांची माहिती

  •  

कोल्हापूर

श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे संस्थापक, शिक्षण महर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांची 107 वी जयंती सोमवार दिनांक 9 जून रोजी होत आहे. यानिमित्त राज्याचे आरोग्य मंत्री व पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे यांनी दिली.

मुख्य कार्यकारी अधिकारी गावडे यांनी सांगितले की, डॉ. बापूजी साळुंखे यांनी ज्ञान, विज्ञान आणि सुसंस्कार यासाठी शिक्षण प्रसार या उदात्त हेतूने सन 1954 मध्ये श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेची स्थापना केली. बापूजींनी अत्यंत तळमळीने आणि अथक परिश्रमातून उभारलेल्या या संस्थेचा आता वटवृक्ष झाला आहे. सध्या संस्थेच्या 407 शाखा असून दहा हजारावर गुरुदेव कार्यकर्ते ज्ञानदानाचे आणि अडीच लाखावर विद्यार्थी अध्ययनाचे पवित्र कार्य करत आहेत. संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे, सचिव शुभांगी गावडे यांच्या दूरदृष्टीने संस्थेची गेल्या अनेक वर्षात मोठ्या प्रमाणात प्रगती होत आहे.

सध्या संस्थेत प्राथमिक शिक्षणापासून ते विद्यापीठीय शिक्षणापर्यंत कला, वाणिज्य, विज्ञान, तांत्रिक, कायदा, व्यवस्थापन शास्त्र, औषध निर्माण, कृषी, हॉटेल मॅनेजमेंट अशा विविध प्रकारचे शिक्षण दिले जात आहे. संस्थेचे अध्यक्ष उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील आणि इतर पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनातून संस्थेची वाटचाल सुरू आहे.

संस्थेच्या वतीने गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम राबवण्यात येत असल्याचे सांगून गावडे यांनी पुढे सांगितले की, पाचवी, आठवी शिष्यवृत्ती बरोबरच बारावी आणि इतर विद्यार्थ्यांना विविध प्रकारचे मार्गदर्शन वर्ग आणि सुविधा उपलब्ध करून देण्यात आले आहेत. डॉ. बापूजी साळुंखे सेंटर फॉर एक्सलन्स या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचा लाभ अनेक विद्यार्थी घेत आहेत. संस्थेने गेल्या काही वर्षात विविधांगी शिक्षण प्रसाराची व्यवस्था करत बहुजन समाजातील विद्यार्थ्यांना खेडोपाडी शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

डॉ. बापूजी साळुंखे यांच्या व्यक्तिमत्त्वाचे व त्यांच्या कार्याचे चिंतन व्हावे म्हणून दरवर्षी 9 जून हा बापूंचा जन्मदिन मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. याचाच एक भाग म्हणून येत्या 9 जून रोजी ताराबाई पार्क येथील संस्थेच्या शिक्षण महर्षी डॉ. बापूजी साळुंखे स्मृती भवन येथे सकाळी साडेदहा वाजता विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून पालकमंत्री प्रकाशराव आबिटकर हे उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे हे भूषविणार आहेत. या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन संस्थेच्या सचिव प्राचार्य शुभांगी गावडे यांनी केले आहे.


Spread the news

You may also like

error: Content is protected !!